हाडोळीचे स्वातंत्र्य सेनानी स्व.गंगाधर कोलुरे यांच्यावर करण्यात आले शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भारतीय स्वातंत्र्य व मराठवाडा मुक्तीसंग्रामात मोलाचे योगदान असलेल्या स्मार्ट व्हिलेज हाडोळी ता.भोकर येथील रहिवासी स्वातंत्र्य सेनानी गंगाधर गंगाराम कोलुरे यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी दि.२० जानेवारी २०२५ रोजी रात्री ११:०० वाजताच्या दरम्यान राहते घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर दि.२१ जानेवारी २०२५ रोजी दुपारी हाडोळी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भोकर चे तहसिलदार विनोद गुंडमवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र औटे यांनी महसूल व पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.तसेच नांदेड पोलीस दलाच्या पथकाने बंदुकीच्या गोळ्या हवेत झाडून सलामी दिली.
स्वातंत्र्य सेनानी स्व.गंगाधर कोलुरे यांचे भारतीय स्वातंत्र्य व मराठवाडा मुक्तीसंग्रामात मोलाचे योगदान होते.त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी घेतली नव्हती.परंतू औषधी वनस्पती व आयुर्वेदिक औषधीचे त्यांना ज्ञान उपजत होते.या माध्यमातून त्यांनी पंचक्रोशीतील गरीब,होतकरु रुग्णांनवर औषधोपरचार करुन वैद्यकीय सेवा दिली आहे.तसेच समाजसेवेत ही त्यांचे उल्लेखनीय कार्य असल्याने त्यांना मानणारा वर्ग येथे खुप मोठा आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,सूना व नातवंडे असे मोठा परिवार आहे.
अंत्यसंस्कार समयी बाजार समितीचे संचालक सुभाष पाटील किन्हाळकर,सुरेश देशमुख कामनगावकर, संचालक किशोर पाटील लगळूदकर,अत्रिक पाटील मुंगल,सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष माधवराव अमृतवाड यांसह तालुका व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत नागरिक,कुटूंबिय, नातेवाईक,स्नेहिजण आणि गावकऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.अंबुज प्रहार न्युज लाईव्ह च्या वतीने स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय गंगाधर कोलुरे यांना संपादक उत्तम बाबळे यांची भावपुर्ण श्रद्धांजली!