Wed. Dec 18th, 2024
Spread the love

थोर साहित्यीक शाहीर शंकर भाऊ साठे यांच्या ९९ व्या जयंती निमित्ताने… विनम्र अभिवादन!-संपादक

वाटेगाव ता.वाळवा जि.सांगली येथील अशिक्षीत मातंग कुटूंबात जन्मास आलेल्या व कसलाही शैक्षणीक वारसा नसलेले अक्षर शुन्यातून विश्वव्यापी लोकोपयोगी साहित्य निर्माण करणारे अक्षर साहित्याचे निर्माते विश्व साहित्य भुषण साहित्यरत्न सत्यशोधक अण्णा भाऊ साठे या प्रतिभावंत साहित्यीकाने उच्च कोटीचे अजरामर साहित्य लिहून निरक्षरतेचे मापदंड मोडीत काढले.तर लोकलढा, लोकचळवळ,लोकसंस्कृती व लोकोपयोगी नैतिकता मुल्य जपणा-या लिखाणाचा वारसा चालविण्यासाठी अण्णा भाऊ साठे यांनी दिलेली पेन वयाच्या ४० व्या वर्षी हाती धरुन १६ पुस्तके लिहून एका प्रतिभावंत साहित्यीकाच्या झुंजार लेखणीचा वारसदार असल्याचे साहित्य विश्वात ज्यांनी सिद्ध कले ते थोर साहित्यीक शाहीर शंकर भाऊराव साठे अर्थातच “अण्णा भाऊंचे भाऊ शंकर भाऊ ” यांचा आज दि.२६ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस आहे. त्यांच्या ९९ व्या जयंती निमित्ताने…

सन १९९४,बहुदा जानेवारी महिना होता.संयुक्त महाराष्ट्र निर्मिती चळवळीत सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांचा मोठा सहभाग होता.निजामाचे राज्य भारतात विलीन होण्यासाठी देश स्वातंत्र्यानंतर तब्बल एक वर्ष लागले व त्यांच्या आंध्र प्रदेशातून मराठवाडा मुक्त होण्यासाठी बरेच वर्ष लागले.तो भाग कसा आहे आणि येथील लोक कसे आहेत ? हे अभ्यासण्यासाठी शंकर भाऊ साठे हे आंध्र प्रदेश व महाराष्ट्र राज्य सिमावर्ती भागात आले होते.माझे वडील तेंव्हा मातंग समाज सुधारक समिती भोकर तालुकाध्यक्ष होते.वामनराव बाबळे हे या भागातील तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे शंकर भाऊ साठे यांनी आमच्या घरी दोन रात्रीचा मुक्काम केला.पहिल्या दिवशी बसने आंध्र प्रदेशातील मुधोळ (भोकर तालुका निर्मितीपुर्वी महाराष्ट्रातील भोकर चा तालुका मुधोळच होता) येथे गेलो.तेथील तहसिल कार्यालयास शंकर भाऊ साठे यांनी भेट दिली व काही माहीती घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी मी त्यांच्या सोबत होतो.सायंकाळी भोकर येथे परतलो व घरी मुक्काम केला.यावेळी माझे वडील व आमच्याशी त्यांनी मनमुराद चर्चा केली.यावेळी मी एम.कॉमच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होतो.त्यामुळे त्या रात्री शंकर भाऊ साठे यांना मी म्हणलो की आता थोडे “वाचन” करतो.तेंव्हा ते म्हणाले की,..” अरे बाबा..तुम्ही आजचे पोरं फक्त वाचता !” ठिक आहे,वाचन कर.दुसरा दिवस उजाडला व आम्ही तालुक्यातील काही गावांना भेटी देण्यासाठी गेलो.चार गावे फिरुन झाली.यातील शेवटच्या गावी मौ.बोरगाव ता.भोकर येथील माझे मित्र गितेश बोटलेवाड (कोळी समाजातील) यांच्या घरी त्यांच्या आईने हातावर केलेली भाकरी,पिटले (झुनका) व हिरव्या मिरचीच्या ठेच्याचे जेवन आम्ही केलो.परत भोकरला मुक्काम व दुस-या दिवशी सकाळी शंकर भाऊ साठे लातूरच्या दिशेने रवाना झाले.यानंतर सन १९९५ ला ते पुन्हा एकदा भोकरला आले होते.फेब्रुवारी महिन्यातला दुसरा आठवडा होता.यावेळी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीची धामधूम सुरु होती.१७२-भोकर विधानसभा मतदार संघातून देशमुख बालासाहेब उर्फ बाबासाहेब देशमुख गोरठेकर,डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर,नागनाध घिसेवाड या तिघांत मुख्यत्वाने लढत होत होती.त्या अनुशंगाने शंकर भाऊ साठे यांनी नागनाथ घिसेवाड यांच्या प्रचार कार्यालयास भेट दिली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्यांनी त्यांना ओळखले नव्हते. त्यावेळी मी भारिपचा तालुका उपाध्यक्ष होतो.योगायोगाने मी तेथे उपस्थित होतो.जुनीच ओळख असल्याने मी त्यांना त्या गर्दीत ओळखलो व नागनाथ घिसेवाड यांच्याकडे नेलो. शंकर भाऊ साठे हे थोडा वेळ तेथे बसले व तेथे उपस्थित असलेले तत्कालीन भारिपचे तालुकाध्यक्ष पत्रकार एल.ए.हिरे,ओबीसी नेते नागाेराव शेंडगे यांसह आदी कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.यावेळी ते म्हणाले की,” मागासवर्गातील एका अतिशय गरीबीतून आलेल्या कुटूंबातलं पोर बलाढ्य अशा पाटील, देशमुखांच्या विरुद्ध लढत देत आहे आणि तो तरुण कोण व कसा आहे ? हे पाहण्याची उत्सुकता झाल्याने मी येथे आलो आहे.” त्यांनी नागनाथ घिसेवाड यांच्याशी चर्चा केली व मुक्तहस्ते आशिर्वाद दिला.एका महान साहित्यीकाचा भाऊ असल्याच्या बडेजावी लवलेश ही त्यांच्यात नव्हता. त्यामुळे कसलाही पाहुणचार त्यांनी यावेळी घेतला नाही व काही गावांना भेटी देण्यासाठी ते पुढे निघाले.यावेळी देखील मी त्यांच्या सोबत गेलो व शंकर भाऊंचा रात्रीचा मुक्काम परत आमच्या घरी झाला.यावेळी ते नांदेडला परत गेलेत असे सांगण्यात आले.परंतू ते गेले नव्हते तर भोकर येथे आमच्याकडेच मुक्कामी थांबले होते. निवडणूकीचा कार्यकाळ होता व त्यामुळे नाहक प्रचार सभेस बोलावल्या जाईल असे वाटल्याने तसे सांगण्यात आले होते.परंतू त्यावेळी या भागात त्यांना कोणीही ओळखत नव्हते म्हणून भेटण्यासाठी कोणी आले नव्हते व त्यांच्या सुचनेवरुनआम्ही देखील ते आल्याचे कोणास सांगीतलो नव्हतो.ही एक मोठी चुक आमच्या हातून झाल्याची खंत अख्खी हयात राहणार आहे.दुस-या दिवशी ते नांदेडला गेले.आमचे सुदैवच म्हणावे की शंकर भाऊ साठे यांचा सहवास आम्हास दुस-यांदा लाभला.

साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे सहकारी स्व.बाळू साठे व मी

