भोकर येथे श्री राम प्राणप्रतिष्ठा व स्वराज्याभिषेक दिनानिमित्त संगीतमय श्री रामकथेचे आयोजन

तर श्री रामकथा यज्ञ सोहळ्याच्या समारोपदिनी दि.२२ जानेवारी रोजी भोकर शहरात भव्य शोभायात्रा निघणार…
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : श्री राम मंदिर जिर्णोध्दार व श्री रामलल्ला मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या स्वराज्याभिषेक दिनानिमीत्त भोकर येथे दि.१७ ते २१ जानेवारी पर्यंत भव्य संगीतमय श्री रामकथा यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून दि.२२ जानेवारी रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.तरी या सोहळ्याचा बहुसंख्येने लाभ घ्यावा तथा शोभा यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन भोकर विचार विकास मंच,लोकोत्सव समिती व समस्त गावकरी मंडळी आयोजकांनी केले आहे.
उपरोक्त सोहळा व भव्य शोभा यात्रेच्या आयोजन संदर्भाने दि.१३ जानेवारी २०२४ रोजी रात्री ७:०० वाजता श्री बालाजी मंदिर,नवा मोंढा भोकर येथे श्री राम भक्त,छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी,हिंदूत्ववादी संघटनांचे पदाधिकारी,भोकर विचार विकास मंचचे पदाधिकारी,व्यापारी व विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत मान्यवरांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी.श्री राम मंदिर जिर्णोध्दार,श्री रामलल्ला मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या स्वराज्याभिषेक दिनानिमीत्त भोकर येथे होऊ घातलेला संगीतमय श्री रामकथा यज्ञ सोहळा आणि भव्य शोभायात्रेविषयी नियोजन करण्यात आले.तसेच उपरोक्त यज्ञ सोहळा व भव्य शोभा यात्रेविषयीची रुपरेषा ठरविण्यात आली.
सदरील रुपरेषा पुढील प्रमाणे आहे…भव्य संगीतमय श्री रामायण कथा यज्ञ सोहळा हा माऊलीधाम,नवा मोंढा भोकर जि.नांदेड येथे बुधवार,दि.१७ ते रविवार दि.२१ जानेवारी २०२४ पर्यंत होणार असून सकाळी ११:०० ते १२:०० वाजता पर्यंत हनुमान चालीसा व रामरक्षा मंत्र पारायण होणार आहे. तर संगीतमय श्री राम कथेची वेळ दुपारी १२:०० ते ४:०० वाजता पर्यंत राहणार आहे.ही कथा राष्ट्रीय कथाकार तथा सुप्रसिद्ध कीर्तनकार,रामायणाचार्य श्री ह.भ.प.शिवाजी महाराज वटबे आळंदी देवाची यांच्या सुश्राव्य वाणीतून ऐकावयास मिळणार आहे.तर संगीत संयोजनात मुख्य गायक संतोष देवकर गुरुजी,आळंदी,सह गायक गणेश महाराज सावळे हिंगोली,तबला वादक चक्रधर शिंदे बीड,पॅडवादक सुरज माने,झाकी गणेश महाराज परभणी,कीर्तिशःकुमार वैष्णव,मृदंगाचार्य ह.भ.प.गणेश महाराज काकीलवाड व भजनी मंडळ भोकर हे सहभागी होणार आहेत.तसेच सोमवार दि.२२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ७:३० वाजता काल्याचे किर्तन होईल व तद्नंतर सकाळी ८:३० वाजता पासून भोकर शहरातील मुख्य मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.यात साधू,संत,महंत,महाराज,श्रीराम भक्त,छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी,महिला,पुरुष हे सहभागी होतील व भजन,राम नाम जप करत,हनुमान चालिसा पठन करत ढोलताशा आणि बँडपथकाच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेचा समारोप माऊलीधाम नवा मोंढा भोकर येथे सकाळी ११:३० वाजता करण्यात येणार आहे.
याचबरोबर दि.२२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता अयोध्या येथे होत असलेल्या श्री रामलल्ला मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना व श्री राम मंदिर जिर्णोध्दाराच्या नयनरम्य, डोळ्याचे पारणे फिटेल अशा भव्यदिव्य अविस्मरणीय सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या स्क्रिनवर पाहता येईल अशी व्यवस्था माऊलीधाम येथे करण्यात आली आहे.तर महाप्रसादाने या यज्ञ सोहळ्याची सांगता होणार असून सर्व श्री राम भक्त,छत्रपती शिवाजी महाराज प्रेमींनी या ऐतिहासिक सोहळ्यास सहकुटुंब उपस्थित राहून पावन कार्यात सहभाग व्हावे,असे विनम्र आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच सोमवार,दि.२२ जानेवारी २०२४ रोजी भोकर शहर व तालुक्यातील नागरिकांनी लवकर उठून आपापल्या घरासमोर, परिसरात सडा,सारवण करावे, सुंदर रांगोळ्यांनी ते सजवावे, घरावर भगवा ध्वज व गुढी उभारावी व फटाके,आतिशबाजिने सकाळी पाडवा साजरा करावा आणि सायंकाळी घर,मंदिर परिसर दीपोत्सवाने सजवून दिवाळी साजरी करावी. याचबरोबर मंदीरात आरती,राम नाम जप करावे,किर्तन,भजन, प्रवचनाचे आयोजन करावे,वाजंत्री वाजवून आनंदोत्सव साजरा करावा असे आवाहन उपरोक्त सोहळ्याचे आयोजक,श्री रामभक्त,भोकर विचार विकास मंच,समस्त गांवकरी मंडळी, लोकोत्सव समिती,समस्त हिंदू समाज,भोकर तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.