मुंबई येथे ५ मार्च रोजी होणाऱ्या ‘मांगवीर महामोर्चाच्या’ पूर्वतयारीस्तव मुदखेड येथे बैठकीचे आयोजन

अंबुज प्रहार प्रतिनिधी
मुदखेड : अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश बदर यांच्या अध्यक्षतेखालील समिती सक्रिय करण्यासह आदी मागण्यांसाठी आझाद मैदान, मुंबई येथे दि.५ मार्च रोजी ‘मांगवीर मोर्चाचे’ आयोजन करण्यात आले असून या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी समाज बांधवांच्या वतीने दि.२६ फेब्रुवारी रोजी मुदखेड येथील शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या बैठकीस बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा मार्ग मोकळा केला आहे.त्यास अनुसरून तेलंगणा राज्य सरकारने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली व समितीच्या अहवाल मान्य करुन आरक्षण उपवर्गीकरण निर्णयास नुकतीच मंजुरी दिली आहे.याच प्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारने देखील उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्तीं बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली व या समितीस अभ्यास अहवालासाठी मुद्दतवाढ ही दिली आहे.परंतू ही समिती म्हणावी तशी अद्याप तरी सक्रिय झाली नसल्याचे निदर्शनास येत आहे.
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी मांगवीर योद्धा संजयभाऊ ताकतोडे यांनी समाजोन्नतीसाठी बलिदान दिले आहे. त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाऊ नये व स्वप्नपूर्ती व्हावी या उदात्त हेतूने आरक्षण उपवर्गीकरणासाठी पहिले बलिदान देणारे शहीद संजयभाऊ ताकतोडे यांच्या स्मृतीदिनी दि.०५ मार्च रोजी २०२५ रोजी आझाद मैदान,मुंबई येथे न्यायमूर्ती बदर समिती सक्रिय करण्यासाठी “मांगवीर महामोर्चा” चे आयोजन करण्यात आले आहे.या महामोर्चाच्या पुर्वतयारीसाठी दि.२६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १:०० वाजता शासकीय विश्रामगृह,मुदखेड येथे समाज बांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदुरा गावचे सरपंच प्रतिनिधी साहेबराव गौरकवाड हे राहणार आहेत.तर प्रमुख पाहुणे लालसेनेचे प्रमुख कॉ. गणपत भिसे, अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे,अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष संपादक उत्तम बाबळे,राज्य कार्याध्यक्ष एन.डी.रोडे साहेब, राज्य महासचिव शिवाजीराव नुरुंदे, बहुजन समाज क्रांती दल संस्थापक अध्यक्ष ॲड.बी.एम. गायकवाड,तसेच मुदखेड तालुक्यातील मातंग समाजातील विविध राजकीय पक्षातील,सामाजिक संघटनेतील जेष्ठ,युवक,महिला – भगिणी,सामाजिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती राहणार आहे.तरी या बैठकीस बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन मुदखेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा आयोजक आकाशभाऊ सोनटक्के यांनी केले आहे.