यानंतर वाटेगावी जाण्याची माझी उत्सुकता वाढत गेली. सीहित्यरत्न सत्यशोधक अण्णा भाऊ साठे व त्यांचे लहान भाऊ साहित्यीक शंकर भाऊ साठे यांच्या विषयी ज्यांच्या कडून जी माहिती मिळेल ती मिळविण्याचा व  लिखीत असलेल्या मजकूरातून अभ्यासण्याचा प्रयत्न करत राहिलो.या दरम्यान सन २००४ ला वाटेगावला जाण्याचा योग आला.परंतू त्यावेळी शंकर भाऊ साठे हे तेथे नव्हते,त्यांनी ८ वर्षापुर्वीच या जगाचा निरोप घेतलेला होता.सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या सुनबाई श्रीमती सावित्रीबाई मधूकर साठे यांचा परिचय झाला व पुढे माझी ही ओळख त्यांचा मानस(मानलेला) भाऊ म्हणून झाली.श्रीमती सावित्रीबाई साठे यांचा माझ्या माध्यमातून मराठवाड्यात प्रवास सुरु झाला. साहित्यरत्न सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांचे जयंती सोहळे व आदी कार्यक्रमां निमित्त त्यांची ये जा सुरु झाली.यामुळेच पुढे सन २०१२ ला ऑगस्ट महिन्याच्या २९ तारखेला सत्यशोधक अण्णा भाऊ साठे व शाहीर शंकर भाऊ साठे यांच्या कनिष्ठ भगिणी श्रीमती जाईबाई तुकाराम भगत,घाटकोपर,मुंबई येथून सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्या निमित्ताने प्रमुख अथिती म्हणून भोकरला आल्या.यावेळी त्यांच्या सुनबाई श्रीमती सुमनबाई भगत व श्रीमती सावित्रीबाई मधूकर साठे यांची देखील प्रामुख्याने उपस्थित होत्या.तिघींचा ही तीन दिवस भोकर येथे माझ्याकडे मुक्काम होता.यावेळी श्रीमती जाईबाई भगत यांनी अण्णा भाऊ व शंकर भाऊ या दोन भावांविषयीचे अनेक अलिखीत पैलू उलगडले.सत्यशोधक अण्णा भाऊ साठे व शाहीर शंकर भाऊ साठे यांच्या समवेत ज्यांनी काम केलं ते वाटेगावचे बाळू साठे यांची देखील माझी भेट झाली होती.त्यांनी देखील या दोन भावांविषयी काही माहिती दिली.

दि.२६ ऑक्टोबर १९२५ रोजी वालूबाई भाऊराव साठे यांच्या पोटी वाटेगाव ता.वाळवा जि.सांगली येथे शंकर भाऊ साठे यांचा जन्म झाला.काटेरी निवडूंगाच्या फडात असलेल्या साठे कुटूंबांने ससत काटेरी वाटेवरुनच जीवन प्रवास केलेला असल्याने शंकर भाऊ साठे यांना ही जीवनात टोचलेल्या काट्यांच्या वेदना सहनच कराव्या लागल्या.आजोबा सिद्धोजी राघोजी साठे हे मुंबईत बांधकामाचे कंत्राटदार होते.गावाकडे त्यांनी ५४ एकर जमीन खरेदी केली होती.मात्र ती जमीन नंतर टाकवे गावच्या एका गावगुंडाने जबरदस्तीने ताब्यात घेतली. म्हणून साठे कुटुंबाचे सिद्धोजी साठेंच्या मृत्यूनंतर प्रचंड हाल झाले.सिद्धोजी साठे यांना भाऊराव हा एकच मुलगा.अठरा विश्व दारिद्र्याचे गाठोडे घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी भाऊराव साठे हे सहकुटूंब मुंबईत आले होते.यावेळी भाऊराव साठे यांनी शंकर भाऊ साठे यांना मुंबईतील एका शाळेत टाकले.परंतू त्या शाळेत त्यांचे अवघे १५ दिवसाचेच शिक्षण झाले.पुढे वाटेगाव येथील शाळेत जेमतेम २ री पर्यंतचे शिक्षण झाले. वास्तविक पाहता यास शिक्षण व ते शिक्षीत झाले असे म्हणने योग्य नव्हे.हे शिक्षण म्हणजे केवळ अक्षर ओळख होती.त्यांनी पुढे जे शिक्षण घेतले ते या जगाच्या अनुभव कार्यशाळेतच.सन १९३९ ला वडील भाऊराव साठे वारले. दि.१० जून १९५६ ला आई वालूबाईंचे निधन झाले.तर दि.१८ जुलै १९६९ रोजी जेष्ठ बंधू साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे निधन झाले.आणि दि.७ ऑक्टोबर १९६६ ला त्यांच्या सुविद्य पत्नी जनाबाई यांचे शेवटच्या बाळंतपणातच निधन झाले.आशा,उषा,चित्रा,रेखा आणि जयश्री उर्फ शालिनी अशा पाच मुली आणि मुलगा संजय ही त्यांची सहा अपत्य. पत्नी जनाबाईंच्या निधनानंतर शंकर भाऊ साठे यांनी आई व वडील अशा दोन्ही भूमीका बजावत मुलांची सांभाळ केली.पुढे मुलगा संजय साठे यांचा अपघाती मृत्यू झाला.विधवा सून गीताबाई संजय साठे व नातू सचिन आणि पंकज यांची जबाबदारी ही त्यांच्यावर पडली.स्व.संजय शंकर भाऊ साठे 

मोठे बंधू अण्णा भाऊ साठे हे मुंबईत गिरणी कामगार बनले होते.यामुळे शंकर भाऊ साठे यांनाही मुंबईतील करीमभाई मिलमध्ये नोकरी मिळाली.अण्णा भाऊ साठे यांचे कम्युनिष्ट चळवळीशी नाते जुडले.त्यामुळे शंकर भाऊ साठे हे देखील ‘काॅम्रेड’ बनले व शाहीर झाले. अण्णा भाऊ साठे यांच्या निर्वाणानंतर शंकर भाऊ साठे यांचे खुप हाल झाले.अनेक दुःख पचवून शंकर भाऊ साठे यांनी अखेरच्या श्वासा पर्यंत अत्यंत निष्ठेने जीवन जगले.माझे मित्र साहित्यीक प्रा.मारोती कसाब यांनी शाहीर तथा थोर साहित्यीक शंकर भाऊ साठे यांचे साहित्य व जीवन या विषयावर पीएचडी करण्याचे करण्याचे निश्चित केले असता अभ्यास दौरा करत असतांना त्यांनी शंकर भाऊ साठे यांच्या विषयी माहिती जाणून घेण्यासाठी माझ्याकडून श्रीमती जाईबाई भगत यांचा पत्ता व संपर्क नंबर घेतला आणि ते घाटकोपर मुंबई येथे गेले.यावेळी जाईबाई भगत यांचे नातू गणेश भगत यांनी त्यांना घरी नेले.या भेटी दरम्यान जाईबाई भगत यांनी शंकर भाऊ साठे यांच्या विषयी अनेक अलिखीत पैलू उलगडले.पीएचडी चा अभ्यासपुर्ण प्रबंध पुर्णत्वास आला.प्रा.मारोती दशरथ कसाब यांनी ‘शंकरभाऊ: व्यक्तित्व आणि वाड्मयीन कर्तृत्व’, या विषयावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून पीएचडी प्राप्त केली व ते डॉक्टरेट( विद्यावाचस्पती ) झाले.या प्रबंध वजा जीवन चरित्र व साहित्य संपदेचा लेखाजोखा म्हणून हे ऐतिहासीक दस्तावेज पुस्तक रुपात प्रकाशात आला आहे. शंकर भाऊ साठे यांचा सहवास व सहकार्य लाभलेले प्रख्यात जेष्ठ साहित्यीक बाबूराव गुरव यांनी यास प्रस्तावना दिली आहे.
” त्यात त्यांनी शंकरभाऊंचा स्वभाव नीतळ,सरळ,पारदर्शी, निरागस,विनोदी.अतिशय सहनशील,कष्टाळू,हसतमुख,संयमी, चिवट.एरवी जीवनात मूकपणा स्वीकारलेले,अंतर्मुख विनम्र व्यक्तिमत्व.मिळेल ते खाणारे.जागा मिळल तिथं बसणारे, झोपणारे.मिळालेलं जीवन बिनतक्रार जगणारे.स्वत:च्या दु:खावर वेदनेवर विनोद करणारे.जीव लावणारे.मैत्रीला, स्मरणाला पक्के.विनम्र कलावंत होते.सोंगाड्यापासून मिळेल ती भूमिका तडीस नेण्याची कुवत.पण,अण्णा भाऊ,अमर शेख,दत्ता गव्हाणकर असे ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध शाहीर नेहमीच मंचावर असल्याने त्यांना दुय्यम भूमिका मिळायची. पण हाडाचे कसलेले कलावंत,दांडगं पाठांतर,संयोजक, दिग्दर्शक,निर्माता होण्याची कुवत.प्रसंगी सारे वगनाट्य खेचून नेण्याची क्षमता शकर भाऊंमधे होती.असे सांगीतले आहे.तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी साहित्याचा वारसा चालविण्याचं उत्तरदायीत्व शंकर भाऊ यांच्याकडे दिले आहे. अण्णा भाऊ साठे हे जीवघेण्या मोठ्या आजारातून कसंबसं बाहेर पडत होते. आपण उठून नव्याने जास्त काही करु ? ही आशा मावळत चालली आहे हे त्यांना कळत होते.यामुळे  १९६८ ला एका दिवशी अण्णा भाऊंनी शंकर भाऊंना जवळ घेतलं व ते म्हणाले की,‘शंकर तू माझी सावली.तू प्रतिअण्णाच आहेस.आजपर्यंत तू माझी चांगली साथ केलीस.माझा शब्द झेललास,राग पेललास,त-हा सांभाळलास आपण तत्वासाठी जगलो.शोषणमुक्तीसाठी लढलो.समाजवादी सत्तेसाठी रक्त आटवले.एक दिवस समतेचा,ममतेचा व मानवतेचा उगवणारच आहे.आपल्या सारख्या किती पिढ्या जातील सांगता येत नाही. शिवराय लढले.फुले,शाहू,आंबेडकर यांचे समतेचे तत्वज्ञान सातत्याने मांडत राहीले.मार्क्स,लेनिन,डांगे कष्टक-यांची फळी बांधताहेत.आपण लहान माणसं पण आपला त्याग महान आहे.त्याचा अभिमान धर! खंड पडू देऊ नकोस. मी थकलो.हा माझा आवडता “पेन” धर.लिहायला सुरुवात कर! तू चांगला लेखक होणार आहेस.शब्द विकू नकोस.नको ते लिहू नकोस. माझ्या मार्गावरुन चल. नैतिक लेखकांचा भविष्यकाळ उज्वलच असतो.लोकलढा,लोकसंस्कृती,लोकचळवळ हाच आपला चिंतनविषय,लेखनविषय.” आहे,असे लिहले आहे.शंकर भाऊ साठे यांच्या सूनबाई स्व.गीताबाई संजय साठे,नातू सचिन साठे,अण्णा भाऊ साठे यांच्या नाती व मी

लोक स्थावर व जंगम मालमत्तेचे वारसदार आपल्या नातेवाईकांना करतात.परंतू साहित्यरत्न सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांनी शुद्ध,पवित्र भावनेचा व वैचारीक साहित्यसंपदेचा वारसा पुढे नेण्याचे दायीत्व शंकर भाऊ साठे यांच्यावर सोपविले.काबाडकष्टाचं धावपळीचं जगणं.आवश्यक गरजा भागवण्यासाठी लागणारी साधनसामग्री जमा करण्यातच हयात खपलेली.रोजीरोटीचा सवाल रोजच टांगलेला.यातच क्रमाक्रमाने घरात ओढवलेले नातेवाईकांचे मृत्यू.यामुळं शंकर भाऊ कागद पेनकडे वळले तेव्हा त्यांनी वयाची चाळीशी पार केलेली होती.अण्णा भाऊ साठेंनी पेन सोपविल्या नंतर शंकर भाऊ साठे यांची लेखनप्रतिभा लक्षात यायला खूपच उशीर झाला होता.वयाची चाळीसी उलटली होती.परंतू मोठ्या भावाने जी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती,ती नव्या जोमाने समर्थपणे पुढे नेण्यासाठी शंकर भाऊ साठे हे लिखान कार्याकडे वळले.सर्व प्रथम त्यांनी आपल्या महान साहित्यीक भावाच्या संघर्षमयी जीवनकार्यावर ” माझा भाऊ अण्णा भाऊ ” हा चरित्रग्रंथ लिहला.त्याचे प्रकाशन १ ऑगस्ट १९८० रोजी सुगावा प्रकाशन पुणे यांनी केले.पुढे एकच काडतूस(१ मे १९८४),सूड (२१ ऑक्टोबर १९८५),घमांडी (१२ जून १९८६),काळा ओढा(१४ जानेवारी १९८७), सगुणा(२६ फेब्रुवारी १९८७), हंबीरा (६ मार्च १९८९), जग(६ मार्च १९८९),सावळा (६ मार्च १९८९),लखू (१६ मे १९९१),बायडी (१६ मे १९९१),बाजी ( १५ जानेवारी १९९२),सुगंधा (१६ मे १९९१),या कादंब-या विद्यार्थी प्रकाशन,१७८/ब,पर्वती, पुणे-९ यांनी प्रकाशित केल्या.तर कुराडीचा घाव ही कथा ऑक्टोबर १९७८ ला कोल्हापूर येथील सा.बहुजन समाज च्या दिवाळी अंकांत प्रकाशित झाली.तसेच आम्हीही माणसे,आहोत!, राणोजी,या कथा अप्रकाशित राहिल्या.विसरु नका (१९७८) हे निवडणूक प्रचारगीत अप्रकाशित राहीले. याच बरोबर अनेक स्फूट वैचारिक लेख,लावण्या,गीते अप्रकाशित राहिले.

श्रीमती जाईबाई भगत यांच्याशी मी संवाद साधला होता. तेंव्हा त्या म्हणाल्या होत्या की,शंकर भाऊ साठे यांनी लोक प्रबोधनात्मक अनेक गीते व लावण्या लिहल्या. त्यापैकी काही गीतांना व लावण्यांना त्यांनी चाल दिली होती.तसेच विद्यार्थी प्रकाशन,पुणे यांनीच केवळ शंकर भाऊ साठे यांच्या साहित्य प्रकाशनास न्याय दिला.अन्य कोणीही न्याय न दिल्याने त्यांचे हे साहित्य अप्रकाशित राहीले.तर बाळू साठे यांनी सांगीतलं होतं की, लालबावटा कलापथक,अण्णा भाऊ-अमरशेख लोकनाट्य तमाशा मंडळ,इप्टा थियटर,दत्ता गव्हाणकर कलापथक,अमर कलापथक,अण्णा भाऊंचे चित्रपट अशा आदी रंगमंचीय कलामंचावर शंकर भाऊ साठे यांनी लहान-मोठ्या अनेक भूमीका समर्थपणे वठवल्या. यावेळी मला देखील काही ठिकाणी त्यांच्यामुळेच संधी मिळाली.शंकर भाऊ साठे यांनी लोककलेची केलेली सेवा ही दखलपात्र आहे.परंतू या जगतातील अनेक बेउपकारी लोकांनी शाहीर म्हणून किंवा एक साहित्यीक म्हणून ना कलेची ना साहित्याची म्हणावी तशी दखल घेतली आहे.याची माझ्यासह अनेकांना खंत आहे.आज घडीला शंकर भाऊ साठे यांच्या भगिणी जाईबाई भगत व त्यांचे सहकारी बाळू साठे हे दोघेही हयात नाहीत.ते असते तर विश्व भुषण प्रतिभावंत साहित्यीकाच्या लेखणीचा वारसदार असलेल्या ” अण्णा भाऊंचा भाऊ शंकर भाऊ ” यांच्या विषयी अनेक अलिखीत बाबी प्रकाशात आल्या असत्या.

आज घडीला या लेखणीच्या वारसदाराचे वारस म्हणून लोकन्यायार्थ ” प्रथम मानवहित लोकशाही पक्षाच्या माध्यमातून व आता अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेचे प्रमुख म्हणून त्यांचे नातू सचिन संजय साठे व जाईबाई भगत यांचे नातू गणेश भगत हे ” सामाजिक,राजकीय व वैचारीक चळवळ पुढे नेत आहेत.थोर साहित्यीक शंकर भाऊ साठे हे जेंव्हा मला म्हणाले होते की,” तुम्ही तरुण नुसते वाचता !,” तेव्हा त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला नक्कीच कळाला नव्हता.परंतू अनेक दिवस व वर्ष याबाबदतचा अर्थ शोधत बसलो तेंव्हा कुठे कळाले की ते तसे का म्हणाले होते.याचा अर्थ असा की,तुम्ही केवळ जगता.जगण्यासाठी केवळ वाचले नाही पाहिजे,आपल्या वाचनातून अनेकांना समर्थपणे जगण्यासाठीचे काही करता आले तर ते करायलाच पाहिजे,असे होते.साठे कुटूंबातील या दोन्ही महान साहित्यीकांनी अनेकांना जगण्यासाठी बळ देणारे व योग्य दिशा दर्शविणारे साहित्य निर्माण केले आहे.

शंकर भाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे व मी

थोर साहित्यीक शंकर भाऊ साठे यांनी दि.१५ मार्च १९९६ रोजी या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे.माझे भाग्य की मला या महान साहित्यीक,कलावंत,शाहीराचा भले ही ४ दिवसाचाच का होईना सहवास लाभला आणि या ओजस्वी, तेजस्वी,व्यक्तीमला पाहता आले.काही शिकता आले.आज या महान व्यक्तीमत्वाचा जन्मदिवस आहे.९९ व्या जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस माझे व माझ्या परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन !

उत्तम वामनराव बाबळे
*संपादक
* साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण
*प्रदेशाध्यक्ष -अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन, महाराष्ट्र राज्य


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !