Tue. Jul 29th, 2025

नांदेड गोदातीरी होणाऱ्या २० व्या समरसता साहित्य संमेलनाच्या निमित्ताने…

Spread the love

२ ते ३ ऑगस्ट दरम्यान होत असलेल्या या साहित्य संमेलनास येत असलेल्या सर्व सारस्वत,मान्यवर व श्रोत्यांचे हार्दिक स्वागत आणि आयोजकांचे अभिनंदन! – उत्तम बाबळे,संपादक 

एक अविस्मरणीय आठवण…
त्र्यंबकेश्वर(जि.नाशिक) येथे उगम झालेल्या पवित्र दक्षिण गंगेच्या(गोदावरी नदी) अर्थातच गोदातीरी नाशिक येथे दि.७ ते ९ जानेवारी २०११ रोजी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,नाशिक व समरता साहित्य परिषदेच्या वतीने १३ वे समरसता साहित्य संमेलन मोठ्या आनंदोत्सवात संपन्न झाले.
सदरील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते जेष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे,उद्घाटक होत्या जेष्ठ समाजसेविका अनाथांची माय मातोश्री सिंधूताई सपकाळ,तर माझ्या सारख्या एका सर्वसामान्य माणसावर सोपविली होती संमेलन निमंत्रक म्हणून जबाबदारी…
संमेलनाचा विषय होता “वंचितांचे साहित्य व वंचित साहित्यिक”
दि.७ जानेवारी रोजी सकाळी ९:०० वाजता वंचित घटकांच्या विकासात लक्षणीय योगदान असलेले जेष्ठ समाजसेवक तथा भारत सरकारच्या भटक्या व विमुक्त जाती जमाती विकास आणि कल्याण मंडळाचे माजी अध्यक्ष भिकूजी रामजी इदाते(दादा इदाते),संमेलनाध्यक्ष साहित्यिक उत्तम बंडू तुपे व माझ्यासह आदी साहित्यिकांच्या हस्ते ग्रंथ पुजन करून ग्रंथदिंडीचा शुभारंभ करण्यात आला.या ग्रंथदिंडीत हजारो शालेय विद्यार्थी,विद्यार्थीनी, साहित्यिक,भजनी मंडळी व पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले असंख्य महिला,पुरुष,ढोल ताशा वाद्यासह असंख्य नागरिक सहभागी झाले होते.नाशिक शहरातील मुख्य रस्त्याने निघालेली ही ग्रंथदिंडी महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य नगरी संमेलन स्थळी” पोहचली व ग्रंथदिंडीचा समारोप करण्यात आला.

देवी सरस्वती व माता सावित्रीबाई फुलेंची लेकरे अर्थातच श्रेष्ठ,जेष्ठ व नवोदित सारस्वत आणि हजारो वैचारिक श्रोत्यांनी “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य नगरीचे संमेलन सभागृह भरगच्च भरले होते.संमेलन निमंत्रक म्हणून या सर्वांपुढे व संमेलन पीठावरील संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे, संमेलनाच्या उद्घाटक मातोश्री सिंधूताई सपकाळ आणि आदी मान्यवरांपुढे संमेलन निमंत्रक म्हणून पहिलं मनोगत व्यक्त करण्याची संधी मला देण्यात आली होती.खर तर माझ्या सारख्या ग्रामीण भागातील एका सामान्य माणसासाठी जणूकाही हा परिक्षेचाच क्षण होता. मनोगतातून संमेलनाची पार्श्वभूमी मांडायची होती व निमंत्रक या नात्याने आयोजकांसह उपस्थितांचे आभार मानायचे होते.”वंचितांचे साहित्य व वंचित साहित्यिक” या विषयानुषंगाने स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारतातील अनुसूचित जाती व जमाती,भटक्या व विमुक्त जमाती,आदिवासी,दलित, वाडी,तांड्यावर व अगदी जंगलात राहणारे,गरीब,शोषित,पिडीत आणि वंचित घटक असलेल्या नागरिकांच्या जीवन प्रणालीवर अत्यावश्यक असलेले संवेदनशील साहित्य कशा प्रकारे साहित्य क्षेत्र पटलावर येण्यापासून वंचित राहिले ? तसेच हे लिहिणारे साहित्यिक देखील वंचित का राहिले? यास अनुसरुन उपरोक्त घटकांच्या जीवनोन्नतीसाठी लेखणी झिजविणारे विश्व साहित्य भुषण साहित्यरत्न सत्यशोधक डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या सारखे प्रतिभासंपन्न साहित्यिक व त्यांनी लिहिलेले साहित्य कशा प्रकारे वंचित राहिले आणि अतिशय दुर्गम भागातील आदिवासी समाज व्यवस्थेवरील साहित्य देखील का वंचित राहिले यावर बोलून कौतुकासह उपस्थितांच्या टाळ्या घेत मी या परिक्षेत उत्तीर्ण झालो.परंतू वेळे अभावी सदरील विषयास मला पुर्णपणे न्याय देता येऊ शकला नाही.माझ्या मनोगतानंतर उद्घाटक मातोश्री सिंधूताई सपकाळ यांनी त्यांचे संघर्षमयी जीवन व सद्य परिस्थिती यावर सखोल असे मार्गदर्शन केले.तर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने जेष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून संमेलन,वंचित साहित्यिक व त्यांचे साहित्य यावर सविस्तर असे मनोगत व्यक्त केले.
दुसऱ्या दिवशीच्या सत्रात नांदेड जिल्ह्याचे भुषण,आमचे बंधूतुल्य मार्गदर्शक जेष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांनी वंचितांच्या कविता व वंचित कवि यावर मुख्य मार्गदर्शक म्हणून अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त करतांना माझ्या मनोगतातून राहिलेल्या विषयास न्याय दिला आणि सविस्तर मांडणी केली.तीन दिवशीय साहित्य संमेलनात झालेल्या विविध सत्रांत अनेक साहित्यिक,श्रोते व मान्यवरांनी उपस्थिती लावून संमेलनाची शोभा वाढविली आणि संमेलन यशस्वी केले.सदरील साहित्य संमेलनाचा निमंत्रक होण्याचे भाग्य मला लाभले व ही संधी जेष्ठ विचारवंत रमेशची पांडव,रमेशची पतंगे,डॉ.दिवाकर कुलकर्णी,डॉ.प्रसन्न पाटील, रविंद्रजी गोळे व आदींमुळे मिळाली.त्याबद्दल या सर्वांचा मी ऋणी असून त्यांचे खुप खुप धन्यवाद!
१३ वे समरसता साहित्य संमेलन नाशिक गोदातीरी झाले.तर २० वे समरसता साहित्य संमेलन नांदेड गोदातीरी होत आहे.श्री गुरु गोविंदसिंघजी साहित्य नगरी,भक्ती लॅान्स,मालेगाव रोड येथे होणाऱ्या या संमेलनाचा विषय “नव्वदोत्तर साहित्य आणि समरसता” असून सदरील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित जेष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव चं.कांबळे व संमेलनाचे उद्घाटक म्हणून अ.भा.भिक्खू महासंघाचे अध्यक्ष भदंत डॉ.राहूल बोधी महाथेरो हे राहणार आहेत.तर संमेलनाच्या समारोप प्रसंगी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाणा यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.तसेच या संमेलनासाठी नांदेड शहर व परिसरातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची स्वागत समिती स्थापन करण्यात आली असून राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे.याच बरोबर संमेलन निमंत्रक म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक तथा साहित्यिक शिवा कांबळे व संमेलनाचे कार्यवाही म्हणून समाजसेवक माणिकराव भोसले आणि सुकाणू समितीचे सदस्य तथा सहकार्यवाह म्हणून अनंत जोशी यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
१३ व्या समरसता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे व संमेलन निमंत्रक म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा संपादक उत्तम बाबळे अर्थातच माझी निवड करण्यात आली होती.तर होऊ घातलेल्या २० व्या समरसता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव चं.कांबळे व संमेलन निमंत्रक म्हणून साहित्यिक शिवा कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.सामाजिक समरता मंच व समरसता साहित्य साहित्य परिषद ही ‘जात व जातीयता’ मानत नसली तरी एक विशेष बाब म्हणजे हे चौघे ही एकाच समाजाचे (मातंग)आहेत.तसेच भोकरचे भुमिपूत्र असलेल्या संपादक उत्तम बाबळे यांना त्या साहित्य संमेलनाच्या निमंत्रकाची जबाबदारी देण्यात आली होती व होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाचे कार्यवाह म्हणून भोकरचेच भुमिपूत्र माणिकराव भोसले आणि सुकाणू समिती सदस्य तथा सहकार्यवाह म्हणून अनंता जोशी यांना जबाबदारी देण्यात आली आहे,ही आम्हासाठी अभिमानाची बाब आहे.हे साहित्य संमेलन म्हणजे सारस्वत,मान्यवर व साहित्य श्रोत्यांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.डॉ.प्रसन्न पाटील व समरसता साहित्य परिषद,महाराष्ट्र राज्य आणि अभिनव भारत शिक्षण संस्था,नांदेड यांसह आदी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थांच्या सूक्ष्म सुनियोजनाखाली विविध समित्यांच्या माध्यमातून या साहित्य संमेलनाची पुर्वतयारी सुरु आहे.त्यामुळे हे साहित्य संमेलन यशस्वी होणारच आहे,असा विश्वास आहे.मी या संमेलनास उपस्थित राहणार आहे,आपण ही यावे असे आपणास विनंतीपर आवाहन करतो.

उत्तम बाबळे,संपादक
माजी संमेलन निमंत्रक – १३ वे समरसता साहित्य संमेलन,नाशिक
राज्य संघटक – राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !