Thu. Dec 19th, 2024

नांदेड लोकसभा मतदार संघात सर्वांच्याच प्रचाराचे केंद्र बिंदू होते खा.अशोक चव्हाण

Spread the love

थेट जमिनीवर चे वृत्त… संपादकीय!

मतदान यंत्रबंद झालेल्या मतांतून उमेदवारांचे भवितव्य ठरणार असले तरी जिथे पुष्पांनी भव्य स्वागत व्हायचे तिथेच विरोधाची काटे व दगड वेचावी लागल्याने खा. अशोक चव्हाण यांची पणाला लागलेली प्रतिष्ठा कायम राहील का नाही ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे…!

होऊ घातलेल्या १८ व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील १६-नांदेड लोकसभा मतदार संघातील एकूण २३ उमेदवारांचे भवितव्य दि.२६ एप्रिल २०२४ झालेल्या मतदान प्रक्रीयेतून मतदान यंत्रबंद झाले.यावेळी मतदार संघातील एकूण १८ लक्ष ५१ हजार ८४३ मतदारांपैकी ११ लक्ष २८ हजार ५७० मतदारांनी मतदान केले असून एकूण ६०.९४ टक्के मतदान झाले आहे.सन २०१९ ची टक्केवारी पाहता सन २०२४ च्या निवडणूकीत ती टक्केवारी घटली आहे.याची नेमकी कारणे अनेक आहेत.महत्वाचे म्हणजे दरम्यानच्या काळात विरोधी,स्व पक्षीय व अपक्षीय उमेदवारांच्या प्रचाराचे प्रमुख केंद्रबिंदू होते माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण.मतदान यंत्रबंद झालेल्या मतांतून उमेदवारांचे भवितव्य ठरणार असले तरी खा.अशोक चव्हाण यांनी महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना निवडून आणण्यासाठी व पक्षांतरानंतरचे त्यांचे पुढील राजकीय वर्चस्व कायम ठेवण्यासाठी स्टार प्रचारक असतांनाही मतदार संघ न सोडता आपली सर्व शक्ती येथेच खर्च करत प्रतिष्ठा पणाला लावली.त्यामुळेच दि.४ जून २०२४ रोजी येणाऱ्या निकालातून कोण विजयी होणार ? हे कळणारच आहे.परंतू खा.अशोक चव्हाण यांचे जिथे पुष्पांनी भव्य स्वागत व्हायचे तिथेच विरोधाची काटे व दगड त्यांना वेचावी लागल्याचे पहावयास मिळाल्याने त्यांची ‘प्रतिष्ठा’ कायम राहिल का नाही ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदार संघाचे आमदार अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा व काँग्रेस पक्षाचा त्याग करुन भाजपाचे कमळ हाती धरले.ते भाजपात का गेले ? हा विषय सर्वश्रुत व उघड झालेला आहेच. कमळ हाती धरल्याने त्यांना राज्यसभेची खासदारकी बहाल झाली.ते भाजपात येणारच!,असे विश्वसनीय सुतोवाच सातत्याने करणाऱ्या खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे म्हणणे खरे ठरले व अनेक वर्षांचे एकमेकांतील राजकीय वैरत्व संपवून दोन जुने मित्र एकत्र आले.खा.अशोक चव्हाण यांच्या भाजपात येण्याने नांदेड,मराठवाडा व महाराष्ट्रात भाजपाला मोठे बळ मिळेल,असे बोलल्या गेले.परंतू तसे न होता भाजपाचे काही मुळ व जुने पदाधिकारी,कार्यकर्ते मात्र मागच्या रांगेत फेकल्या गेले आणि काँग्रेस मधून आलेल्यांनी मुख्य सुत्र हाती घेत भाजपाच्या पहिल्या रांगेत आपला ताबा मिळवला. नांदेडची भाजपा काँग्रेसमय करुन टाकली,यामुळे भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर दिसून आला,परंतू त्यांनी ‘झाकली मूठ’ म्हणत चुप्पी साधली.त्यांनी काँग्रेसचा हात सोडल्याने नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संपला असे बोलल्या जात असतांनाच खा. अशोक चव्हाण यांच्या व्हीव्हीआयपी प्रोटोकॉल च्या नावाखाली कधीही व्यासपीठावर सन्मान न मिळालेल्या,अडगळीत टाकले गेलेल्या,मागच्या रांगेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी फळी पहिल्या रांगेत समोर आली आणि ते कार्यकर्त्यांचे नेते झाले.त्यामुळे त्यांनी मोठ्या जिद्दीने काँग्रेसचे एक मोठे ‘आव्हान’ भाजपापुढे उभे करुन महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार वसंत बळवंतराव चव्हाण यांना विजयी करण्यासाठी कंबर कसली. या सामान्य कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना जनतेतून मोठा प्रतिसाद ही मिळाला.

१६-नांदेड लोकसभा मतदार संघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना निवडून आणण्याची सर्वस्वी जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी खा.अशोक चव्हाण यांच्यावर सोपवली.तर काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीने नायगावचे सरपंच ते आमदार या पद प्रवासाचा तगडा अनुभव असलेल्या वसंत बळवंतराव चव्हाण यांच्या रुपाने ‘मराठा विरुद्ध मराठा’ असा उमेदवार मैदानात उतरवला.त्यामुळे दोघांचेही ‘सगे सोयरे’ या मतदार संघात असल्याने दोन उमेदवारांत ११/१२ चा विषय ही राहिला नाही.तसे पाहता वसंत चव्हाण हे स्व.डॉ. शंकरराव चव्हाण व खा.अशोक चव्हाण यांच्या वरदहस्त मुशितच वाढलेले.त्यामुळे खा.अशोक चव्हाण यांनीच हा ‘डमी’ उमेदवार दिल्याचा आरोप ही सर्वप्रथम अनेकांतून झाला.मोदी लाठ असतांनाही २०१४ मध्ये या मतदार संघातील मतदारांनी खा.अशोक चव्हाण यांना खासदारकी व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.अमिता चव्हाण यांना भोकर विधानसभा मतदार संघातून आमदारकीची संधी दिली. तर पुढे २०१९ मध्ये एकमेकांचे कट्टर विरोधक असल्याचे मानून खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांना येथील मतदारांनी निवडून दिले.या दोघांनीही सन २०१४ ते २०२४ असे सलग १० वर्ष नांदेड लोकसभा मतदार संघातून खासदारकी उपभोगली.परंतू ‘विकास’ नावाच्या बाळाने मतदारांच्या पदरी काहीही टाकले नाही.जे ‘विकास’ नावाचे बाळ जन्मले ते फक्त काही मर्जीतल्या गुत्तेदारांच्या आणि चेले चपाट्यांच्या घरी.याची खदखद काही सरपंच व अनेकांतून व्यक्त झाली. २०१९ मध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा पराजय करुन भाजपाने काँग्रेसचा हा बालेकिल्ला आपल्या ताब्यात घेतल्याचे बोलल्या गेले.तर अनेक वर्ष एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले हे दोघे पुन्हा एकदा मित्र झाल्याने २०२४ मध्ये भाजपाचा हा बालेकिल्ला अजून बळकट होईल असे ही चर्चील्या गेले.तसेच खा.अशोक चव्हाण यांची साथ असल्याने उमेदवाराचा विजय सहज शक्य होईल ? असे वाटत असतांनाच दुसरी ठिणगी पडली ती म्हणजे या दोघांसाठी एकमेकांविरुद्ध लढलेल्या सामान्य कार्यकर्त्यांच्या नाराजीची व दोघांकडून ही म्हणावा तसा विकास न झाल्याची.त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांची मन जुळविणे व विकास कामांचा आढावा देणे दोघांनाही थोडे अवघडच झाल्याचे निदर्शनास आले.
महायुती व महाविकास आघाडीने उपरोक्त प्रकारे दिलेल्या उमेदवारीनंतर येथील राजकीय परिस्थिती आणि समिकरणे बदलली.शेतकऱ्यांच्या समस्या,बेरोजगारी,उद्योग निर्मिती,उच्च शिक्षणाचे दालन स्थापने,कायदा आणि सुव्यवस्था,धनगर, मराठा,मुस्लीम आरक्षण,अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण असे महत्वाचे व मतदारांसाठी हितकारक ठरणारे अनेक मुद्दे बाजुला पडली.याच बरोबर खा.अशोक चव्हाण यांचे भाजपात जाणे काँग्रेस पक्षात राहिलेल्या व भाजपाच्या जुन्या असंख्य कार्यकर्त्यांसह अनेकांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पचनी पडले नाही. यातूनच सुरु झाला त्यांच्या विरुद्ध टोकाचा विरोध.तसेच खा.अशोक चव्हाण यांच्या सोबत गेलेल्यांनी ‘फ्रंटफुटवर’ ताबा घेतला व भाजपाचे निष्ठावान जुने कार्यकर्ते ‘बॅक फुटवर’ गेल्याचा फायदा देखील महाविकास आघाडीने घेतला.यातूनच खा. अशोक चव्हाण यांच्यावर टिका,टिप्पणी, ट्रोल करणे सुरु झाले,तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन निषेध,गावबंदीने विरोध करण्यात आला.ऐककाळी त्यांच्या बाजूस उभे राहून फोटो काढण्यात धन्यता माणणारे व लाभार्थी असलेले लोक ही तीव्र विरोधात गेले.ज्या ठिकाणी त्यांच्यावर भव्य पुष्पवृष्टी व्हायची त्याच ठिकाणी विरोधाची काटे व दगड वेचण्याची वेळ त्यांच्यावर आणून सर्व बाजूंनी कोंडी करण्यात आली.महायुती व महाविकास आघाडीच्या या निवडणूक रणांगणात एकीकडे सामान्य कार्यकर्ते तर दुसरीकडे व्हीव्हीआयपी असा लढा दिसून आला.एवढेच नव्हे तर त्यांना देशाचे मोठे नेते व स्वत: चे वडील स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांचे फोटो महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार,प्रसिद्धी फलकांवर लावता येऊ शकले नाही.म्हणूनच काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या लढ्यास जनतेच्या बळाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेल्याचे दिसून आले.त्यामुळेच भाजपा महायुतीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,देशाचे गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड,पालकमंत्री गिरीश महाजन,खा. डॉ.अजित गोपछडे,चित्रा वाघ, यांसह आदी नामदार,आमदार, खासदार अशा दिग्गजांना खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी पाचारण करावे लागले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,माजी मंत्री अमित देशमुख,खा.इम्रान प्रतापगडी,सचिन भाऊ साठे यांच्या पेक्षा अन्य कोणत्याही मोठ्या नेत्यास वसंत चव्हाण यांच्या प्रचारार्थ आणता येऊ शकले नाही.तर वंचित बहुजन आघाडीने उमेदवार ॲड.अविनाश भोसीकर यांच्या प्रचारार्थ केवळ राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकुर यांनाच आणले.त्यांच्या ऐवजी कोणीही मोठा नेता न आल्याने म्हणावा तसा मतदारांवर प्रभाव पडला नाही. त्यामुळे नांदेड ची सरळ लढत खा.प्रतापराव पाटील चिखलीकर व वंसत चव्हाण यांच्यातच झाल्याचे दिसले.तसेच मतदारांतून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी आशिर्वादाचे ‘हात’ अधिक असल्याचे निदर्शनास आले.तर मतांचे ध्रुवीकरण, मराठा आरक्षणाच्या मुद्दा, मुस्लीम व दलित मतदारांची भक्कम साथ,महायुतीतील घटक पक्षांच्या काही पदाधिकाऱ्यांची नाराजी हे महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी जमेची बाजू ठरल्याचे दिसून आले.परंतू विशेष बाब म्हणजे प्रचारा दरम्यान महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारापेक्षा खा.अशोक चव्हाण यांनाच विरोधी पक्ष,स्व पक्ष व अपक्षांनी ही ‘लक्ष्य’ केले होते.त्यामुळेच नांदेड लोकसभा मतदार संघात सर्वांच्या प्रचाराचे केंद्र बिंदू खा.अशोक चव्हाण हेच होते.

मुस्लीम व दलित मतदार हे काँग्रेसची ‘वोट बँक’ आहे म्हटले जात असतांनाच त्यात अधिकची भर पडली ती म्हणजे मराठा मतदारांची.यामुळे महाविकास आघाडीच्या मतांचे पारडे जड झाल्याचे निदर्शनास आले.तर लिंगायत,वाणी मतदार कांही प्रमाणात वंचित आघाडीकडे वळला,यशपाल भिंगे व प्रा. मनोहर धोंडे यांच्यामुळे काही मतदार महाविकास आघाडीकडे वळला आहे,असे बोलल्या जात असल्याने महायुतीच्या मतांचे पारडे थोडे हलके झाल्याचे ही चर्चील्या जात आहे.परंतू खा.डॉ. अजित गोपछडे हे महायुतीकडे असल्याने काही मते त्यांना मिळतीलच असे ही चर्चील्या जात आहे.उरतो तो प्रश्न म्हणजे मोदी प्रेमी,ओबीसी,हिंदूत्ववादी,सायलेंट मोड व स्लिपरसेल मधील आणि खा.अशोक चव्हाण यांना मानणाऱ्या मतदारांचा ? हे मतदार जर महायुतीकडे वळले तरच ४ जून रोजीच्या निकालात खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे भवितव्य उज्वल ठरेल असे ही अनेकांतून बोलल्या जात आहे.तसेच खा. अशोक चव्हाण व खा.प्रतापराव पाटील चिखलीकर या दोघांना मानणाऱ्या मतदारांच्या मतांचे रुपांतर बेरजेत झाले तर नक्कीच फायदा होऊ शकतो.हे वास्तव असले तरी खा.अशोक चव्हाण यांना व चव्हाण परिवारास मानणारा मोठा वर्ग येथे आहे.तसेच त्यांना राजकीय क्षेत्रातील ‘मॅनेजमेंट गुरु’ असे ही म्हटल्या जाते.त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात कशी करायची याचे कांही डावपेच त्यांच्याकडे ‘राखीव’ आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात त्याचा उपयोग त्यांनी मोठ्या ‘अर्थाने’ करुन घेतला आहे,असे ही चर्चील्या जात आहे.त्याचा उपयोग त्यांनी योग्यरित्या करुन घेतला असेलच ? भाजपाने त्यांच्यावर टाकलेली मोठी जबाबदारी त्यांना पार पाडावीच लागणार आहे.कारण नांदेड व राज्याच्या राजकीय पटलावरचे ते एक मोठे व्यक्तीमत्व असून केंद्रातील मंत्रीपद व मुलीच्या आमदारकीसह त्यांचे पुढील राजकीय भवितव्य खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना विजयी करण्यातच आहे.यासाठी त्यांनी उमेदवारापेक्षा अधिकची ‘स्वप्रतिष्ठा’ पणाला लावली आहे.मराठा बांधवांचा टोकाचा विरोध,निषेध,गाव बंदी यांसारख्या अवमान कारक बाबींच्या सामोरे त्यांना व कुटूंबीयांना जावे लागले आहे.ज्या गावांत त्यांचे पुष्पहार व जेसीबींनी फुले उधळून भव्य स्वागत केले जायचे त्याच ठिकाणी त्यांना विरोधाचे काटे आणि दगड वेचावे लागली आहेत.याच बरोबर खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याशी असलेले जुने राजकीय वैरत्व संपवून नव्याने मैत्रीचे कर्तव्य बजावण्यासाठी दोन पाऊल मागे सारुन उपरोक्त विरोधी पथावर त्यांनी हार मानली नाही व भले ही सुरक्षा घेऊनच का होईना मतदार संघातील गावपातळीवरील प्रचार थांबविला नाही.अख्खी हयात काँग्रेसच्या विचारधारेवर चाललेल्या कुटूंबातील खा.अशोक चव्हाण यांनी ‘सबका साथ,सबका विकास,सबका विश्वास’ म्हणत ‘नमो नमो’ होऊन अगदी सामान्य कार्यकर्ता व लहान मुलाप्रमाणे ‘जय श्रीरामचे’ नारे देत सर्वस्वी प्रतिष्ठा पणाला लावल्याचे निदर्शनास आले.परंतू त्यांचे बदललेले हे रुप मतदारांनी कितपत स्विकारले ? हे पाहणे असून त्यांची प्रतिष्ठा व पुढील राजकीय भवितव्य शाबूत ठेवणे शेवटी काय तर सुजाण मतदारांच्या हाती आहे.त्यामुळे मतदान यंत्रे उघडल्या नंतरच ४ जून रोजी विजयी उमेदवारांच्या भवितव्यासह खा.आशोक चव्हाण यांची पणाला लागलेली प्रतिष्ठा ही कायम राहील का नाही ? हे कळणार असून याचा निकाल ही ती मतदान यंत्रेच देणारच आहेत.चौका चौकात, गाव पारावर कोण विजयी होणार? यावर पैजा लागत असून खा.अशोक चव्हाण यांच्या पणाला लागलेल्या प्रतिष्ठेचे ही काय होणार? या चर्चेला ही उधाण आले असल्याने त्या निकालाची वाट आपण ही पाहूयात!
उत्तम बाबळे
संपादक-अंबुज प्रहार न्युज लाईव्ह


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !