Sun. Dec 22nd, 2024

क्रीडा प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांची शिष्या कु.राणी जाधव ची महाराष्ट्र बेसबॉल संघात निवड

Spread the love

श्री शाहू विद्यालयाची विद्यार्थिनी व भोकर तालुक्याच्या या भूमिकन्येचे होत आहे विविध स्तरातून अभिनंदन!

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : श्री शाहू विद्यालय भोकर येथील इयत्ता १० ची विद्यार्थिनी व क्रीडा प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांची शिष्या कु.राणी तिरुपती जाधव हिची क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बारामती पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या शालेय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतून राष्ट्रीय बेसबॉल निवड चाचणीत लातूर विभागातून महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली असून तिच्या निवडीचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बारामती,पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या शालेय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतून विविध विभागातून राष्ट्रीय बेसबॉल निवड चाचणी संपन्न झाली.या निवड चाचणीमध्ये लातूर विभागातून नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्याची भूमिकन्या कु.राणी तिरुपती जाधव हिची निवड महाराष्ट्र बेसबॉल संघात झाली आहे.जानेवारी २०२४ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेत ती लातूर विभागासह महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. भोकर तालुक्यातील ग्रामीण भागातील आमठाणा तांडा येथील ही क्रीडापट्टू भूमिकन्या श्री शाहू महाराज विद्यालय भोकर येथे इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेत असून मंजूळाबाई किन्हाळकर शाळा भोकर च्या प्रांगणात येथील विविध क्रीडा स्पर्धेचे सराव घेणारे बेसबॉल राष्ट्रीय खेळाडू तथा बेसबॉल मुख्य प्रशिक्षक बालाजी एल.गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ती या खेळाचे प्रशिक्षण आणि सराव घेत होते.या सरावाच्या बळावरच तिची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय शालेय स्पर्धा जानेवारी २०२५ मध्ये नांदेड येथे होणार असून सबंध भारतातील खेळाडू या स्पर्धेसाठी नांदेड मध्ये दाखल होणार आहेत.त्या स्पर्धांतील खेळाडूंचे क्रीडा कौशल्य पाहण्याचे भाग्य क्रीडाप्रेमींना मिळणार आहे.भोकर तालुक्यातील ग्रामीण भागातील व श्री शाहू विद्यालय भोकर ची विद्यार्थिनी आणि क्रीडा प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांची शिष्या कु.राणी तिरुपती जाधव हिचे महाराष्ट्र राज्य संघातील क्रीडा कौशल्य ही पहावयास मिळणार आहे.क्रीडा प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांच्या अविरत प्रशिक्षणातून ही खेळाडू घडली असल्याने दोघांचेही कौतुक होत आहे.कु.राणी जाधव हिच्या  यशाबद्दल नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे,श्री शाहूचे मुख्याध्यापक संजय सावंत देशमुख,उपमुख्याध्यापक किन्हेवाड,क्रीडा शिक्षक अब्दुल सलीम,वर्गशिक्षक चव्हाण,कुलकर्णी,रातोळे विजन एज्युकेशन पॉईंट चे संचालक एस.पी.रातोळे,बेसबॉल असोसिएशनचे जिल्हा सचिव आनंदा कांबळे,बेसबॉल पंच, विशाल कदम,आकाश साबणे,संपादक उत्तम बाबळे यासह आदींनी तिचे अभिनंदन करुन पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !