Mon. Mar 31st, 2025

जमिनीच्या सुपिकतेसाठी प्रकल्पातील काढलेला गाळ लाभदायक -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Spread the love

१०० दिवसांच्या आराखड्यानुसार भोकर येथील उपविभागीय व तहसिल कार्यालयास भेट ; नारवट येथील वनविभागाच्या तळ्यातील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ

अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार योजनेअंतर्गत सुधा प्रकल्पातील गाळ काढण्यात येत आहे.हा गाळ काढल्यामुळे या प्रकल्पातील पाण्याचा साठा वाढून सभोवतलाच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना जमीनीची सुपीकता वाढविण्यासाठी काढण्यात आलेला गाळ विनामुल्य उपलब्ध होणार आहे.तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

‘गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार’ योजनेअंतर्गत भोकर तालुक्यातील सुधा प्रकल्पातील गाळ काढण्याचा मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी भोकरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसिलदार विनोद गुंडमवार,बाभळी पाटबंधारे उपविभाग उमरीचे उपविभागीय अभियंता प्रशांत कदम,तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव,शाखा अभियंता देवकांबळे, अभियंता ऋषिकेश खिंडरे,इतर विभागाचे विभाग प्रमुख यांसह मंडळ अधिकारी एम.ए.खंधारे,ग्राम महसूल अधिकारी अनिल मुनेश्वर व जेसीबी, हायवा मालक जगन बुट्टनवाड,चालक,मालक आणि शेतकरी यांची उपस्थिती होती.
याकामासोबत नारवट येथील वन विभागाच्या तळयातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.हा गाळ वन विभाग,सेवा समर्पण परिवार व नारवट येथील ग्रामस्थ यांच्या श्रमदानातून काढण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे.त्याचे काम आज सुरु करण्यात आले आहे.
या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय भोकर येथे भेट देवून १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमातंर्गत होत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेवून उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

सुधा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे केले यथोचित स्वागत ; तसेच भुसंपादन केलेल्या जमिनीच्या मावेजा विषयी केली चर्चा
सदरील कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे सुधा प्रकल्प येथे आले असता प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली व यथोचित सत्कार केला.यावेळी सर्व शेतकऱ्यांनी या प्रकल्पाची उंची वाढविण्यासाठी ज्या जमिनींचे अधिग्रहण केले आहे,त्याचा मावेजा त्वरित देण्याची विनंती ही केली असता याची पुर्तता आम्ही लवकरच करु असे त्यांनी आश्वासित केले आहे.

सुधा प्रकल्पाची १.१० मिटर ने उंची वाढविण्यात येत आहे.यासाठी ६ गावच्या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांची अतिरिक्त जमीन संपादित करण्यात आली आहे.परंतू सदरील जमिनीचा मावेजा न देताच पाटबंधारे विभाग व कंत्राटदाराने मार्च २०२५ च्या पहिल्या आठवड्यात काम सुरू केले.हे समजताच त्या शेतकऱ्यांनी काम सुरु करण्यात आलेल्या ठिकाणी जाऊन संबंधितास जाब विचारला व जोपर्यंत मावेजा दिला जाणार नाही तोपर्यंत काम करु नये अशी विनंती केली.यावेळी प्रतिसाद मिळाला नसल्याने अखेर ते काम शेतकऱ्यांनी बंद केले.यावेळी उपविभागीय अभियंता ए.के.कलवले यांनी मध्यस्थी केली व उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांची दि.१७ मार्च रोजी भेट करुन दिली. यावेळी त्यांनी १ महिन्याच्या आत मावेजा देऊ असे आश्वासन दिले.ही बाब जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी देखील लवकरात लवकर मावेजा देऊ असे सांगितले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !