३ जानेवारीला राजेंद्र खंदारे व राजश्री पाटील हे राज्यस्तरीय सेवा समर्पण पुरस्काराने होणार सन्मानित
तर प्राचार्य संजय सावंत देशमुख व डॉ.मनिषा रामेश्वर भाले लोकसंवाद पुरस्काराने सन्मानित होणार
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकर येथे दि.३ जानेवारी रोजी २० व्या राज्यस्तरीय लोकसंवाद साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून होऊ घातलेल्या साहित्य संमेलनात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुख्यमंत्री कार्यालय,मंत्रालय मुंबई येथील सेवारत प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खंदारे व गोदावरी समुहाच्या अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या राजश्री हेमंत पाटील यांना राज्यस्तरीय सेवा समर्पण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती सेवा समर्पण परिवारचे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड यांनी दिली.तर श्री शाहू विद्यालयाचे प्राचार्य संजय सावंत देशमुख व संजिवनी हॉस्पिटल च्या सेवाभावी डॉ.मनिषा रामेश्वर भाले यांना राज्यस्तरीय लोकसंवाद पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी दिली आहे.
श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकर येथे दि.३ जानेवारी २०२४ रोजी २० व्या राज्यस्तरीय लोकसंवाद साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील साहित्य संमेलनात खा.रविंद्र चव्हाण,संमेलनाध्यक्ष पदी साहित्यिक प्रा.महेश मोरे,आ.हेमंत पाटील,आ.राजेश पवार,आ.रामराव पाटील(म्हैसा,तेलंगणा राज्य),स्वागताध्यक्ष शिरिष देशमुख गोरठेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच यावेळी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक कैलास देशमुख गोरठेकर,माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,उद्योजक मारोतराव कवळे,गोविंदराव सिंधीकर, डॉ.यु.एल.जाधव,नंदकुमार तुप्तेवार,प्राचार्य डॉ.पंजाब चव्हाण, जेष्ठ पत्रकार संजीव कुळकर्णी,प्रकाश भिलवंडे,प्रभाकर कानडखेडकर,नामदेव आयलवाड,पृथ्वीराज तौर,माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील,माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड,पांडुरंग देशमुख,सुधीर गुट्टे,गणेश पाटील कापसे यांसह आदी मान्यवर ही उपस्थित राहणार आहेत.
सेवा समर्पण परिवार भोकर च्या वर्धापन दिनानिमित्त गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपसणाऱ्या सेवाभावी व्यक्तीमत्वांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.यावर्षी प्रशासकीय नौकरी क्षेत्रात राहूनही,सामाजिक, शैक्षणिक,ग्राम स्वच्छता यांसह आदी क्षेत्रात सेवाभावी कर्तव्य बजावणारे मंत्रालय मुंबई येथील सेवारत प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांना राज्यस्तरीय प्रशासकीय सेवा समर्पण पुरस्कार व गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी आणि गोदावरी समुहाच्या अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या सौ.राजश्री हेमंत पाटील यांना राज्यस्तरीय महिला विकास सेवा समर्पण पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात येऊन सन्मानित करण्यात येणार आहे.सदरील पुरस्काराचे स्वरूप रोख ११ हजार, मानपत्र,सन्मानचिन्ह असे राहणार आहे.अशी माहिती सेवा समर्पण चे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड यांनी पत्रकार परिषदेत दिली असून या पत्रकार परिषदेस सचिव विठ्ठल फुलारी,प्रा.उत्तम जाधव,रवि देशमुख यांसह आदींची उपस्थिती होती.
तसेच होऊ घातलेल्या याच साहित्य संमेलनात ग्रामीण भागातील गरीब,होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे शिक्षण क्षेत्रातील सेवाभावी व्यक्तीमत श्री शाहू विद्यालयाचे प्राचार्य संजय सावंत देशमुख आणि ग्रामीण भागातील स्त्रियांचे आरोग्य खुप चांगले राहिले पाहिजे,त्यांना तातडीच्या वैदयकीय सेवा मिळाली पाहिजे,त्यांच्या आजाराच निदान हे वेळेवर झालं पाहिजे तथा आरोग्य सेवा कमी दरात उपलब्ध झाल्या पाहिजेत,असे स्वप्न उराशी बाळगून संजीवनी हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो स्त्रीया,गरोदर माता, स्तनदा माता यांना उत्तम सेवा देणाऱ्या सेवाभावी डॉ.मनिषा रामेश्वर भाले यांना राज्यस्तरीय लोकसंवाद पुरस्कार प्रदान करण्यात येऊन सन्मानित करण्यात येणार आहे.अशी माहिती साहित्य संमेलनाचे आयोजक साहित्यिक दिगंबर कदम यांनी दिली आहे.
उपरोक्त पुरस्कारांनी सन्मानित होणाऱ्या सर्व सेवाभावी व्यक्तीमत्वांचे संपादक उत्तम बाबळे यांचे वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील सेवाकार्यासाठी मनापासून खुप खुप शुभेच्छा!