Thu. Dec 19th, 2024

लाचखोर लिपीकेस भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने दिली ३ वर्षांची शिक्षा

Spread the love

हिमायतनगर तहसिल कार्यालयाच्या ‘त्या’ लिपीकेस केवळ १२० रुपयाची लाच घेणे पडले खुपच महागात!

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तहसिल कार्यालय हिमायतनगर येथे सेवारत असलेल्या एका लिपीकेने(वर्ग-३) शेताच्या फेरफार ची नक्कल देण्यासाठी एका शेतकऱ्याकडून लाचेची मागणी केली व पंचासमक्ष ती लाच स्विकारली होती.याप्रकरणी सन २०१६ मध्ये हिमायतनगर पोलीसात लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांनी गुन्हा दाखल केला होता. सदरील गुन्ह्यात सबळ पुराव्यांनी ती लिपीका दोषी ठरल्याने भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय.एम.एच.खरादी यांनी दि.३१ जुलै रोजी त्या लिपीकेला ३ हजार रुपये द्रव्यदंड व ३ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.केवळ १२० रुपयाची लाच घेणे त्या लिपीकेस खुपच महाग पडले असून सदरील निर्णयाने लाच घेऊ पाहणाऱ्या अनेकांचे धाबे दणाणले आहे.

सविस्तर असे की,माधव राजाराम थोटे या शेतकऱ्याने लाच लुचपत प्रतिबंध विभाग नांदेड येथे जावून दि.३० मे २०१६ रोजी तकार दिली की,एक लोकसेविका नामे श्रीमती सुनीता दत्तात्रय गोपेवाड(३५)व्यवसाय नोकरी, लिपीक,तहसिल कार्यालय हिमायतनगर,रा.रहिम कॉलनी हिमायतनगर जि. नांदेड,मुळ गाव लोहगाव ता.बिलोली (वर्ग-३) यांनी गट क्र. २२५ मधील शेताच्या फेरफार क्र.७६१ ची नक्कल देण्यासाठी लाच मागितली आहे.यावरुन लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडचे पोलीस निरीक्षक बी.एल.पेडगावकर यांच्या पथकाने हिमायतनगर येथे येऊन तक्रारी संबंधाने पडताळणी केली. यावेळी उपरोक्त लिपीकेने फेरफार नक्कल देण्यासाठी पंचासमक्ष पैशाची मागणी करून स्वतः १२० रुपयांची लाच स्विकारली.यावेळी ती लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्या लिपीकेस रंगेहाथ पकडले.तसेच ती फेरफार नक्कल त्यांच्या ताब्यातील कपाटात ठेवून स्वतः चा आर्थिक फायदा करून घेतला म्हणून हिमायतनगर पोलीसात गु.र.नं. ७८/२०१६ कलम ७,१३(१),(ड) सहकलम १३(२) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ प्रमाणे उपरोक्त लिपीकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरील गुन्ह्याचे तपासीक अंमलदार लाचलुचपत प्रतिबंध विभाग नांदेडचे पोलीस निरीक्षक बी.एल.पेडगावकर यांनी सखोल तपासाअंती दि.७ सप्टेंबर २०१६ रोजी भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र यायालयात क्र.२६/२०१६ ने दोषारोप पत्र दाखल केले.दरम्यानच्या काळात न्यायालयाने ४ साक्षीदार तपासले.यावेळी आरोपीचे वकील व सरकारी अभियोक्ता ॲड. श्रीमती शैलजा पाटील व ॲड.श्रीमती अनुराधा गोवर्धन रेडडी (डावकरे) यांच्यात झालेल्या युक्तीवादात सरकार पक्षाची बाजू भक्कम ठरली.साक्षीदारांची साक्ष व सबळ पुरावे या लिपीकेच्या विरुद्ध गेले आणि ती दोषी ठरली.यावरुन भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय.एम.एच. खरादी यांनी दि.३१ जुलै २०२४ रोजी लाच घेणाऱ्या लिपीका सुनीता गोपेवाड यांना कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मध्ये १ वर्षाचा कारावास व १ हजार रुपये द्रव्यदंड आणि कलम १३ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मध्ये २ वर्षाचा कारावास व ३ हजार रुपये द्रव्यदंड.तसेच द्रव्यदंड न भरल्यास तीन महिन्याचा वाढीव कारावास अशी एकूण ३ हजार रुपये द्रव्यदंड व ३ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.तर सदरील गुन्ह्याच्या न्यायालयीन कामकाजा दरम्यान पैरवी अधिकारी म्हणून लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड चे पो.नि.जमिर नाईक,पो.नि.बी.एन.थोरात,पो.ना.प्रदीप कंधारे यांनी काम पाहिले आहे.विशेष बाब म्हणजे ती लाच किती रुपयाची घेतली होती ? हे महत्वाचे नसून अगदी शुल्लक रक्कमेची लाच घेणे देखील गुन्हाच असतो हे या निकालावरुन समोर आले असून केवळ १२० रुपयाची लाच घेणे सदरील लिपीकेस खुप महागात पडले आहे.यामुळे लाच घेऊ पाहणाऱ्या अनेकांचे धाबे दणाणले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !