Thu. Dec 19th, 2024
Spread the love

स्वराज्य जननी राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्त लेखिका सौ.रुचिरा बेटकर यांचा लेख वाचकांसाठी – संपादक

अंबुज प्रहार विशेष
पराक्रमाची गाथा-माॅं जिजाऊ माता…!

अनंत काळापासून जेंव्हा जेंव्हा गरज पडली आहे तेंव्हा तेंव्हा नारी शक्तीने आपला अवतार घेतला आहे हे वाक्य राजमाता जिजाऊ संदर्भात घेतलं तर काही वाव ठरणार नाही.महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली तलवार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला.त्या विश्वमाता,राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना जयंती निमित्ताने विन्रम अभिवादन आणि मानाचा मुजरा!

१२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा येथे माॅंसाहेब जिजाऊंचा जन्म झाला.त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई जाधव असे होते.लखुजी जाधव हे देवगिरी घराण्याचे वंशज होते.१६०५ मध्ये जिजाऊंचा दैलताबादमध्ये शहाजी राज्यांशी विवाह झाला.१९ फेब्रुवारी १६३० रोजी माँसाहेब जिजाऊ यांच्या पोटी पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.आपल्या पतीचं स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी पुत्र शिवबाच्या मनात पेरलं.नुसतं पेरलं नाही तर सुसंस्कारांच्या अमृतसिंचनाने ते फुलवलं.फुलवून वाढवलं.त्याला दृष्ट लागू नये म्हणून डोळ्यात तेल घालून जीवापाड जपलं.त्याला नवनवी पानं फुलं दिली.राजमाता जिजाऊंच्या शिकवणीच्या आणि सुसंस्काराच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी हजार वर्षाची गुलामगिरी मोडून काढली आणि राजमाता जिजाऊ यांचे स्वप्न साकार करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान,चातुर्य,चारित्र्य,संघटन कुशलता व पराक्रम अशा राजस आणि सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या आपल्या सर्वांच्या माता या राजमाता जिजाऊ होत.माँसाहेब जिजाऊनी दिलेल्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी राजे घडले…
छत्रपती शिवराय जन्माला येण्या आधी जिजाऊंनी स्वतः ला स्वराज्यविचारी,संकल्पक,कर्तव्यदक्षी प्रशासक,थोर मुत्सद्दी, राजकारण धुरंधर आणि पराक्रमाच्या अखंड परंपरेला मोडून काढायच्या म्हणून त्या घडल्या.आजची परिस्थिती पाहता एक भीषण दृश्य आपल्याला पाहायला मिळते आहे.ज्या वयात आपल्या मुलांची शरीर बळ स्थळ बलवान बनवण्यासाठी व्यायामाची गरज असते त्या काळात मुलांना मोबाईल घेऊन दिला जात आहे आणि स्वतःच्या जबाबदारी पासून मोकळे होत आहेत.यामुळेच आजची मुलं ही खूप हट्टी आणि आळशी बनत आहेत,मात्र ही गोष्ट त्यांच्या लक्षात येई पर्यंत बराच उशीर झालेला असतो.त्यामुळे संस्कार शुन्य पिढी आजच्या स्थितीत घडत आहे.याचा परिणाम असा होतो आहे की,स्त्री जातीच्या अवहेलनाचे चित्र आसपास दिसत आहेत.
जिजाऊ यांनी अखंड पणे स्त्री जातीचा आदर आणि सन्मान करण्यासाठी ची शिकवण छत्रपती शिवाजी राजे यांना दिली आहे.तो आदर्श प्रत्येक मातेने घेतला पाहिजे. काही अंशी जरी घेतला तरी एक चांगली पिढी घडविण्यास नक्कीच दिशा मिळू शकते.तो घेण्याचा प्रयत्न करणे हिच खरी मानवंदना ठरेल.या प्रेरणादायी  पराक्रमी वीर मातेस जयंती निमित्ताने कोटी कोटी त्रिवार मानाचा मुजरा!
सौ.रूचिरा बेटकर
लेखिका,नांदेड
९९७०७७४२२१


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !