भोकर विधानसभा व येथील जनतेशी आमचे जुनेच नाते-वंचित ब.आघाडीचे उमेदवार रमेश राठोड
श्रीजया अशोक चव्हाण यांचे आजोबा स्व.डॉ.शंकरराव चव्हाण व रमेश राठोड यांचे वडील डॉ.टिकाराम राठोड यांच्यात ५२ वर्षांपूर्वी भोकर विधानसभा मतदार संघात १९५२ मध्ये झाली होती अटीतटीची लढत…
उत्तम बाबळे,संपादक
भोकर : होऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ८५-भोकर विधानसभा मतदार संघातून श्रद्धेय ॲड.प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश टिकाराम राठोड यांना यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी दिली असून या मतदार संघाचे व येथील जनतेशी आमचे जुनेच नाते असल्यामुळे पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि मतदार माय बापांच्या आशिर्वादाच्या बळावर ही निवडणूक मी लढणार आहे, असे मत उमेदवार रमेश राठोड यांनी दि.२३ ऑक्टोबर रोजी भोकर येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक २०२४ ची धामधूम सुरू झाली असून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश राठोड यांना ८५-भोकर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.याच अनुषंगाने ओम लॉन्स मंगल कार्यालय भोकर येथे दि.२३ ऑक्टोबर २०२४ रोजी वंचित आघाडीच्या वतीने उमेदवार रमेश राठोड यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.सदरील पत्रकार परिषदेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्तीअंबिरे,भोकर तालुकाध्यक्ष दिलीप के. राव,सुरेश राठोड,माजी तालुकाध्यक्ष सुभाष तेले,सामाजिक कार्यकर्ते अशोक राठोड यांसह आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना रमेश राठोड पुढे म्हणाले की,भोकर विधानसभा मतदार संघातील सुजाण मतदार माय बाप हिच माझी खरी शक्ती व धन दौलत असून त्यांचा आशिर्वादाने नक्कीच मला यश मिळणार आहे. श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसावर विश्वास ठेऊन ही उमेदवारी दिली असल्याने त्यांच्या व येथील पक्ष पदाधिकारी,कार्यकर्ते आणि सुजाण मतदारांच्या विश्वासास मी पात्र राहून विकासात्मक जनसेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे,असे ही ते म्हणाले.
श्रीजया अशोक चव्हाण यांचे आजोबा स्व.डॉ.शंकरराव चव्हाण व रमेश राठोड यांचे वडील डॉ.टिकाराम राठोड यांच्यात भोकर विधानसभा मतदार संघात ५२ वर्षांपूर्वी १९५२ मध्ये झाली होती अटीतटीची लढत…
भोकर तालुका ज्या मतदार संघात होता तो धर्माबाद विधानसभा मतदार संघ व नंतर धर्माबाद तालुका ज्या विधानसभा मतदार संघात होता त्या भोकर विधानसभा मतदार संघातून अनुक्रमे सन १९६२ आणि १९६७ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढलेल्या स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांना येथील मतदारांनी विजयी केले होते.तत्कालीन उमरी ता.भोकर येथे वैद्यकीय सेवा करणारे सर्व सामान्य बंजारा कुटुंबातील उमदा तरुण डॉ.टिकाराम धनाजीराव(टी.डी. राठोड) यांनी प्रस्थापितांशी लढा देण्याच्या हेतूने सन १९६७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भोकर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.तत्काली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ताकद खुप मोठी होती.त्यामुळे काही लोकांनी त्यांना उमेदवारी अर्ज माघार घेण्यास भाग पाडले होते.यामुळे हताश न होता आंबेडकरी विचाराच्या भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने डॉ.टी.डी. राठोड यांनी सन १९७२ मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार शंकरराव भाऊराव चव्हाण यांच्या विरुद्ध १६०-भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.यावेळी देखील काही लोकांनी त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा असे म्हटले होते.परंतू त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी न घेता कडवी झुंज दिली.झालेल्या अटीतटीच्या लढतीत शंकरराव चव्हाण हे विजयी झाले.शंकरराव चव्हाण यांना ४५,८०३ मते मिळाली.तर डॉ.टी.डी.राठोड यांना १३,१७१ असे दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.अशा लढवय्या व्यक्तीमत्वाचे पुत्र रमेश टिकाराम राठोड यांनी देखील भोकर तालुक्यातील एका जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविली होती व येथील सुजाण मतदारांनी त्यांना विजयी केले होते.त्यांनी देखील जि.प.सदस्याच्या माध्यमातून लोकसेवा केली आहे.राठोड परिवाराच्या समाजसेवा व जनसेवेची दखल घेऊन होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने ८५-भोकर विधानसभा मतदार संघातून रमेश राठोड यांना उमेदवारी दिली आहे.भाजपाने स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांची नात व माजी मुख्यमंत्री तथा राज्य सभेचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या ॲड.श्रीजया चव्हाण यांना महायुतीचे उमेदवार म्हणून उमेदवारी दिली असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रमेश राठोड यांची त्यांच्या विरुद्ध लढत होणार आहे.भोकर विधानसभा मतदार संघातून स्व.डॉ. शंकरराव चव्हाण व त्यांचे पुत्र खा. अशोक चव्हाण आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अमिता चव्हाण यांनी आमदार,नामदार म्हणून लोकप्रतिनिधित्व केल्याने ‘चव्हाण’ घराणेशाहीचा हा पारंपारिक मतदार संघ आहे म्हणून बोलल्या जात असले तरी डॉ.टिकाराम धनाजीराव(टी.डी.) राठोड यांनी देखील ५२ वर्षांपूर्वी येथूनच लढत दिली होती.त्यामुळे रमेश राठोड यांच्यासाठी देखील हा मतदार संघ नवखा नसून येथील मतदारांशी त्यांचे जुनेच नाते जोडलेले आहे.