नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मविआ चे प्रा.रवींद्र चव्हाण यांचे नामनिर्देशन दाखल
भाजपा तथा महायुतीचा उमेदवाराची अद्यापही निश्चिती झाली नाही
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : होऊ घातलेल्या १६-नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून प्रा.रवींद्र चव्हाण यांचे नाव झाले व दि.२४ ऑक्टोबर रोजी त्यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे.तर महायुतीचा घोळ संपला नसून अद्यापही उमेदवाराचे नाव निश्चित झाले नाही.
नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे दुर्दैवी निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली. त्यामुळे होऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकी सोबतच १६-नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही होत आहे.त्या अनुषंगाने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने स्व.खा.वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्रा.रवींद्र चव्हाण यांनाच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निश्चित केले आहे.दि.२४ ऑक्टोबर २०२४ रोजी मविआचे उमेदवार म्हणून प्रा. रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे मुहूर्तावरचे पहिले नामनिर्देशन निवडणूक निर्णय अधिकारी तथा नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे दाखल केले आहे.यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नांदेड महानगर शहराध्यक्ष माजी महापौर अब्दुल सत्तार, नायगाव तालुकाध्यक्ष संजय बेळगे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रविंद्र भालेराव यांची उपस्थिती होती.तर महायुतीचा घोळ संपला नसून भाजपाने अद्यापही उमेदवार निश्चित केला नाही.