Sun. Apr 13th, 2025

मावळत्या सुर्याला नमस्कार करण्याचा प्रत्यय आज प्रेमाच्या शिदोरीतून मला दिसला-राजानंद चव्हाण

Spread the love

जि.प.बांधकाम शाखा अभियंता राजानंद चव्हाण यांचा कर्तव्य सेवापुर्ती गौरव सोहळा सहृदय सत्काराने संपन्न

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : उगवत्या सुर्याला नमस्कार करणारे असंख्य पहावयास मिळतात.तर मावळत्या सुर्याच्या नमस्कार करणारे क्वचितच असतात.परंतू मावळत्या सुर्याला नमस्कार करण्याचा प्रत्यय आज मला तुम्हा स्नेहिजणांच्या प्रेमाच्या शिदोरीतून माझ्या सेवापुर्ती गौरव सोहळ्यातून मला दिसून आला.ही प्रेमाची शिदोरी हयातीत जपून ठेविले,कारण ती मला पुढील आयुष्य जगण्याची सदैव उर्जा देईल,असे भावनिक मनोगत सेवानिवृत्त जि.प.बांधकाम शाखा अभियंता राजानंद चव्हाण यांनी व्यक्त केले.जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग भोकर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजित कर्तव्य सेवापुर्ती गौरव सोहळ्या प्रसंगी दि.२८ जून रोजी भोकर येथे ते सत्कार मुर्ती म्हणून बोलत होते.

अभियंता राजानंद माणिकराव चव्हाण हे धाराशिव जिल्ह्याचे मुळ रहिवासी.एका सामान्य शेतकरी कुटूंबातील या तरुणाने प्रतिकुल परिस्थितीत उच्च शिक्षण घेतले.नौकरीच्या शोधात असतांनाच्या दरम्यान दि.३० सप्टेंबर १९९३ मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे मोठा भुकंप झाला व येथील नागरिकांच्या पुनर्वसनाचे काम शासनाच्या वतीने सुरू झाले. यावेळी तुटपुंज्या मानधनावर बांधकाम अभियंता म्हणून त्यांना तात्पुरत्या काळासाठी रुजू करण्यात आले.त्या पीडितांसाठीचे निवारा छत्र उभारण्याचे त्यांनी प्रामाणिकपणे अहोरात्र काम केले.अशा प्रकारच्या संघर्षमयी सेवाकार्यातून सुरु झालेला त्यांच्या नौकरीचा प्रवास किल्लारी येथील काम पुर्ण झाल्याने तात्पुरता थांबला.परंतू त्यांनी जिद्द व संघर्ष करणे सोडले नाही आणि याच अथक प्रयत्नांतून नांदेड जिल्हा परिषदेत कायमस्वरूपी नौकरी प्राप्त केली.
जिल्हा परिषद नांदेड मधील बांधकाम विभागात अभियंता म्हणून सुरु झालेल्या त्यांच्या नौकरीचा अधिक काळा भोकर व उमरी तालुक्यात गेला.कर्तव्य कठोर पण मृदू स्वभावाच्या अभियंता राजानंद चव्हाण यांनी शाखा अभियंता,उपविभागीय अभियंता या पदावरुन सेवा कर्तव्य बजावतांना आपले सहकारी अधिकारी,कर्मचारी,कंत्राटदार,सरपंच,ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.अगदी साधी राहणी असलेल्या अभियंता राजानंद चव्हाण यांनी शासकीय कर्तव्य तर पार पाडलेच,परंतू कुटूंबाकडे ही तेवढेच लक्ष देऊन आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण दिले.त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे अनेक स्नेही मित्रगण जोडली गेली.याचा प्रत्यय त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कर्तव्य सेवापुर्ती गौरव सोहळ्यातून दिसून आला.
वयोमर्यादा नितीनियमाने जि.प.बांधकाम शाखा अभियंता उमरी या पदावरुन दि.२८ जून २०२४ रोजी अभियंता राजानंद चव्हाण हे सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग भोकर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने कार्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या कर्तव्य सेवापुर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सदरील गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद बांधकाम विभाग भोकर चे प्र.कार्यकारी अभियंता संजय किशनराव शिंदे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. बांधकाम उपविभाग हदगाव चे उपअभियंता व्ही.एल. कांबळे,सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता मुंडे,सेवानिवृत्त शाखा अभियंता एस.एन.पाटील, सेवानिवृत्त शाखा अभियंता एन.बतकुलवार,सेवानिवृत्त शाखा अभियंता पी.एम.सौंदनकर यांसह आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व सोहळ्याचे आयोजक अधिकारी,कर्मचारी,शासकीय कंत्राटदार,पत्रकार बांधव,स्नेही आणि असंख्य मित्रांनी अभियंता राजानंद चव्हाण यांचा सपत्नीक यथोचित सत्कार केला.तसेच भेटवस्तू,विठ्ठल रुक्मिणींची मुर्ती देऊन सेवानिवृत्ती नंतरच्या पुढील जीवनासाठी उत्तम आरोग्य व उदंड आयुष्यासाठी त्यांना मन: पुर्वक शुभेच्छा देऊन पाठवणी केली.
तर या सोहळ्याच्या अनुषंगाने सेवानिवृत्त अभियंता राजानंद चव्हाण यांच्या सेवाकर्तव्याविषयी उप अभियंता व्ही.एल. कांबळे,कनिष्ठ अभियंता शिवकुमार चाटोरीकर,शासकीय कंत्राटदार गोविंद उल्लेवाड,संपादक उत्तम बाबळे,सेवानिवृत्त अभियंता एस.एन.पाटील,सेवानिवृत्त अभियंता पी.एन. सौंदनकर,सेवानिवृत्त अभियंता एन.बतकुलवार,पत्रकार अहेमद करखेलीकर,कनिष्ठ अभियंता जलेलवाड,हदगाव शाखा अभियंता घुळेकर,जि.प.बां.उप.वि.भोकर चे वरिष्ठ सहाय्यक डी.एस.कावळे यांसह आदींनी मनोगत व्यक्त करुन अभियंता राजानंद चव्हाण यांना पुढील जीवन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय समारोप प्र.कार्यकारी अभियंता एस.के.शिंदे यांनी केला.तर सत्कारमूर्ती म्हणून बोलतांना अभियंता राजानंद चव्हाण पुढे म्हणाले की,माझ्या शासकीय सेवाकार्य काळादरम्यान मला अनेकांची सेवा करता आली व सर्वसामान्यांना न्याय देता आला आणि हे केवळ सहकारी अधिकारी,कर्मचारी,शासकीय कंत्राटदार, लोकप्रतिनिधी, सरपंच,ग्रामस्थ,मित्रगण यांसह आदींचे सहकार्य मिळाल्यानेच शक्य होऊ शकले.तसेच यामुळेच निष्कलंक सेवानिवृत्त होता आले.दरम्यानच्या काळात सर्वांनी भरभरुन प्रेम दिले,आज शासकीय सेवेतून मुक्त होत असतांनाही माझा यवढा मोठा सत्कार सोहळा होत आहे,ती त्याच प्रेमाची पावती असल्याचा प्रत्यय आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमाची शिदोरी मी अख्खी हयात हृदयात जपून ठेवीन,असे ही ते म्हणाले.या सोहळ्यास प्रसंगी भोकर,उमरी,हदगाव व नांदेड जिल्ह्यातील अनेक अधिकारी, कर्मचारी,पत्रकार बांधव,कुटूंबिय,नातेवाईक, मित्रगण यांसह आदींची बहुसंख्येने उपस्थिती होती.सदरील सोहळा यशस्वीतेसाठी जि.प.बांधकाम उपविभाग कार्यालय भोकर घ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.तर या सोहळ्याचे सुरेख असे सुत्रसंचालन स्था.अभियंता विनायक जी.सुवर्णकार यांनी केले व उपस्थितांचे आभार स्था.अभियंता के.एस.पाटील यांनी मानले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !