नांदेड लोकसभा व विधानसभा मतमोजणीच्या पहिल्या फेरीचा अंदाज सकाळी ११ वाजेपर्यंत येईल
*लोकसभेच्या १९ व विधानसभेच्या १६५ उमेदवारांपैकी कोण होणार पास व कोण नापास ? स्वारातीम विद्यापीठाच्या ज्ञानार्जन केंद्रात आज होणार आहे मतमोजणी
*१ हजार ८०० कर्मचारी व प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज ; किनवट,हदगाव व लोहा विधानसभेची तालुक्याच्या ठिकाणीच होणार मतमोजणी
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीतील १९ उमेदवार व लोकसभा अंतर्गतच्या ६ विधानसभा मतदार संघातील १६५ उमेदवारांसाठी आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील ज्ञानार्जन केंद्रातील पहिल्या व दुसऱ्या माळ्यावर सकाळी ८:०० वाजतापासून मतमोजणी होणार आहे.तर किनवट,हदगाव व लोहा या तीन विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या मतदानाची मतमोजणी त्याच तालुक्याच्या ठिकाणी होणार असून मतमोजणीच्या पहिल्या फेरीचा निकाल सकाळी ११:०० वाजतापर्यंत येणे अपेक्षित आहे.
आज सकाळी उमेदवारांच्या उपस्थितीत सुरक्षा खोलीतील मतयंत्र काढले जातील.त्यानंतर कर्मचाऱ्यांना गोपनियतेची शपथ दिली जाईल व प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होईल. सुरूवातीला पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू होईल.सकाळी ८:०० वाजेच्या सुमारास मतमोजणीला सुरूवात होईल.एकूण १४ टेबलवर मतमोजणीला सुरूवात होईल.नांदेड येथील विद्यापीठात पहिल्या माळयावर खोली क्रमांक १०२ मध्ये डावीकडील हॉलमध्ये ८५-भोकर,मधल्या हॉलमध्ये ८७-नांदेड दक्षिण व उजवीकडील हॉलमध्ये ९०-देगलूर विधानसभेची मतमोजणी होणार आहे.तर हॉल क्र.१०६ मध्ये डावीकडील हॉलमध्ये ९१-मुखेड विधानसभा, मधल्या हॉलमध्ये ८९-नायगाव विधानसभा तर उजवीकडील हॉलमध्ये ८६-नांदेड उत्तरची मतमोजणी होणार आहे.
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दुसऱ्या मजल्यावर हॉल क्र. २०६ मध्ये डावीकडील हॉलमध्ये मुखेड,मधल्या हॉलमध्ये नायगाव,उजवीकडील हॉलमध्ये नांदेड उत्तर तर हॉल क्र.२०२ मध्ये डावीकडील हॉलमध्ये -भोकर विधानसभा मतदारसंघ, मधल्या हॉलमध्ये -नांदेड दक्षिण तर उजवीकडील हॉलमध्ये देगलूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे.
१ हजार ८०० कर्मचारी करणार मतमोजणी
लोकसभा व विधानसभा मिळून जवळपास १ हजार ८०० कर्मचारी मतमोजणी प्रक्रियेत सहभागी झाले आहेत.निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या अधिनस्त ६ सहायक निर्णय अधिकारी व त्यांच्या मदतीला तहसिलदार असतात.याशिवाय प्रत्येक एका टेबलवर चार कर्मचारी असतात.मतमोजणी पर्यवेक्षक,मतमोजणी सहायक,सुक्ष्म निरीक्षक व सेवक अशी ही रचना असते.एका फेरीला मोजणीसाठी अर्धातास लागू शकतो.तथापि प्रत्येक फेरीची मोजणी झाल्यानंतर चार ते पाच ठिकाणी त्याची तपासणी केली जाते.त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत घोषणा केली जाते. या सर्व प्रक्रियेचे साक्षिदार विविध पक्षाचे मतदान प्रतिनिधी असतात.त्यांची सभोवताल बसण्याची व्यवस्था असते.तर मधल्या भागात बंदिस्त कक्षात मतमोजणी कर्मचारी काम करतात.त्यामुळे मोजणीची पारदर्शता राखल्या जाते. प्रत्येक विधानसभेची १४ टेबलावर मोजणी होणार आहे. लोकसभा व विधानसभेसाठी १४ गुन्हीले ६ असे ८४ टेबल लोकसभा आणि विधानसभेसाठीही ८४ टेबल असतील. जितकी मतदान केंद्र त्याच्या भागिले १४ यानुसार मतदानाच्या फेऱ्या ठरतात.अंदाजे २४ ते २८ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.
अशा होणार आहेत फेऱ्या...
किनवट विधानसभेमध्ये ३३१ मतदान केंद्र आहेत. याठिकाणी २४ फेऱ्या होतील.हदगावमध्ये ३२७ मतदान केंद्र असून येथे २५ फेऱ्या होतील.भोकरमध्ये ३४४ मतदान केंद्र आहेत. याठिकाणी २५ फेऱ्या होतील.नांदेड उत्तर मध्ये ३५९ मतदान केंद्र आहेत येथे २६ फेऱ्या होतील.नांदेड दक्षिण मध्ये २१२ मतदान केंद्र आहेत येथे २३ फेऱ्या होतील.लोहा मध्ये ३३८ मतदान केंद्र आहेत येथे २५ फेऱ्या होतील.नायगाव मध्ये ३५० मतदान केंद्र आहेत येथे २५ फेऱ्या होतील.देगलूर मध्ये ३५१ मतदान केंद्र आहेत येथे २६ फेऱ्या होतील तर मुखेडमध्ये ३६६ मतदान केंद्र आहेत येथे २७ फेऱ्या होतील.