नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतली बातमीची दखल
भोकर येथील शिवमंदिराचा सभामंडप तथा कलावंतीणीच्या महालाचे अवशेष नष्ट झाल्या प्रकरणी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्याचे पुरातत्व विभागाचे सहायक संचालक यांना दिले पत्र
उत्तम बाबळे,संपादक
भोकर : भोकर येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या शिवमंदिरासमोरील सभामंडप तथा कलावंतीणीच्या महालाचे पुरातन अवशेषाविषयी दैनिक देवगिरी तरुण भारत ने गेल्या २१ वर्षांपूर्वी विशेष वृत्त प्रकाशित केले होते.तर यावर्षी काही दिवसांपूर्वी दैनिक वीर शिरोमणी व अंबुज प्रहार न्युज लाईव्ह सह अन्य दोन वृत्तपत्रांनी सदरील ऐतिहासिक वारसा जमीनदोस्त करुन नष्ट केल्याविषयी बातम्या प्रकाशित केल्या होत्या.नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सदरील बातम्यांची गंभीरपणे दखल घेतली असून त्या प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन आवश्यक ती कार्यवाही करावी व अनुपालन अहवाल त्वरीत सादर करावा,असे आदेश पत्र निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या स्वाक्षरीने नांदेड जिल्हा पुरातत्व विभागाचे सहायक संचालक यांना पाठविण्यात आले आहे.
भोकर येथील किनवट रस्त्यालगत असलेल्या इनामी जमिनीतील गट क्रमांक ४५ मध्ये यादव कालीन शिवमंदिरा समोरील सभामंडप तथा कलावंतीणीच्या महालाचे पुरातन अवशेष उभे होते.सदरील ऐतिहासिक ठेव्या विषयी गेल्या २१ वर्षांपूर्वी दैनिक देवगिरी तरुण भारत या लोकप्रिय वृत्तपत्रातून तत्कालीन तालुका प्रतिनिधी उत्तम बाबळे यांचे विशेष वृत्त प्रकाशित झाले होते.तर यावर्षी दि.५ डिसेंबर २०२४ रोजी अंबुज प्रहार न्युज लाईव्ह व दि.७ डिसेंबर २०२४ रोजी दैनिक वीर शिरोमणी या वृत्तपत्रातून सदरील ऐतिहासिक वारसा जमीनदोस्त करुन नष्ट झाल्याच संपादक उत्तम बाबळे यांची बातमी प्रकाशित झाली होती.त्याचे असे की,नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाली.यादरम्यान शासकीय तथा प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व आदीजण निवडणूक कर्तव्यात व्यस्त होते.याचा फायदा घेऊन भोकर येथील इनामी जमीन गट क्रमांक ४५ मध्ये असलेल्या यादव कालीन शिवमंदीराचा सभामंडप तथा कलावंतीणीच्या महालाचे ऐतिहासिक अवशेष अज्ञातांनी जमीनदोस्त करुन नष्ट केले.हा गंभीर प्रकार ऐतिहासिक वारसा प्रेमी नागरिकांच्या निदर्शनास आल्याने घटनास्थळी प्रा.डॉ. व्यंकट माने,मंदिर व मुर्ती शास्त्र तज्ञ प्रा.डॉ.अरविंद सोनटक्के यांसह आदींनी भेट दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांसह एका शिष्टमंडळाने दि.३ डिसेंबर २०२४ रोजी संबंधीत प्रकरणी दोषींविरुद्ध कारवाई करावी व तो ऐतिहासिक वारसा पुनश्च उभारण्यात यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे तहसिलदार विनोद गुंडमवार यांच्याकडे केली.तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने हिच मागणी दि. १० डिसेंबर २०२४ रोजी मुक मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली होती.
उपरोक्तांनी सदरील विषयी मागणी करुनही पुरातत्व व महसूल विभागास जाग आली नाही.त्यामुळे नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उपरोक्त वृत्तपत्रांतील बातम्या वाचून व विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः लक्ष घातले आणि पुरातत्व विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला.तसेच नुकतेच नांदेड जिल्हा पुरातत्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे यांनी सदरील प्रकरणी सखोल चौकशी करावी व भोकर शहराची पुरातन ओळख सदैव देणारे म्हणून बघितल्या जाणाऱ्या शिवमंदिराचा सभामंडप तथा कलावंतीणीच्या महालाचे ऐतिहासिक अवशेष जपून ठेवणे महत्त्वाचे असल्याने ते अवशेष नष्ट करण्याचा हेतू काय? कोणी नष्ट केले? का नष्ट केले? याबाबत गंभीरपणे चौकशी करुन कायद्यातील तरतुदीनुसार तात्काळ आवश्यक ती कार्यवाही विना विलंब करावी आणि अनुपालन अहवाल त्वरीत या कार्यालयास सादर करावा,असे आदेश पत्र निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या स्वाक्षरीने पुरातत्व विभाग सहायक संचालक यांना देण्यात आले आहे.याचबरोबर भोकर चे उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी व तहसिलदार विनोद गुंडमवार यांना देखील महिती आणि उचित कार्यवाहीस्तव पत्रांची पत्र देण्यात आली आहे.कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सदरील गंभीर प्रकरणी वृत्तपत्रांतील बातम्यांची दखल घेतली असल्याने संपादक उत्तम बाबळे यांनी त्यांचे आभार मानले असून पुरातत्व व महसूल विभाग चौकशीअंती काय कारवाई करेल ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.