रेल्वे भुयारी पुलाच्या तुटलेल्या ‘प्रवेश बंद’ फलकापासून दुचाकी स्वार बालंबाल बचावले
भोकर येथील रेल्वे भुयारी पुल मार्गावरील खड्डे व दुर्गंधीतून जीव मुठीत घेऊन वाहन धारकांना करावी लागत आहे ये जा…
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर येथील रेल्वे भुयारी पुल मार्गावरील एका बाजूचा ‘उंच वाहनांना प्रवेश बंद’ चा पत्र्याचा सुचना फलक काल तुटून लोंबकळत होता.अचानक सुरु झालेला अमौसमी पाऊस व सुसाट वाऱ्यामुळे तो इकडून तिकडे व तिकडून इकडे असा जोराने हलत होता.दरम्यानच्या काळात पावसापासून बचाव करण्यासाठी घाईघाईने जात असलेल्या दुचाकी स्वारांचे त्याकडे लक्ष नसल्याने तो पत्र्याच्या फलक अनेकांना लागणार असे झाले होते.अशाच एका स्वारास तो लागणार होता.परंतू सुदैवाने तो लागला नसल्याने या अपघातातून तो स्वार बालंबाल बचावला आहे.तर या दुतर्फा मार्गावरील जागोजागी पडलेले खड्डे व दुर्गंधीतून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने अक्षम्य दुर्लक्ष असलेल्या रेल्वे प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष घालून समस्या सोडवावी अशी मागणी वाहनधारक व नागरिकांतून होत आहे.
भोकर शहराच्या मध्यस्थानी असलेल्या रेल्वे मार्गावर उड्डाण व भुयारी पुलाची निर्मिती करण्यात आली आहे.उड्डाण पुलामुळे वाहन धारकांचा मार्ग सुखकर झाला असला यरी भुयारी मार्ग मात्र त्रासदायक ठरत आहे.कारण भुयारी पुलाच्या दुतर्फा मार्गाचे काम घाईघाईने व निकृष्ट दर्जाचे झाल्याने जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे ढिगारे ही लागले आहेत.साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी एकच नाली असून त्यावर टाकण्यात आलेल्या लोखंडी सळ्यांच्या जाळीत ही कचरा साचला असल्याने पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे.पावसाचे सर्व पाणी त्याच ठिकाणी साचत असून ये जा करणाऱ्या वाहन धारकांच्या अंगावर ते घाण पाणी उडत आहे.त्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पुलाच्या बाहेरील नालीचे काम ही अर्धवट केले गेले असल्याने तेथे ही पाणी साचत असून दुर्गंधी पसरली आहे.
तर काल या भुयारी पुलाच्या एका मार्गावरील प्रवेश द्वारावर लावण्यात आलेला ‘उंच वाहनांना प्रवेश बंद’ चा पत्र्याचा सुचना फलक तुटून लोंबकळत होता.सायंकाळी अचानक अमौसमी पाऊस सुरू झाला व वारा सुटल्याने दरम्यानच्या काळात भुयारी पुल मार्गाने घाईघाईने वाहन धारक घर गाठण्याचा प्रयत्न करत होते.यावेळी त्या मार्गाने जात असलेल्या एका दुचाकी स्वाराच्या अगदी डोक्याजवळून तुटलेला तो पत्र्याचा फलक उडत गेला.सुदैवाने त्या स्वारास तो लागला नसल्याने या अपघातातून तो स्वार बालंबाल बचावला आहे.रेल्वे प्रशासनाचे सदरील पुलाच्या मार्गावरील उपरोक्त उल्लेखित बाबींकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.यामुळे सदरील मार्गावरुन ये जा करणाऱ्या वाहनधारकांना नाहक त्रास सहन करत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.पावसाळा सुरु होण्यापूर्वी याकडे लक्ष देऊन ही कामे करणे अत्यंत गरजेचे आहे.म्हणून रेल्वे विभागाच्या बेजबाबदार व अक्षम्य दुर्लक्ष करत असलेल्या अधिकाऱ्यांनी सदरील समस्या त्वरित सोडवाव्यात अन्यथा नागरिकांकडून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात येते आहे.