खा.चव्हाण यांच्या स्नेह भेटीतल्या ‘शिर खुरम्याचा गोडवा’ ईव्हीएम मधून प्रकटेल काय ?

प्रेमरुपी भाई चाऱ्याच्या ‘सुगंधी ईत्तराला’ राजकीय बेरीज-वजाबाकीच्या हेतूचा ‘गंध’ लागला असल्याने ‘गोडवा’ प्रकटणार नसल्याचा अनेकांनी व्यक्त केला अंदाज…!
थेट जमिनीवरचे वृत्त-उत्तम बाबळे,संपादक
भोकर : बहुसंख्य मुस्लिम,दलिततांचा जनाधार असलेला पक्ष त्यागून भाजपा परिवारात सहभागी होऊन भोकर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे राज्य सभेचे खासदार झाले. पुर्वाश्रमीच्या पक्षिय मित्रपरिवारांचे नाते अद्यापही त्यांनी जपलेले असून पवित्र रमजान ईद सणानिमित्त नांदेड व विशेषतः भोकर विधानसभा मतदार संघातील काही निवडक मुस्लिम बांधवांच्या घरी भेटी देऊन सुखा मेवा आणि शिर खुरम्याचा आस्वाद घेत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.परंतू ही स्नेह भेट होऊ घातलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ च्या प्रचार कार्यकाळादरम्यान झाली असल्याने प्रेमरुपी भाई चाऱ्याच्या ‘सुगंधी ईत्तराला’ राजकीय बेरीज-वजाबाकीच्या हेतूचा ‘गंध’ लागला असल्याने या स्नेह भेटीतल्या ‘शिर खुरम्याचा गोडवा’ ईव्हीएम मशिन मधून प्रकटेल काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून ‘तो’ ‘गोडवा’ प्रकटणार नसल्याचा अंदाज अनेकांतून व्यक्त होत आहे.
भाजपा परिवारात सहभागी झालेले माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्यावर १६-नांदेड लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांना निवडणूक आणण्याची जबाबदारी आहे.नव्हे तर तो त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असून पुढील राजकीय अस्तित्व त्यावरच ठरणार आहे.त्यामुळे ‘स्टार प्रचारक’ असतांनाही नांदेड जिल्ह्याबाहेर प्रचारासाठी अद्याप तरी ते गेल्याचे निदर्शनास येत नाही.दरम्यानच्या काळात त्यांनी भोकर येथे माजी नगराध्यक्षांच्या घरी काँग्रेस पक्षाच्या काही निवडक जुन्या दलित व मुस्लीम पदाधिकारी,कार्यकर्ते,माजी नगरसेवक आणि हितचिंतकांची बैठक घेतली.यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान काहींनी आम्ही आपल्या सोबतच आहोत असे म्हटले.परंतू ‘एका दलित माजी नगरसेवकाने’ मात्र परखड व निर्भिडपणे स्पष्टच सांगितले की…साहेब दलित आणि मुस्लीम मतदार हे भाजपा तथा महायुतीचा उमेदवारास जरी आम्ही कितीही सांगितलोत तरी ते मतदान करत नाहीत.त्यामुळे आम्ही प्रचार ही करु शकत नाहीत व त्यांना मतदान करण्याचे आवाहन ही करु शकत नाहीत.याची लक्षणीय दखल खा. अशोक चव्हाण यांनी घेतली व दलित आणि मुस्लीम मतदारांना आपल्याकडे कसे वळवता येईल? याकडे ‘लक्ष्य’ वळविले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून खा.अशोक चव्हाण यांनी ‘पवित्र रमजान ईद’ सणाच्या निमित्ताने भाजपात असलेल्या जुन्या मुस्लीम कार्यकर्त्यांच्या घरी न जाता अन्य पक्षातील,नव्याने भाजपात आलेल्या व पक्षात नसलेल्या काही जणांच्या घरी जाऊन शुभेच्छा देण्याचे ठरविले.याच अनुषंगाने त्यांच्या जवळील विश्वसनीयांनी जिल्ह्यातील काही मुस्लिम बांधवांच्या घरी जाण्यासाठीची निश्चिती केली.तर विशेषतः त्यांच्या भोकरच्या विश्वसनीय ‘त्रिकुटाने’ भोकर येथील निवडक मुस्लिम बांधवांच्या घरी जाण्याची ‘फिल्डींग’ लावली.लग्न, वाढदिवस,अंत्यविधी,सामाजिक,धार्मिक सण उत्सवात सर्वांना निमंत्रित केले जाते व विरोधक असोत का शत्रू यांना यात सहभागी करुन घेत त्यांचा आदरातिथ्य केला जातो ही आपल्या देशाची संस्कृती आहे.त्यामुळे घरी येत असलेल्या खा.अशोक चव्हाण यांना कोणीही नकार दिला नाही व त्यांचा आदरातिथ्य आणि पाहुणचार करण्याच्या हेतूने त्यांनी होकार दिला.त्यानुसार खा.अशोक चव्हाण यांनी गुरुवार,दि.११ एप्रिल २०२४ रोजी सकाळी भोकर शहरातील बिलाल नगर येथील काँग्रेस पक्षाचे माजी भोकर शहराध्यक्ष रमिजोद्दीन उर्फ खाजू तकीयोद्यीन इनामदार,भाजपात नव्याने प्रवेश केलेले डॉ.फेरोज खान इनामदार व गंदेवार कॉलनी येथील नाजिम शेख,तसेच श.प्रफुल्ल नगर येथील काँग्रेस पक्षातील जुने सहकारी माजी उपनगराध्यक्षांचे प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते शेख युसूफ,किनवट रोड येथील फर्निचर उद्योजक माजिद लाला, सईद नगर येथील सानिया मेडिकल चे मालक शेख रफिक यांच्या घरी स्नेह भेट दिली व सुखा मेवा,शिर खुरम्याच्या गोडव्याचा आस्वाद घेतला आणि उपरोक्तांसह उपस्थित मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी आमदार अमरनाथ राजूरकर,बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर,भगवानराव दंडवे,माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर,साहेबराव सोमेवाड,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर,भाजपाचे भोकर तालुकाध्यक्ष गणेश पाटील कापसे,ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड,संचालक रामचंद्र मुसळे,उज्वल केसराळे,सारंग मुंदडा,भाजपाचे प्र.का.स.दिलीप सोनटक्के,भाजपाचे भोकर शहराध्यक्ष विशाल माने, सुभाष पाटील,माजी पंचायत समिती सदस्य शेख जवाजोद्दीन बरबडेकर,आत्रीक पाटील मुंगल, विठ्ठल माचनवाड,बाबुराव बिल्लरवार,मिर्झा ताहेर बेग,राजू पाटील दिवशीकर,विठ्ठल धोंडगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.तर ज्यांच्या घरी भेटी दिल्यात त्यापैकी बहुतांश जण खा.अशोक चव्हाण यांचे हितचिंतक असले तरी महायुतीचे समर्थक मात्र नसल्याचे समजते.
स्टार प्रचारक खा.अशोक चव्हाण हे भोकरला आले,प्रेमरुपी सुखा मेवा व शिर खुरम्याच्या गोडव्याचा आस्वाद घेऊन गेले. परंतू ज्यांच्या घरी ते गेले होते त्यांना मात्र काही मुस्लिम बांधवांच्या व विरोधकांच्या टिकेच्या सामोरे जावे लागले आणि काहींनी समाज माध्यमांवरुन त्यांना ‘ट्रोल’ करण्याचा प्रयत्न ही केला.भारतीय संस्कृती प्रमाणे खा.अशोक चव्हाण व त्या मुस्लिम बांधवांनी ‘भाई चारा’ जपण्याचा प्रयत्न केला असला तरी हा कार्यकाळ होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीचा असल्याने मतांच्या बेरीज-वजाबाकीच्या राजकीय हेतूने या भेटी घेतल्या गेल्या आहेत ? तसेच महायुतीच्या उमेदवारास हे मतदान होणारच नाही तरी ते त्या ठिकाणी का बरे गेलेत ? खा.अशोक चव्हाण यांना मुस्लिम बांधवांना शुभेच्छा द्यायच्या होत्याच तर ते ‘ईदगाह’ ठिकाणी का गेले नाहीत.असे प्रश्न अनेकांतून चर्चील्या गेले आहेत.त्यामुळे प्रेमरुपी भाई चाऱ्याच्या ‘सुगंधी ईत्तराला’ राजकीय हेतूचा ‘गंध’ लागला असल्याचे ही बोलल्या जात आहे.हे वास्तव असले तरी खा. अशोक चव्हाण यांचे सर्व धर्मीय लोकांशी ‘चितसंबध’ असल्यामुळे त्यांचे सहकार्य काही प्रमाणात का होईना यावेळी मिळेलच,अशी अपेक्षा केली जात आहे.तसेच या स्नेह भेटीचा व हितसंबंधांचा महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना कितपत फायदा होईल हे दि.४ जून २०२४ रोजी समजणारच असून या स्नेह भेटीतल्या ‘शिर खुरम्याचा गोडवा’ ईव्हीएम मधून प्रकटणारच आहे.
असो… म्हणतात ना…’ये पब्लिक है भाई,सब जानती है!’ या भेटी मागील खरा उद्देश काय होता ? हे ज्यांना समजून घ्यायचे आहे त्यांनी समजून घेतले आहे व पुढे काय निर्णय घ्यायचा आहे तो घेतीलच.मराठा,मुस्लीम व दलित मतदार बांधवांचा कल अद्याप तरी महायुतीच्या उमेदवाराकडे झुकलेला दिसत नाही.शेवटी काय तर मॅनेजमेंट गुरु खा. अशोक चव्हाण हे प्रचार यंत्रणेतून काय ‘अर्थ’ देणार व सुजाण मतदार बांधव काय ‘अर्थ’ घेणार ? हे ‘त्या’ ईव्हीएम मशिन मधील गोडव्याने-कडव्याने पुढे दिसणारच आहे.तोपर्यंत त्या यश-अपयशच्या क्षणाची आपण वाट पाहुयात…!