खा.अशोक चव्हाण यांनी तेलंगणाचे लक्ष्मीअस्त्र परतवून लेकीसह मविआच्या नाकी टिच्चून ‘नऊ’ आमदार आणले
१० आमदार असलेल्या नांदेडला मंत्रीपद मिळवून घेण्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार ?
उत्तम बाबळे,संपादक
भोकर : माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करुन काँग्रेस महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला.त्यामुळे भोकर विधानसभा मतदार संघ व एकूणच नांदेड जिल्ह्यातून खा.अशोक चव्हाण यांचे अस्तित्व संपले म्हणून विरोधकांनी टिका,टिप्पणी,ट्रोल करत खालच्या पातळीत बोलण्यासह त्यांना ‘लक्ष्य’ केले होते.याच बरोबर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शहान्नव कुळीची भाषा,दंड थोपटवित भाषणे करत विरोधी पक्ष नेते व तेलंगणा राज्यातील लक्ष्मी अस्त्राचा वापर करुन त्यांच्या विरुद्ध विविध आक्रमणे केली.परंतू सुक्ष्म नियोजन,संयमी प्रचार संभाषणे,विविध शासकीय योजनांचा आधार घेत व सर्व समाज घटकांशी स्वभेटीतून त्यांनी उपरोक्त आक्रमणे परतवून लावली आणि मविआच्या नाकी टिच्चून भूमिकन्या श्रीजया चव्हाणसह ‘नऊ’ आमदार निवडून आणले.यातून पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यावर आपले अस्तित्व असल्याचे त्यांनी सिद्ध केले.याचबरोबर आता १० आमदार असलेल्या नांदेड जिल्ह्याला मंत्रीपद मिळवून घेण्यात ही त्यांचीच भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचे बोलल्या जात आहे.
फेब्रुवारी २०२४ मध्ये माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक चव्हाण यांनी पक्ष व आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपा प्रवेशातून राज्यसभेची खासदारकी मिळवली.गेल्या काही महिन्यांपूर्वी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली.यावेळी तत्कालीन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भाजपा महायुतीचे उमेदवार म्हणून १६-नांदेड लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. तर काँग्रेसने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. खा. अशोक चव्हाण व खा.प्रतापराव पाटील चिखलीकर या दोघांची ताकत एकत्र आल्याने महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे असे मानल्या जात होते.परंतू तसे न होता भाजपाच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वसंतराव चव्हाण यांनी ५९ हजार ४४२ मतांनी पराभव केला होता.पुढे दि.२६ ऑगस्ट २०२४ रोजी खा.वसंतराव चव्हाण यांचे अकाली दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे १६-नांदेड लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक व विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक एकत्र लागली.या निवडणूकीत ही काँग्रेसने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून स्व.खा.वसंतराव चव्हाण यांचे पुत्र प्रा.रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली.तर त्यांच्याविरोधात भाजपाने संतुकराव हंबर्डे यांना महायुतीची उमेदवारी दिली.खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पराभवाने खा.अशोक चव्हाण यांचे अस्तित्व संपले असून लोकसभेची पोटनिवडणूक व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील सर्व जागा महाविकास आघाडीच जिंकेल अशा वल्गना विरोधकांनी केल्या.काही तांत्रिक कारणांमुळे संतुकराव हंबर्डे यांचा पराभव झाला व प्रा. रविंद्र चव्हाण यांचा मतपत्रिकेतून अवघ्या काही मतांनी निसटता विजय झाला.बहुतांश वेळा निधन झालेल्या लोकप्रतिनिधींच्या कुटूंबातील व्यक्ती ही सहानुभूतीच्या कारणाने जिंकून येते आणि यावेळी देखील तसेच झाले असावे.परंतू संतुकराव हंबर्डे याना बरोबरीची मते मिळाली आहेत.त्यामुळे खा.अशोक चव्हाण यांचे लोकसभा मतदार संघातील वर्चस्व संपले असे म्हणता येणार नाही.
भोकर विधानसभा मतदार संघातून सन १९६७ व १९७२ मध्ये स्व.डॉ.शंकरराव चव्हाण,सन १९८० व १९८५ मध्ये स्व. बाबासाहेब देशमुख गोरठेकर,सन १९९० व १९९५ मध्ये डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर,सन २०१४ मध्ये अमिता अशोकराव चव्हाण,तर सन २००९ व २०१९ मध्ये खा.अशोक चव्हाण यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूका जिंकल्या व आमदारकी आणि मुख्यमंत्री पद उपभोगले.दरम्यानच्या काळात स्व.बाबासाहेब देशमुख गोरठेकर यांनी अपक्ष व त्यांचे पुत्र स्व.बापूसाहेब देशमुख गोरठेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार म्हणून या मतदार संघातून निवडून आले.या दोघांना वगळता सन २०१९ पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उपरोक्त आमदारांनी एकूण ९ वेळा भोकर विधानसभा मतदार संघातून विजयश्री प्राप्त केली. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे असे संबोधले गेले.म्हणून सदरील मतदार संघातून पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार भूमिपुत्र तिरुपती उर्फ पप्पू कदम कोंडेकर हेच निवडून येणार असे मविआचे नेते आणि कार्यकर्त्यांतून बोलल्या जात होते.त्यांना निवडून आणण्यासाठी मनोज पाटील ‘जरांगे’ फॅक्टर,मुस्लीम व दलित मतदार त्यांच्या पाठीशी आहे असे ही प्रचारादरम्यान टिच्चून सांगण्यात येत होते.याच बरोबर सुजलाम सुफलाम असलेल्या तेलंगणा राज्यातील ‘लक्ष्मीची’ पाऊले मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या माध्यमातून येथे पडली. तिरुपती उर्फ पप्पू कोंडेकर यांना त्या लक्ष्मीचा भरघोस आशिर्वाद मिळाला.लक्ष्मीप्रसाद वाटण्यात आला.वाढप्यांनी आखूडता हात करुन मापात पाप केल्याचेही चर्चील्या गेले.तसे पाहता दोन्ही कडून ही असेच झाल्याचे बोलल्या गेले.परंतू या लक्ष्मी अस्त्रावर खा.अशोक चव्हाण यांनी सुक्ष्म नियोजनातून दीडपट शक्तीचा वापर करुन ते अस्त्र परतवून लावले. समाजातल्या लहानात लहान घटकांना आपलेसे करुन मविआ च्या पाठीशी असलेला मुस्लिम,दलित व ‘जरांगे’ फॅक्टर ही कमकुवत करुन टाकला.तसेच यात ‘लाडक्या बहिणींची’ महत्त्वाची साथ मिळाली व या बहिणींनी लाडकी भाची,लेक ‘ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण’ यांना बहुमताने निवडून दिले. उपरोक्त नियोजनातून टिच्चून मविआच्या नाकी कन्या ॲड. श्रीजया चव्हाण सह जिल्ह्यातील एकूण ९ आमदार निवडून आणले.काँग्रेस पक्षामध्ये असतांना खा.अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातून ९ आमदार निवडून आणले होते.परंतू ते भाजपात गेल्याने त्यांना अशाप्रकारे यश त्यांना पुन्हा मिळणार नाही असे मविआतून बोलल्या जात होते.परंतू त्यांच्या या वल्गनांना पुर्णविराम देऊन त्यांनी पुन्हा एकदा ९ आमदार निवडून आणून नांदेड जिल्ह्यावरील त्यांचे वर्चस्व सिद्ध केले आहे.भोकर विधानसभा मतदार संघातून ९ वेळा काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आले असले तरी त्यात ५ वेळा ‘चव्हाण’ परिवारातील सदस्य निवडून आलेले आहेत.तसेच भोकर तालुका २२६-धर्माबाद विधानसभा मतदार संघात असतांना सन १९६२ मध्ये स्व.डॉ.शंकरराव चव्हाण काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते आणि सन १९७८ मध्ये १७२-भोकर विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आले होते.चव्हाण परिवारातील स्व.डॉ.शंकरराव चव्हाण हे अपक्ष उमेदवार असतांना त्यांनी ‘वाघ’ या चिन्हावर निवडणूक लढविली.तर खा.अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर त्यांच्या कन्या ॲड.श्रीजया चव्हाण यांनी भाजपाचे ‘कमळ’ या चिन्हावर निवडणूक लढविली व त्या ही बहुमताधिक्क्याने निवडून आल्या. सन १९६२ ते २०२४ पर्यंत ‘चव्हाण’ परिवारातील ४ सदस्य भोकर विधानसभा मतदार संघातून ८ वेळा आमदार झाले.आजोबा स्व.डॉ.शंकरराव चव्हाण व त्यांची तिसरी पिढी नात ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हा व्यतिरीक्त ही निवडून येऊ शकतोत हे सिद्ध केले आहे.त्यामुळे भोकर विधानसभा मतदार संघ हा काँग्रेस पक्षाचा बाल्ले किल्ला आहे असे न म्हणता ‘चव्हाण’ परिवाराचा पारंपरिक मतदार आहे व येथील मतदार त्यांच्या पाठीशी आहेत,असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
१० आमदार असलेल्या नांदेडला मंत्रीपद मिळवून घेण्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार ?
माघील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मविआने ४८ पैकी ३० जागा जिंकल्या व यात नांदेड लोकसभा मतदारसंघाचा ही समावेश आहे.त्यामुळे पार पडलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ही बहुसंख्येने जागा जिंकू असे मविआतून बोलल्या जात असतांनाच त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरत पार पडलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने तब्बल २३२ जागांवर दणदणीत विजय मिळवित नेत्रदीपक विजय साकारलेला आहे.महाविकास आघाडीला केवळ ५२ जागांवर यश मिळाले आहे.तर माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघातून यश संपादन केले असून नांदेड जिल्ह्याला मंत्री व पालकमंत्री मिळवून घेण्यात ही त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे,असे अनेकांतून चर्चील्या जात आहे.
खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व सुक्ष्म नियोजनातून नांदेड जिल्ह्यातील विधानसभेच्या नऊच्या नऊ जागेवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.त्यात भाजपच्या ५,शिवसेना शिंदे गटाच्या ३ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या १ उमेदवाराचा समावेश आहे.राज्याचे व नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या ८५-भोकर मतदार संघातून माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांची कन्या ॲड.श्रीजया चव्हाण,लोहा विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मोठया मताधिक्क्याने विजय मिळवला आहे.त्यामुळे नांदेडमध्ये अशोक चव्हाण पुन्हा एकदा किंगमेकर ठरले आहेत.खा.अशोक चव्हाण यांच्या कन्या ॲड.श्रीजया चव्हाण व लोहा मधून माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे निवडणूकीच्या मैदानात होते. दोन्ही नेत्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची बनली होती.या दोन्ही जागांसोबत इतर जागांवरही महायुतीने विजय मिळवला व अस्तित्व आणि प्रतिष्ठा कायम राहिली.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता जिल्ह्याला मिळणाऱ्या मंत्रिपदाकडे लक्ष लागले आहे.नांदेड जिल्ह्यात महाविकास आघाडीचा पूर्णतः सफाया करणाऱ्या भाजपा,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीतील कोणत्या आमदाराला आता मंत्रिपद मिळेल याकडे लक्ष लागले आहे.नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदार संघातून ॲड.श्रीजया चव्हाण(भाजप),किनवट मतदार संघातून भीमराव केराम(भाजप),नायगाव मतदार संघातून राजेश पवार (भाजप),मुखेड मतदार संघातून डॉ.तुषार राठोड (भाजप),देगलूर मतदार संघातून जितेश अंततापूरकर (भाजप),नांदेड उत्तर मतदार संघातून बालाजी कल्याणकर (शिवसेना),नांदेड दक्षिण मतदार संघातून आनंद बोढारकर (शिवसेना) हदगाव मतदार संघातून बाबुराव कदम कोहळीकर (शिवसेना) आणि लोहा मतदार संघातून प्रतापराव पाटील चिखलीकर( राष्ट्रवादी अजित पवार गट )विजयी झाले.तर हेमंत भाऊ पाटील हे शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार आहेत.नांदेड जिल्ह्यातील १० आमदारांत भाजपाच्या निवडून आलेल्या ५ आमदारापैकी मुखेड मधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले ओबीसी चेहरा आमदार डॉ.तुषार राठोड यांना निवडणूक प्रचारादरम्यान बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री करण्याचे आश्वासन दिले होते.शिवसेना शिंदे गटाच्या निवडून आलेल्या ३ व विधान परिषदेच्या १,अशा एकूण ४ आमदांपैकी हदगाव मधून निवडून आलेल्या आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांना मंत्री करेन असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान आश्वस्त केले होते.आमदार बालाजी कल्याणकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार असले तर दिलेला शब्द ते पाळतील काय हे महत्त्वाचे आहे.तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे संबंध असलेले माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे लोहा मधून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याने व राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव अनुभवी आमदार आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून मंत्री पदाचे ते दावेदार राहणार आहेत.
याच बरोबर आदिवासी चेहरा,जुने व अनुभवी आमदार म्हणून किनवटचे भिमराव केराम यांनी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या नावाची लॉबिंग सुरू केली आहे.असे असले तरी नांदेड जिल्ह्याचे किंगमेकर ठरलेल्या खा.अशोक चव्हाण यांच्या कन्या ॲड.श्रीजया चव्हाण या देखील भाजपाच्या आमदार झाल्या असल्याने मंत्रीपदाच्या दावेदार त्या देखील राहणार आहेत.राज्याचे नुतन मुख्यमंत्री ठरविण्याचा युतीच्या वरीष्ठ नेत्यांचा निर्णय होत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन पावलं मागे घेतली आहेत त्याच प्रमाणे नांदेड जिल्ह्याची जमलेली घडी विस्कटून न जाऊ देण्यासाठी खा.अशोक चव्हाण हे देखील जिल्ह्यातील आमदारांत समन्वय व सामंजस्य साधण्यासाठी दोन पावलं मागे घेतील आणि मोठे मन करुन इतरांना मंत्री पदाची संधी देतील? असे चर्चील्या जात आहे.लवकरच राज्याचा नुतन मुख्यमंत्री व अन्य मंत्री ठरेल आणि शपथविधी पार पडेल. सदरील शपथविधीकडे राज्यातील जनतेसह देशाचे लक्ष लागले आहे.यात नांदेड जिल्ह्याला मंत्री पद मिळेल व ते मिळवून घेण्यासाठी खा.अशोक चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.पाहुयात कोणाच्या पदरी मंत्री पद पडेल आणि खा.अशोक चव्हाण कोणास मिळवून देतील ?