‘जीव सये मी ग तुला लावलाय बाई,पापनीत झाली कशी काजळाला घाई’-शंकर वाडेवाले
मसाप शाखा देगलूर व देगलूर महाविद्यालयाने आयोजीत केले कथाकथन व कविसंमेलन
अंबुज प्रहार प्रतिनिधी -देगलूर
जीव सये मी ग तुला लावलाय घाई
पापनीत झाली कशी काजळाला घाई
पापनीची कोर तुझ्या चाललाय मोरे
अंतरीच्या वादळात पावसाला कोर
-सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी शंकर वाडेवाले यांनी मराठवाडा साहित्य परिषद शाखा देगलूरचे अध्यक्ष लक्ष्मण मलगिरवार व देगलूर महाविद्यालय देगलूरने आयोजीत केलेल्या कविसंमेलन आणि कथाकथन कार्यक्रमात कविसंमेलनाचा अध्यक्षीय समारोप करताना ‘सये’ ही कविता सादर करून प्रियेशिच्या भावविश्वाचा गाव रेखाटत अंतर मनातील प्रेमभावनेची गोडी उपस्थितापुढे ठेवली.या कविसंमेलाचे अध्यक्ष नांदेड येथील सुप्रसिद्ध ग्रामीण लोककवी शंकर वाडेवाले हे होते.तर सहभागी कवी म्हणून शं.ल.नाईक,अमृत तेलंग,माधव देशमुख, उत्तम वनंजे,रूचिरा बेटकर,सारीका बकवाड,अशोक कुबडे,डी. एन.मोरे,खैरकेकर,गोविंद कवळे या कविंचा सहभाग होता.
काव्यजागराच्या रंगलेल्या मैफिलिच्या आरंभी…
लेक हाळदिचं खोंब
देह माईचा चंदण
दिला लेकिला मायेन
बाई गाईचं आंदण
अस्सल ग्रामीण बोलीभाषेतील ओल,गाव खेड्यातील रूढिपरंपरेची खुणगाठ मांडणारे ग्रामीण कवि अमृत तेलंग यांनी ‘लेक’ ही कविता सादर करूण बाईच्या माहेराची आठवण जीवंत केली.काव्य मैफिलिच्या उपस्थित तरूणाईच्या हाळव्या मनाला डिवचत…
मिठीत यायचं तर असा ये
की,दुजेपणाचं भान सुटावं
सुप्त मनाच्या वादळातून
फक्त श्वासाचं रान उठावं
-रूचिरा बेटकर यांच्या ‘मिठी’ या शृंगारीक कवितेने जुन्या नव्या प्रेमवीरांच्या आठवणींचा गाव जागा करत उपस्थितांचे मन तरूण केले.प्रेम कवितेचा हळवा नाजूक धागा धरत…
तू हसल्यावर वाराही
बेसावध होतो
तुझ्या वाचुनी हिशोब
सगळा कागद होतो
–सारिका बकवाड या नव्या दमाच्या मराठी गझलकार यांनी प्रियकराच्या आयुष्यातील प्रियेशीच्या गोड स्वप्नांचा हिशोब मांडणारी ‘तू प्रिये’ ही गझल सादर केली.काव्य मैफिलीस उत्तरोंतर रंग चढत होता एकापेक्षा एक सरस अशा कवितेने वातावरण चांगलेच बहरले होते.
मव्हा बाप काळ्यामातीत
तळून मळून सपन पेरला होता
काळ्या मातीस नजर लाऊन बसायचा
सपनरान हिरवंगार दिसायचं…
– शेत शिवारात राबणाऱ्या बापाड्याची सपन सुगी देगलूर येथील कवी माधव देशमुख यांनी ‘बाप’ या कवितेतून कष्टाची ओली चिंबळ रसीकापुढे ठेवली.तर
नारी मुक्तिची,देऊनी ललकारी
चला उठा ग,घेऊया भरारी
-नारी मुक्तीचा अचूक संदेश घेऊन कवी उत्तम वनंजे यांनी आपली रचना सादर करत स्री मनाला जागरूकते विषयी आवाहन केले.गंभीर झालेल्या काव्य मैफिलीला बगल देत…
दिवस उजाडतो सखे
तुझ्याच नावाने
पाखरांची ही किलबिल होते
तुझ्याच नावाने
सखीच्या नावाने होणारी सकाळ सुखी समाधानाची ओळखकरून देणारी असून जीवनाच्या या सारीपाठात सखीचे किती महत्व आहे ही ओळख नायगाव येथील नव्या दमाचे तरूण कवी गोविंद कवळे यांनी काव्य मैफिलीत तलींन झालेल्या जाणकारांना पटवून दिली.
कवितेच्या झाडाखाली
भेटली मज माऊली
कवितेच्या झाडाखाली
भेटली मज सावली
देगलूर येथील ज्येष्ठ बाल साहित्यिक शं.ल.नाईक यांच्याही कवितेने रसिकांच्या टाळ्या घेतल्या.
रामदासा बाळ्या परेशान झाला
शाळांमधी दप्तरात त्याच्या वस्तरा गेला
पोट्टे लई बिलिंदर बोंबाबोंब केली
अन् वस्तऱ्याची बात भाऊ मास्तरला गेली
मास्तर म्हणे जाऊ दे न काळ्या आणलान् खरं
मया दाढीचे चार केसे खरडून दे बरं…
-उपस्थितांना गुदगुल्या करत विनोदाचा बार फोडत कवी अशोक कुबडे यांच्या ‘वस्तारा’ या कवितेने सभागृहाला खळखळून हसवले.एकच हास्साचा कल्लोळ झाला.सहभागी कविंच्या विविध विषयाच्या काव्य सादरीकरणामुळे मैफिलीला रंग चढला.कविसंमेलाचे अध्यक्ष कवी शंकर वाडेवाले यांची गाजलेली कविता ‘सये’ या कवितेने कविसंमेलाची सांगता झाली.रंगतदार होत गेलेल्या काव्या जागराचे बहारदार सुत्रसंचालन अशोक कुबडे यांनी केले.तर आभार राजेश्वर दुडुकनाळे यांनी मानले.या संमेलनासाठी प्राचार्य मोहण खताळ,संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बेकर,शशिकांत चिद्रावार,विलास तोटावार,देवेंद्र मोतेवार,रविंद्र द्याडे,लक्ष्मण मलगिरवार,अनिल चिद्रावार,पुरमवार सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठवाडा साहित्य परिषद शाखा देगलूर चे अध्यक्ष लक्ष्मण मलगिरवार व देगलूर महाविद्यालय देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत कविसंमेलन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मराठी विभाग प्रमुख डॉ.विठ्ठल जंबाले,डॉ. सर्जेराव रणखांब,चंद्रशेखर बाकेवाड,प्रा.गणपत मैलारे,पांडुरंग निवृत्तीराव पुठ्ठेवाड यांनी परिश्रम घेतले.