डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी जाण्यासाठी खा.अशोक चव्हाण यांना लागले तब्बल १५ वर्ष
भोकर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जागेतील अतिक्रमण काढण्यासाठी अनुयायींनी दिलेल्या ४० वर्षाच्या लढ्यास यश आले असून हे विकासात्मक कामे लवकरात लवकर व्हावे अशी मागणी होत आहे.
उत्तम बाबळे,संपादक
भोकर : भोकर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेतील अतिक्रमण काढण्यासाठी आंबेडकरी जनता व विचार अनुयायींना जवळपास ४० ते ४५ वर्ष लढा द्यावा लागला.अखेर मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाने या लढ्यास यश आले असून या लढ्यास योगदान दिलेल्या सर्वांचे अभिनंदन होत आहे.तर स्व.डॉ.शंकरराव चव्हाण ते खा.अशोक चव्हाण अर्थातच ‘चव्हाण’ परिवाराचे भोकर आणि भोकर विधानसभा मतदारसंघावर प्रदिर्घकाळ लोकप्रतिनिधीत्व राहिलेले असतांनाही त्यांच्या हातून येथे पुतळा उभा होऊ शकला नाही याची खंत मात्र व्यक्त होत आहे.गेल्या १५ वर्षांपूर्वी खा.अशोक चव्हाण यांनी या मतदार संघात आगमन केले.दरम्यानच्या काळात जयंती असो वा महापरिनिर्वाण दिन या औचित्याने त्यांनी कधीच या ठिकाणी भेट दिली नाही.परंतू अतिक्रमण हटविल्यानंतर ‘चव्हाण’ परिवारातील तिसऱ्या पिढीच्या लोकप्रतिनिधित्व हितार्थ दि.२५ सप्टेंबर रोजी त्यांना तेथे भेट द्यावी लागल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी जाण्यासाठी खा.अशोक चव्हाण यांना ‘तब्बल १५ वर्ष’ लागले आहे,असे अनेकांतून बोलल्या जात आहे.
सन १९७० च्या दशकात भोकर येथील जेष्ठ सामाजिक नेते केरबाजी राव उर्फ डिएलबी यांनी काही सहकारी सोबत घेऊन भोकर शहराच्या मुख्य व मध्यस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्यासाठी जागा धरली.तर भोकर ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंचपदी दत्ताअप्पा गंदेवार हे असतांना झालेल्या सदस्य मंडळ बैठकीत दि.१९ एप्रिल १९७२ रोजी तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य जेष्ठ सामाजिक नेते पुंडलिकराव उर्फ पी.जी.क्षिरसागर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेचा ठराव घेतला. या ठरावाचे सुचक पी.जी.क्षिरसागर हे होते.तर यास उपसरपंच महेमुदमिंया सौदागर यांनी अनुमोदन दिले.तसेच तत्कालीन सदस्य रामराव देशमुख,अहेमद पटेल,माधवराव ढोले यांनी हा ठराव बहुमताने संमत केला.भोकर शहराची जसजशी व्याप्ती होत गेली तसतशी अतिक्रमणे वाढत गेली.यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या नियोजित जागेचा ही समावेश आहे.या जागेभोवती झालेले अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार अनुयायींनी व समाज बांधवांनी विविध प्रकारे आंदोलने केली.तेथील अतिक्रमण काढण्यासाठी सन १९७९ मध्ये ‘दलित पॅंथर’ च्या वतीने तत्कालीन तालुकाध्यक्ष सुरेश कावळे व तालुका सचिव भिमराव राव यांच्या नेतृत्वाखाली सर्व संबंधितांना निवेदन देण्यात आले.यावेळी पॅंथर भिमराव राव व पॅंथर शांताबाई वाघमारे आणि अन्य पॅंथरनी अमरण उपोषण केले होते. तेंव्हापासून ते यावर्षापर्यंत अनेक सामाजिक नेते,सामाजिक संघटना,पदाधिकारी,विचार अनुयायी व समाज बांधवांनी लोकशाही मार्गाने विविध आंदोलनातून जवळपास ४० ते ४५ वर्ष सातत्याने लढा दिला आहे. दरम्यानच्या काळात नांदेड येथील एका तथाकथित सामाजिक कार्यकर्त्याने या जागेवर पुतळा उभारण्यास्तव बनावट विश्वस्त संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न ही केला.यास विरोध करणाऱ्या भोकर येथील अनेक महिला व पुरुष सामाजिक कार्यकर्त्यांविरुद्ध त्या व्यक्तीने गंभीर प्रकारचा गुन्हा देखील दाखल कला होता.परंतू तशा प्रकारच्या संकटांना लढवय्या अनुयायींनी भीक घातली नाही. एकूणच सदरील जागेसाठी अनेक प्रकारे आंदोलने झाली.यात अनेकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व मोलाचा आणि खारीचा ही वाटा आहे.प्रामुख्याने जेष्ठ सामाजिक नेते केरबाजी राव उर्फ डीएलबी,भिमराव राव,पी.जी.क्षिरसागर,कॉम्रेड माधव ढोले, भिमराव दुधारे,जेष्ठ पत्रकार एल.ए.हिरे,शिवाजी पाटील किन्हाळकर,नागनाथ घिसेवाड, दिलीप के.राव,सुरेश कावळे, दशरथ भदरगे,नारायण सोनुले,केशव मुद्देवाड,उत्तम बाबळे, सुभाष तेले,मिलींद गायकवाड,बाबूराव सोनकांबळे,आनंद कांबळे,राजेश चंद्रे,राजू मामा सोनकांबळे यांसह भोकर व परिसरातील असंख्य महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांचा समावेश आहे.भोकर तालुका हा २२६-धर्माबाद विधानसभा मतदार संघात असतांना स्व.डॉ.शकरराव चव्हाण यांनी सन १९६२ मध्ये येथून निवडणूक लढविली व ते विजयी झाले.तेंव्हापासून भोकरची नाळ ‘चव्हाण’ परिवाराशी जोडली गेली आहे.मतदार संघाची पुनर्रचना झाली व १६०-भोकर विधानसभा मतदार संघाच्या निर्मितीनंतर सन १९६७ व १९७२ मध्ये शंकरराव चव्हाण या मतदार संघातून निवडून गेले.यानंतर १७२-भोकर विधानसभा मतदार संघातून १९७८ मध्ये निवडून गेले.भोकर विधानसभा मतदार संघातील जनतेच्या पाठबळामुळे शंकरराव चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री झाले.सन १९७२ मध्ये ते भोकर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार होते.त्यामुळे भोकर येथील तत्कालीन सामाजिक नेते केरबाजी राव डीएलबी व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन भोकर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची मागणी केली आणि भोकर ग्रामपंचायतीने घेतलेल्या ठरावाची प्रत त्यांना दिली होती.परंतू शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री झाले व नंतर केंद्रीय मंत्री झाले. यादरम्यानच्या काळात त्यांना सदरील मागणीचा विसर पडला व ते काम होऊ शकले नाही.तद्नंतर या मतदार संघाचे प्रतिनिधित्व बाबासाहेब देशमुख गोरठेकर, डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर व बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी केले.परंतू त्यांच्या कार्यकाळात ही ते अतिक्रमण काढण्यास व पुतळा उभारण्यात यश आले नाही.
सन २००८ मध्ये विधानसभा मतदार संघाची पुनर्रचना झाली व भोकर, मुदखेड आणि अर्धापूर या तीन तालुक्यांचा समावेश असलेल्या ८५- भोकर विधानसभा मतदार संघाची निर्मिती झाली.यामुळे पुर्वीच्या मुदखेड मतदार संघाचे तत्कालीन आमदार अशोक शंकरराव चव्हाण यांचे भोकर विधानसभा मतदार संघात आगमन झाले.सन २००९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते ८५-भोकर विधानसभा मतदार संघातून ऐतिहासिक मताधिक्याने विजयी झाले व राज्याचे मुख्यमंत्री झाले.यामुळे येथील जनतेच्या विकासात्मक अपेक्षा उंचावल्या.तर विकासाच्या अपेक्षेने सन २००८ मध्ये भोकर ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच नारायण बाबागौड पाटील व त्यांच्या सहकारी सदस्यांनी कार्यकाळ शिल्लक असतांनाही भोकर ग्रामपंचायत बरखास्तीचा आणि नगर परिषद निर्मितीचा ठराव घेतला.तसेच भोकर पंचायत समिती गणाचे सदस्य शेख जवाजोद्दीन बरबडेकर यांचा कार्यकाळ ही शिल्लक असतांना त्यांनी देखील पद बरखास्तीचा व नगर परिषद निर्मितीचा ठराव प्रशासनास पाठविला.या ठरावांच्या संमतीमुळे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भोकर नगर परिषद निर्मितीस मंजूरी देता आली.नगर परिषदेची निर्मिती झाल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शहरातील सर्व महापुरुषांचे पुतळे त्यांच्या हातून उभारले जाऊ शकतील असे वाटू लागले.त्यामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची एम.आय.डी.सी.मैदानावर जाहीर सभा झाली असता सामाजिक कार्यकर्ते केशव मुद्देवाड व अखिल भारतीय अण्णा भाऊ साठे संघर्ष समितीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष उत्तम बाबळे यांसह आदींनी भोकर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे,आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे,संत सेवालाल महाराज व सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांच्या जागेचे सुशोभिकरण करण्यात यावे आणि पुतळे उभारुन शहराच्या वैचारिक सौंदर्यात भर टाकावी अशा मागणीचे निवेदन त्यांना दिले होते.त्या अनुषंगाने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सदरील पुतळ्यांच्या जागेचे रितसर अहवाल नगर परिषदेने तयार करावेत त्यानंतर आपण हे काम लवकरच मार्गी लाऊ,असे सभास्थानी बोलतांना आश्वासित केले होते.त्यामुळे येथील पुतळ्यांच्या नियोजित जागेवरील अतिक्रमण हटविण्याचा,शुशोभिकरणाचा व पुतळे उभारणीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला.सन २०१२ मध्ये राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणासाठी मोठा निधी प्राप्त झाला व या मार्गावरील भोकर शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी तत्कालीन उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, उपअभियंता गौरीशंकर स्वामी,मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांच्या पुढाकारातून अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविण्यात आली.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जागेतील पंचशील ध्वज हा त्या रस्त्यात येत असल्याने काढण्यात यावा असे त्यांनी सांगितले.यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार अनुयायी व समाज बांधवांत तीव्र असंतोष पसरला.अगोदर जागेतील अतिक्रमण हटविण्यात यावे,नंतरच आम्ही ठरावा प्रमाणे असलेल्या नियोजित जागेत जाऊ असे सांगून त्या अधिकाऱ्यांना तो ध्वज काढू दिला नाही.यामुळे भोकर नगर परिषदेने पुतळ्याच्या जागा परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठीचा व काही जणांचे कबाले रद्द करण्याचा प्रस्ताव महसूल विभाग भोकरकडे पाठविला.हा प्रस्ताव मंजूर होऊन काही जणांचे कबाले रद्द करण्यात आले.यामुळे भोकर नगर परिषदेचे प्रशासक तथा तहसिलदार राजेश लांडगे,मुख्याधिकारी प्रियंका टोंगे,पो.नि.विकास पाटील यांनी सन २०२१ मध्ये कांही जणांचे अतिक्रमण काढले.परंतू यावेळी ते अतिक्रमण काढण्यात येऊ नये म्हणून व्यापारी प्रदिप उत्तरवार व पांडूरंग इंगळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठात ९१/०४/२०२१ व ९१/०५/२०२१ प्रमाणे याचिका दाखल केली.सदरील याचिकेवर सुनावणी होऊन दि.२४/ ०७/ २०२४ रोजी मा.उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली व भोकर नगर परिषदेच्या बाजूने निर्णय दिला.या निर्णयानुसार ते अतिक्रमण हटविण्याच्या मंजूरीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर यांच्याकडे पाठविण्यात आला.त्यांनी देखील यास न्यायालय निर्णयाप्रमाणेच मंजूरी दिली.यावरुन दि.२१ सप्टेंबर २०२४ रोजी भोकर नगर परिषद,महसूल व पोलीस प्रशासनाने प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी,तहसिलदार सुरेश घोळवे, मुख्याधिकारी ऋषभ पवार,पो.नि.सुभाषचंद्र मारकड,सहा.पो.नि.शैलेंद्र औटे,पो.उप. नि.सुरेश जाधव,न.प.कर्मचारी साहेबराव मोरे,जावेद इनामदार, अशोक डोंगरे,संभाजी वाघमारे,त्रिरत्न कावळे यांसह आदींच्या उपस्थितीत ‘उपरोक्त दोघांच्या’ अतिक्रमणावर बुलडोझर फिरविला.यामुळे आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची ती जागा अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त होऊन मोकळा श्वास घेत आहे.तसेच शुशोभिकरणाचा व पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.तर अतिक्रमण हटविण्याच्या एक दिवस अगोदर सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार एल.ए.हिरे,माजी नगरसेवक मनोज गिमेकर,दत्ता भाऊ डोंगरे,विक्रम क्षिरसागर यांसह आदींनी ते अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा अमरण उपोषण करु,अशा इशाऱ्याचे निवेदन दिले होते.माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदार संघाचे आमदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष व आमदारकीचा राजिनामा दिला आणि भाजपाचे कमळ हाती घेतले.त्याचा मोबदला म्हणून भाजपाने त्यांना राज्यसभेची खासदारकी बहाल केली.आगामी विधानसभा व नांदेड लोकसभा पोटनिवडणूकीचे वारे सद्या येथे वाहत आहे.याच दरम्यान खा. अशोक चव्हाण यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणचे अतिक्रमण हटविल्यानंतर प्रथमच दि.२५ सप्टेंबर २०२४ रोजी भेट देऊन पाहणी केली आहे.तसे पाहता या मतदार संघात येऊन त्यांना जवळपास १५ वर्ष झाली आहेत. परंतू त्यांनी यापूर्वी कधीच त्याठिकाणी जाण्याचे औदार्य दाखविले नाही किंवा जयंती असो वा महापरिनिर्वाण दिन असो ते कधीच अभिवादन करण्यासाठी तेथे गेलेले पहावयास मिळाले नाही.त्यामुळे आंबेडकरी जनता,विचार अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते,समाज बांधव व आदींतून त्यांच्याविषयी समर्थनिय आणि असमर्थनिय प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.एवढेच नाही तर त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर अनेकजण विरोध दर्शवित आहेत व मुदखेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटविण्यात यांचा वाटा आहे असे ही व्यक्त होत आहेत. कारण ‘चव्हाण’ परिवारातील स्व.डॉ.शंकरराव चव्हाण,खा.अशोक चव्हाण,त्यांच्या सुविद्य पत्नी माजी आ.अमिता अशोकराव चव्हाण यांना भोकर व भोकर मतदार संघाने भरभरुन प्रेम दिले आहे.वडिल व पुत्र या दोघांनाही या मतदार संघाने मुख्यमंत्री केले आहे.तर आता त्याची तिसरी पिढी श्रीजया अशोकराव चव्हाण यांची येथून आमदार म्हणून लोकप्रतिनिधित्व करण्याची तयारी सुरु आहे. याच हेतूने व येथील आंबेडकरी जनतेला भावनिक साद घालण्यासाठी खा.अशोक चव्हाण यांनी त्याठिकाणी ही भेट दिली आहे असे बोलल्या जात आहे.तसे नसेल तर त्यांना याठिकाणी येण्यासाठी तब्बल १५ वर्ष का लागली ? असा प्रश्न ही उपस्थित केल्या जात आहे.ज्या प्रमाणे ही जागा धरण्यासाठी,अतिक्रमण काढण्यासाठी अनेकांचे अमुल्य योगदान आहे.त्याच प्रमाणे खा.अशोक चव्हाण यांचा प्रशासन स्तरावर खारीचा वाटा आहे हे देखील नाकारता येत नाही.तसेच राजकीय लाभाचा भाग बाजुला ठेऊन खा.अशोक चव्हाण यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांसह शहरातील अन्य सर्वच महापुरुषांचे पुतळे उभारुन सुशोभिकरण करावे अशी अपेक्षा अनेकांतून व्यक्त होत आहे.याचबरोबर कोणीही यासाठी ‘श्रेयवाद’ घालण्याचा प्रयत्न करु नये असे ही काही सुज्ञ आंबेडकरी जनता व विचार अनुयायींतून बोलल्या जात आहे. तसेच जागेवरील अतिक्रमण हटल्याने शुशोभिकरणाचा व पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला असल्याने लोकप्रतिनिधी,भोकर नगर परिषद,समाज बांधव,विचार अनुयायी,सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी श्रेयवाद बाजूला सारुन एकत्र यावे आणि लवकरात लवकर महामानव वंदनिय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळा उभारुन सुशोभिकरण करावे आणि भोकर शहराच्या वैचारिक विकासात भर टाकावी,असे आवाहन ही करण्यात येत आहे.