Fri. Apr 11th, 2025
Spread the love

“इच्छाशक्ती ते ध्येयपूर्ती… ध्येयपूर्ती ते कर्तव्य सेवापूर्ती”
गाठलेल्या पोलीस खात्यातील खाकी वर्दीतील दर्दी माणूस सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश व्ही.भाले यांच्या कर्तव्य सेवापूर्ती अर्थातच सेवानिवृत्ती निमित्त हा विशेष लेख-उत्तम बाबळे,संपादक

सरकारी कर्मचारी होत किंवा अधिकारी म्हटलं की,पद नियुक्ती, बदली,पदोन्नती व सेवानिवृत्तीचे चक्र ठरलेलेच असते.हे चक्र फिरतांना दरम्यानच्या काळात त्या खात्याच्या परिघात व परिघाबाहेर जनसेवेचे बजावलेले कर्तव्य,राबविलेल्या उत्तमोत्तम अभिनव योजना,वंचित, शोषित,पीडितांना मिळवून दिलेला न्यायीक लाभ, सौजन्यशीलता,सुसंस्कारी कार्यशैली आणि आपल्या सहकाऱ्यांसोबत दिलेली वागणूक यांसारख्या अनेक बाबी या गावातून त्या गावी बदली झाली किंवा सेवानिवृत्ती झाली तरी अनेकांच्या मनावर कायमची छाप सोडून जातात.याची परिणीती जेंव्हा बदली होते तेंव्हा त्या ठिकाणची लोकं व सहकारी जे प्रेम व सन्मान सोहळ्यातून देतात ते त्या कर्मचारी तथा अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची पोचपावतीतून पहावयास मिळते. असाच एक कर्तव्यनिष्ठ,सौज्वळ,न्यायीक व शिस्तप्रिय एक ‘दबंग आणि जिगरबाज’ पोलीस अधिकारी मला पाहता,अनुभवता आला.तो पोलीस अधिकारी म्हणजे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश वसंतराव भाले होय…

प्रचंड ध्येयवादी,अविरत कष्ट करण्याची तयारी,सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव,आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती, महापुरुषांच्या जीवनकार्याविषयी वाचनाची व त्यातील चांगले गुण अंगीकारण्याची वृत्ती असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांनी सरकारी नौकरी करत असतांनाही अधिकारी असल्याचा आविर्भाव,बडेजाव कधीही दाखविला नाही,तर सदैव एक जनसेवक असल्याची जाणीव ठेवून सेवा बजावली. यामुळेच त्यांनी सर्वसामान्य नागरिक,पोलीस कर्मचारी, अधिकारी,मित्र,कुटुंबीय ह्या सर्वांची मने जिंकून घेतली.परंतू ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद अंगीकारुन कर्तव्यात कसूर कदापिही केली नाही.सर्वांना हा व्यक्ती आपलाच माणूस, सहकारी,मित्र आहे असेच वाटणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश वसंतराव भाले यांचे मूळ गाव छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद).संरक्षण विभागात भरती होऊन जनसेवा करावी हे ध्येय उराशी बाळगून सुरेश भाले हे वयाच्या अगदी १७ व्या वर्षी पोलीस निवड चाचणीसाठी धावपट्टीवर पोलीस व्हायचे स्वप्न घेऊन धावले.पोलीस होण्याचे स्वप्न घेऊन धावपट्टीवर धावलेल्या हा ध्येय वेडा तरुण पोलीस परिक्षेत उत्तीर्ण झाला.परंतू वय कमी असल्याने निवड पात्रता यादीत नाव आले नाही.निवड पात्रता यादीत नाव आले नाही हे पाहून खचून न जाता ध्येयपूर्तीसाठी जिद्द कायम ठेवली व धावपट्टी हेच माझं आयुष्य म्हणत प्रचंड मेहनतीने पुढच्या वर्षी त्याच धावपट्टीवर धाव घेतली.आणि यावेळी मात्र यश प्राप्त झाले व दि.१६ फेब्रुवारी १९८७ रोजी ते पोलीस विभागात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले.

त्यानंतर पोलीस प्रशिक्षण केंद्र,जालना येथे पोलीस प्रशिक्षण पुर्ण करून तत्कालीन औरंगाबाद व आजच्या छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात दोन वर्ष सेवा बजावली.यानंतर वाळुंज एमआयडीसी,शहर वाहतूक नियंत्रण, एमआयडीसी पोलीस ठाणे अशा विवध ठिकाणी कर्तव्य सेवा बजावली.ही सेवा बजावतांना हा ध्येयवेडा तरुण या पदावर समाधान नव्हता.कारण पोलीस अधिकारी व्हायचे स्वप्न घेऊन ते या विभागात आले होते.वाळूज एमआयडीसी येथे कार्यरत असताना याच दरम्यान पोलीस विभागांतर्गत पोलीस अधिकारी परीक्षेची जाहिरात निघाली होती.मग ही नामी संधी सुरेश भाले सोडतील असे कसे बरे होईल ? ज्या गोष्टीचा कायम ध्यास होता ती वेळ जवळ आली होती.अभ्यासू वृत्ती,जिद्द व कष्ट या जोरावर त्यांनी ती परिक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळाले.खाकी वर्दी वरील बक्कल नंबर गेला व महाराष्ट्र पोलीस सेवा अर्थातच पोलीस उपनिरीक्षक सुरेश वसंतराव भाले असे नामफलक वर्दीवर लागले.ज्या वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात ते पोलीस कॉन्स्टेबल असणारे सुरेश भाले हे आता त्याच पोलीस स्टेशनमधे होते त्याच ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर सुरेश भाले हे पोलीस अधिकारी म्हणून सेवारत झाले.त्यानंतर दोन वर्ष वाळूज एमआयडीसी व नंतर सिटी चौक पोलीस स्टेशन येथे सेवा बजावली.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) परिक्षेत्रातील कार्यकाळ संपल्यानंतर जालना जिल्ह्यातील कदिम पोलीस ठाणे येथे ते रुजू झाले.त्याच ठिकाणी आपल्या कर्तबगारीने गुन्हेगारीवर आळा घातला व अनेक गुन्हे उघडकीस आणून एक कर्तबगार अधिकारी म्हणून ठसा उमटवला.त्यातील एका गुन्ह्याचा उल्लेख करावाच लागेल…तो असा की,दि.२९ ऑक्टोबर २०१३ रोजी रात्री ७:३० वाजताच्या दरम्यान पोलीस ठाण्यात माहिती मिळाली की,मोरांडी मोहल्ला मध्ये खुन झाला आहे. लोक जमा झाले आहे.काहीही होवु शकते ? माहिती अपूर्ण होती,परंतू गंभीर स्वरुपाची होती.यावेळी तत्कालीन पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक सुरेश भाले व इतर कर्मचारी असे त्यांचे सोबत घटनास्थळी रवाना झाले घटनास्थळी पोहचले.तेव्हा मारुती मंदीराजवळ लोक जमा झालेले होते. त्यांच्या कडून माहिती मिळाली की,”मोरांडी मोहल्ला येथील नवरात्र महोत्सवानिमित्त देवी स्थापनेच्या वर्गणीचे पैसे देवाण घेवाणीच्या कारणावरुन वाद झाला होता व त्यामध्ये गणेश येवले याचे पोटात चाकू मारला आहे.त्यास दिपक हॉस्पीटल येथे उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान तो मरण पावला होता.मयताचे वडील लक्ष्मण शामराव येवले यांनी पोलीसात तक्रार दिल्यावरुन गुरन.२७४/१८ कलम ३०२,३२३,५०४, ५०६,३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला.ऐन दसरा व दिवाळी उत्सवामध्ये एक तपासणीक अधिकारी म्हणून पो.उप. नि.सुरेश भाले यांच्या समोर हे आव्हान उभे राहिले.सणा निमित्त सुट्टी घ्यावी व परिवारासोबत सण साजरा करावा असे वाटत असतांनाच त्या आनंदोत्सवास अधिकचे महत्त्व न देता कर्तव्यास प्राधान्य दिले व तपासाकडे लक्ष केंद्रीत केले. गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करण्यात त्यांना यश आले व तपासाअंती अतिरिक्त जिल्हा न्यायालय जालना येथे दोषारोप पत्र दाखल केले.यावेळी आरोपी व त्यांच्या समर्थकांनी पो.उप. नि.सुरेश भाले यांना त्रास देण्याचा खुप प्रयत्न केला.परंतू त्यास सडेतोड प्रतितोत्तर दिले व सबळ साक्ष आणि पुराव्यांच्या आधारे दि.१७ ऑगस्ट २०१६ रोजी न्यायाधीश एन.पी.कापुटे यांनी आरोपी छगन उर्फ ऋषी रामा जाधव यांना जन्मठेप व ५ हजार रुपये दंड व आरोपी रामा आबाजी जाधव,सौ.ज्योती रामा जाधव,राणी छगन- उर्फ ऋषी जाधव यांना प्रत्येकी एक वर्ष कैद व प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा दिली.दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रातून आरोपींच्या शिक्षेच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि अन्यायग्रस्त पीडित कुटुंबाला न्याय देऊ शकल्याने परिवारात सण साजरा करण्यापेक्षा ही मोठा आनंद पो.उप.नि.सुरेश भाले यांना झाला.सदरील निर्णयास आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान पर याचिका दाखल केली.परंतू मा.उच्च न्यायालयाने देखील आरोपी आरोपी छगन उर्फ ऋषी जाधव यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली.तपासणीक अधिकारी म्हणून त्यांच्या या यशस्वी तपासास हे श्रेय जाते.अनेक गुन्ह्यात यशस्वी कर्तव्य पार पडल्याने पो.उप.नि.सुरेश भाले यांना सहायक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झालेल्या सुरेश भाले यांची नांदेड जिल्ह्यात बदली करण्यात आली.सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नांदेड जिल्ह्यातील भोकर पोलीस ठाण्यात प्रथम नियुक्ती झाली.सन २०१७ ते २०१९ पर्यंत सलग दोन वर्ष भोकर येथे,सन २०१९ ते २०२१ पर्यंत मुदखेड पोलीस ठाणे येथे कर्तव्य बजावले.या दरम्यानच्या काळात त्यांनी अनेकांना आपलेसे केले व त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे अनेकजण त्यांचे मित्र ही झाले.परंतू असे असतांनाही कसल्याही दबावास ते बळी पडले नाहीत व अनेक ‘व्हाईट कॉलर’ बड्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची हिंमत दाखवून दिली.यामुळेच माझ्यासारखे न्यायप्रिय लोक त्यांचे मित्र झाले. नांदेड जिल्ह्यातून प्रथम पूर्णा येथे व नंतर परभणी येथे त्यांची बदली झाली.पुर्णा येथे सन २०२१ ते २०२३ पर्यंत कर्तव्य बजालवल्या नंतर त्यांची परभणी येथे बदली झाली.या दरम्यानच्या काळात त्यांनी असंख्य गुन्हे हाताळले व तपासणीक अधिकारी म्हणून कार्य पार पडले.त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह काही न्यायाधीश महोदयांनी देखील त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.त्यांच्या कामाविषयी कदापीही कसलीही तक्रार निर्माण झाली नाही व त्यांच्या कामाचे स्वरूप पाहून त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक मोठा मित्रपरिवार निर्माण झाला.

पोलीस विभाग म्हटले की,२४ तास ऑन ड्युटी… त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांना कर्तव्य पार पाडतांना कुटूंबियांना मात्र म्हणावा तसा वेळ देता आला नाही. ह्याची खंत त्यांच्या मनात होती. निष्कलंक ३५ वर्ष सेवा बजावली.यादरम्यान त्यांना गैरमार्गाने पैसा जमवता आला नाही.त्यामुळे एक मोठे व पक्के घर उभारता येऊ शकले नाही. आपले पक्के घर असावे हे स्वप्न अपुरेच राहिले आहे.घराचे स्वप्न पुर्णत्वास येण्यापेक्षा मुलांचे शिक्षण,लग्न ह्या बाबींना त्यांनी अधिकचे महत्त्व दिले.समाजमन सांभाळत कुटूंबाची जबाबदारी तितकीच महत्त्वाची म्हणत त्यांनी सेवानिवृत्ती साठी ३ वर्ष शिल्लक असताना घर जवळ केले.छत्रपती संभाजीनगर येथे बदली व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले.परंतू पोलीस ठाण्या ऐवजी त्यांची बदली छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे झाली.त्यानंतर इगतपुरी रेल्वे स्टेशन,छत्रपती संभाजीनगर रेल्वे पोलीस ठाणे,जालना रेल्वे पोलीस ठाणे येथे लोहमार्ग पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी कर्तव्य पार बजावले. यानंतर चाळीसगाव लोहमार्ग पोलीस ठाणे येथे त्यांची बदली झाली व येथेच कर्तव्य सेवापुर्ती अर्थातच सेवानिवृत्ती ही झाली. पोलीस विभागात एक पोलीस कॉन्स्टेबल म्हणून दि.१६ फेब्रुवारी १९८७ रोजी सुरु झालेला प्रवास लोहमार्ग पोलीस विभागाच्या धावपट्टीवर दि.३१ जानेवारी २०२५ रोजी संपला…

सर्वसामान्य कुटूंबातून आलेल्या,दुर्दम्य इच्छाशक्ती, चिकाटी व जिद्दीच्या जोरावर एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून सुरेश वसंतराव भाले यांच्याकडे पाहिले जाते.दि.३१ जानेवारी २०२५ रोजी वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झाले.या औचित्याने चाळीसगाव लोहमार्ग पोलीस ठाणे येथे त्यांचा कर्तव्य सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांचा सपत्नीक यथोचित सत्कार केला.या सोहळ्याच्या औचित्याने पोलीस अंमलदार सय्यद मोसिन,पंकज पाटील,वैभव नागरे,राहुल पाटील,विजय जाधव, राजू कोळी,मुजीब शेख यांनी मनोगतातून त्यांना पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.तर सत्कार मुर्ती म्हणून सुरेश भाले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शैलजा भाले यांनी आपल्या मनोगतातून पोलीस विभागातील सर्व अधिकारी,कर्मचारी व ज्यांनी ज्यांनी या नौकरी प्रवासात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केले त्यांचे ऋण व्यक्त केले.या गौरव सोहळ्याचे सुरेख असे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील सावळे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार अजित तडवी यांनी मानले.पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर यांच्या आदेशाने महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी ढगे यांना सुरेश भाले यांनी त्यांचा पदभार दिला व चाळीसगाव लोहमार्ग पोलीस ठाणे सोडले.परंतू हे पोलीस ठाणे सोडतांना सर्व सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर भव्य पुष्पवृष्टी केली आणि फुलांनी सजविलेल्या सरकारी वाहनातून त्यांची रवानगी केली.यातून एका निष्कलंक पोलीस अधिकाऱ्यावरील असलेले प्रेम निदर्शनास येते…

जन्मभूमी ते कर्तव्यभूमीतच सहायक पोलीस निरीक्षक सुरेश वसंतराव भाले यांची कर्तव्य सेवापूर्ती झाली.ते एक चालते बोलते विद्यालय,पुस्तकी ज्ञान,लेखन वाचनाची प्रचंड आवड असणारा,खाकी वर्दीत लपून राहिलेला त्यांच्यातील उत्तम वक्ता,अभ्यासू साहित्यिक मी जवळून पाहिला आहे व अनुभवलेला ही आहे.माझ्या आईच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अनाथालयात उबदार कपडे व अन्नदान उपक्रमात सहभागी होऊन मित्रांच्या सुख दु:खात सहभागी होणारा वर्दीतल्या दर्दी माणूस मी पाहिला आहे.उत्तम कुटुंबप्रमुख,चारित्र्यसंपन्न, निष्कलंक व्यक्तिमत्व सेवा निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांच्या जीवनाची नवी इनिंग सुरु झाली आहे. नौकरीस आपले कर्तव्य मानून सेवा बजावणारे सुरेश भाले हे पोलीस विभागातील अधिकारी,कर्मचारी व स्नेहिजणांसाठी एक आदर्श व्यक्तीमत्व आहे..!
त्यांनी उभं आयुष्य पोलीस विभाग,समाज व स्नेहिजणांसाठी वाहून घेतले.अशा दिलदार व्यक्तिमत्वास उपरोक्त प्रमाणे अपुऱ्या शब्दात रेखाटता येणे शक्य नाही.
त्यामुळे….
कितीही सुखद असली तरी
कुठेतरी संपणारी वाट असते
पण संपणाऱ्या वाटे सोबतच
जन्मनारी नवी पहाट असते
तेव्हा त्यांचा सेवापूर्ती सोहळा
संपणारी वाट न ठरता
उज्वल भवितव्याची पहाट ठरावी…

यासाठी खाकी वर्दीतल्या या दर्दी माणसास व कुटूंबियांना पुढील यशस्वी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो!

उत्तम बाबळे,संपादक
भोकर जि.नांदेड


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !