लोकशाही बळकट करण्यासाठी निर्भयपणे मतदान करुन टक्केवारी वाढवावी-प्रविण मेंगशेट्टी
८५-भोकर विधानसभा मतदार संघातील २ लाख ९१ हजार ३६१ मतदार हे १६-नांदेड लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणुक-२०२४ करिता बजावणार मतदानाचा हक्क
उत्तम बाबळे, संपादक
भोकर : देशाच्या १८ व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे बिगूल दि.१७ मार्च रोजी वाजले असून आदर्श आचारसंहिता अमंलबजावणीच्या अनुषंगाने १६-नांदेड लोकसभा मतदार संघ अंतर्गत च्या ८५- भोकर विधानसभा मतदार संघातील आचारसंहिता अंमलबजावणीच्या संदर्भाने दि.१८ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ‘लोकशाही बळकटीकरणासाठी मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावून टक्केवारी वाढवावी’ असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी,१६-नांदेड लोकसभा मतदार संघ तथा भोकर उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांनी केले आहे.
मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी दि.१७ मार्च २०२४ रोजी देशाच्या १८ व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे.देशात ७ टप्प्यात ही निवडणूक होणार असून दि.४ जून २०२४ रोजी मतमोजणीने निकाल घोषित होणार आहे.तर महाराष्ट्रातील ४८ मतदार संघासाठी ५ टप्प्यात मतदान होणार आहे.१६-नांदेड लोकसभा मतदार संघातील उमेदवारांसाठी दुसऱ्या टप्प्यात दि.२६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे.देशात सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झाली असून १६-नांदेड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत च्या ८५-भोकर विधानसभा मतदार संघातील आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीच्या अनुषंगाने दि.१८ मार्च २०२४ रोजी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, १६-नांदेड लोकसभा मतदार संघ तथा भोकर उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकर च्या बैठक सभागृहात पत्रकार परिषदत घेतली.यावेळी भोकर चे तहसिलदार सुरेश घोळवे,मतदान विभागांतर्गत चे कर्मचारी विशाल चौधरी,सिद्धार्थ सोनसळे,वर्षा डहाळे,मंडळ अधिकारी मनोज कंधारे,भोकर तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार बांधव व मुद्रनालय(प्रिंटिंग प्रेस) चालकांची उपस्थिती होती.
यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार दि.२३ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेली मतदार यादी होऊ घातलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी ग्राह्य असून ८५-भोकर विधानसभा मतदार संघात २ लाख ९१ हजार ३६१ मतदार नोंदणीकृत आहेत.यात १ लाख ४९ हजार ७४५ पुरुष, १ लाख ४१ हजार ६११ स्त्री,इतर ५ (तृतीय पंथी) व ८५ वर्ष वयापेक्षा अधिकचे ४६२८ आणि दिव्यांग २४९० मतदारांचा समावेश आहे.यावेळी होणार असलेल्या मतदान प्रक्रियेतील विशेष बाब म्हणजे ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व दिव्यांग मतदारांना धरुनही मतदान करता येणार असून त्यासाठी त्यांनी मतदान केंद्र संबंधित बी.एल.ओ.यांच्याकडे तसा माहितीचा फार्म (मतपत्रिका) भरून द्यावयाचा आहे.याच बरोबर मतदान प्रक्रियेतील कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण स्थळीच पोस्टल मतदान करता येणार आहे.
८५- भोकर विधानसभा मतदार संघातील भोकर,मुदखेड व अर्धापूर या तीन तालुक्यात एकूण ३४३ मतदान केंद्र असून यात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही.निवडणूक कार्यकाळा दरम्यान आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीच्या व उचित कार्यवाही च्या अनुषंगाने ३ एफ.एस.टी.आणि ४ एस.एस.टी.पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर निवडणूक प्रक्रिये दरम्यान ३८ झोनल अधिकारी व उपरोक्त मतदान केंद्रावर जवळपास २००० पोलिंग कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी हे त्या विधानसभा मतदार संघांतर्गचे नसून अन्यत्रचे राहणार आहेत.सर्व मतदान केंद्रावर पाणी,व्हीलचेअर उपलब्ध केले जाणार आहे.उमेदवार नामनिर्देशन अनामत रक्कम २५ हजार रुपये असून खर्च मर्यादा ९० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर मतदान करण्यासाठी मतदारांकडे मतदार ओळखपत्र किंवा अन्य ११ पुरावे असणे बंधनकारक राहणार आहे.उमेदवार, मतदार व नागरिकांच्या समस्या आणि तक्रार निवारणासाठी निवडणूक आयोगाने सक्षम,सी-व्हिजील सह अन्य काही ॲप्स उपलब्ध करून दिले आहेत,त्याचा उपयोग व वापर करावा असे सुचित करण्यात आले आहे.तसेच मुद्रकांनी (प्रिंटिंग प्रेस) कोणताही मजकूर,प्रसिद्धी पत्रके व फलके विना परवाना छापू नयेत,अन्यथा ते कारवाईस पात्र राहतील असे सांगण्यात आले आहे.यावेळी पत्रकार बांधवांनी किती उमेदवारांचे नामनिर्देशन वैध झाल्याने ईव्हीएम मशिन ऐवजी मतपत्रिकेने मतदान घेण्यात येईल ? असे विचारले असता ते म्हणाले की,जवळपास ३८४ उमेदवारांपर्यंत ईव्हीएम मशिन चा वापर करता येतो व यापेक्षा अधिक आले तर वरीष्ठांना याबाबत कळविले जाईल. यानंतर निवडणूक आयोग निर्णय घेईल व त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.याच बरोबर उमेदवार,प्रचारक, समर्थक,विविध पक्ष नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते,अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करुन निवडणूक प्रशासनास सहकार्य करावे आणि मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी,असे आवाहन ही उपरोक्त माहिती देतांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी,१६-नांदेड लोकसभा मतदार संघ तथा भोकर उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांनी केले आहे.