Wed. Dec 18th, 2024

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रा.रविंद्र चव्हाण विजयी

Spread the love

फेर मतमोजणी झाली नाही-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : १६-नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा.रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ.संतुकराव मारोतराव हंबर्डे यांचा १४५७ मतांनी पराभव केला आहे. सहा महिन्यापूर्वी काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे दुर्दैवी निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यांचे चिरंजीव प्रा.रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी चुरशीच्या लढतीत ही जागा कायम ठेवली आहे. 

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणुकीमध्ये केरळमधील वायनाड व महाराष्ट्रातील १६-नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली होती.जवळपास २५ वर्षानंतर नांदेड येथे एकाचवेळी लोकसभा व विधानसभा निवडणुका झाल्यात.त्यामुळे या निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान झाले.गेल्यावेळी ६१ टक्के मतदान झालेल्या लोकसभेमध्ये पोटनिवडणुकीत ६७.८१ टक्के मतदान झाले.शेवटच्या काही फेऱ्यामध्ये त्यांनी मताधिक्य मिळवत ही जागा काँग्रेसकडे कायम ठेवली.प्रा.रविंद्र चव्हाण यांना ५ लाख ८६ हजार ७८८ मते मिळाली तर डॉ.संतुकराव हंबर्डे यांना ५ लाख ८५ हजार ३३१ मते मिळाली.तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे ॲड.अविनाश विश्वनाथ भोसीकर यांना ८० हजार १७९ मते मिळाली.

फेरमतमोजणी झाली नाही-निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
मतमोजणी दरम्यान पहिल्या फेरीपासून अटीतटीच्या ठरलेल्या या निवडणुकीत ईव्हीएमच्या मतासोबतच पोस्टल मतेही निर्णायक ठरली.या पोटनिवडणुकीची फेरमतमोजणी झाल्याची बाहेर चर्चा होती.अनेकांनी समाज माध्यमांतून फेर मतमोजणी होत असल्याचे व्हायरल ही केले.परंतू तशाप्रकारे कुठलीही फेरमतमोजणी झाली नसल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे.ईव्हीएमच्या २७ फेऱ्या व पोस्टल मतांची मोजणी याद्वारे पुर्णता पारदर्शक पद्धतीने मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करून निकाल जाहीर करण्यात आला आहे.या प्रक्रियेवर निवडणूक आयोगाने नेमलेल्या दोन वरिष्ठ निवडणूक निरीक्षकांचे सनियंत्रण होते.निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिकृत फेरीनिहाय मिळालेल्या मतांची संख्या घोषित करण्यापूर्वी उमेदवारांचे प्रतिनिधींनी त्यांच्याकडील अधिकृत नसलेली आकडेवारी बाहेर सांगितली.त्यामुळे संभ्रम निर्माण झाला.परंतू पारदर्शी पद्धतीने पूर्ण कार्यवाही करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडून यंत्रणेचे व मतदारांचे आभार

होऊ घातलेल्या नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकी दरम्यान गेल्या दीड महिन्यांपासून प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.तसेच यावर्षी मोठ्यासंख्येने नागरिकांनी निर्भयपणे केलेल्या मतदानातून टक्केवारी ही वाढली.त्यामुळे यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी आणि नागरीकांचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आभार मानले आहेत.तसेच जिल्ह्यामध्ये लोकसभेसोबतच नऊ विधानसभा निवडणूक पार पडली.ही सर्व प्रक्रिया शांततेत पार पडली असून त्यासाठी सहकारी अधिकारी,पोलीस प्रशासन,राज्य व केंद्र शासनाचे कर्मचारी तसेच माध्यम प्रतिनिधी,स्वीप सारख्या विविध उपक्रमात सहभागी झालेल्या स्वयंसेवी संस्था व सर्वक्षेत्रातील मान्यवरांचे ही आभार व्यक्त केले आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !