जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : वारंग टाकळी ता.हिमायतनगर येथील एका व्यक्तीच्या डोक्यात व पोटात लोखंडी कत्तीने मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकास जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय भोकर चे न्यायाधीश वाय.एम. एच.खरादी यांनी दि.५ मार्च २०२५ रोजी जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.तर सबळ पुराव्या अभावी दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
बालाजी मारोतराव जाधव रा.वारंग टाकळी ता. हिमायतनगर हे दि५ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १:३० वाजताच्या दरम्यान गावातील विनोद वसराम चव्हाण यांच्या घरासमोर एका व्यक्तीसोबत बोलत बसलेले असताना यावेळी गावातीलच सुरज तानाजी चितलवाड व रामचंद्र तानाजी चितलवाड हे दोघे तेथे आले व एका जुन्या भांडणाचे कारण समोर करुन वाद घातला.तसेच या दोघांनी त्यांचे वडील तानाजी रामा चितलवाड यास भांडण करण्यास चितावणी दिली.यामुळे तानाजी चितलवाड हा त्याच्या घरी गेला व घरातील लोखंडी कत्ती घेऊन तेथे आला.तसेच भांडण करत त्या लोखंडी कत्तीने त्याने बालाजी मारोतराव जाधव च्या डोक्यात व पोटात मारुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
सदरील घटनेविषयी जखमी बालाजी जाधव यांच्या पत्नी सौ.लता बालाजी जाधव यांनी हिमायतनगर पोलीसात रितसर फिर्याद दिली.यावरुन गु.र.नं.२०१/ २०२१ कलम ३०७,१०९,३४ भादवि प्रमाणे तानाजी रामा चितलवाड,सुरज तानाजी चितलवाड व रामचंद्र तानाजी चितलवाड,तिघे ही रा.वारंग टाकळी ता. हिमायतनगर यांच्या विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा हिमायतनगर पोलीसात दाखल करण्यात आला.सदरील गुन्ह्याच्या सखोल तपासाअंती पो.नि.भगवान कांबळे यांनी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय भोकर मध्ये दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यानच्या काळात न्यायालयात साक्षीदारांनी मत व्यक्त केले. यावरुन सरकारी वकील सौ.अनुराधा रेड्डी डावकरे व आरोपींचे वकील यांच्यात झालेल्या युक्तीवादाअंती साक्षीदार आणि मांडलेला लेखी युक्तीवाद एका आरोपीच्या विरुद्ध गेला.यात तानाजी रामा चितलवाड हा दोषी ठरला.यावरुन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय भोकर चे जिल्हा न्यायाधीश वाय.एम. एच.खरादी यांनी त्यास जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.तर सबळ पुराव्याअभावी उपरोक्त दोघे दोषी ठरले नसल्याने त्या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.तसेच सदरील खटल्याच्या न्यायालयीन कामकाजा दरम्यान पैरवी अधिकारी जमादार रमेश आडे यांनी कामकाज पाहिले.