Fri. Apr 11th, 2025
Spread the love

भोकर च्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस दिले स्वातंत्र्य सेनानी डॉ.दासराव साकळकर यांचे नाव…

महाराष्ट्र शासन कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाने भोकर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक,ज्येष्ठ समाजसेवक,गरिबांचा डॉक्टररुपी देव म्हणून परिचित असलेल्या डॉ.दासराव साकळकर यांचे नाव दिले असल्याच्या अनुषंगाने त्यांच्या कर्तुत्वाच्या अल्प परिचयाचा माझा विशेष लेख वाचकांसाठी देत आहोत-उत्तम बाबळे,संपादक 

                       देश स्वातंत्र्य,मराठवाडा मुक्तीसंग्रामात ज्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे असे राष्ट्रभक्त सेवाभावी व्यक्तीमत्व डॉ.दासराव देविदासराव साकळकर यांचे नाव भोकर च्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राज्य शासनाने दिले आहे,ही बाब भोकर शहर व तालुक्यातील तमाम नागरीकांसाठी अभिमानाची आहे.
कासार पेठ भोकर जि.नांदेड येथील सौ.राजाबाई व देविदासराव साकळकर यांच्या पोटी डॉ.दासराव साकळकर यांचा जन्म सन १९१४ मध्ये झाला.निजाम राजवटीत मराठी माध्यम शाळेत शिक्षण घेतलेल्या दासराव साकळकर यांनी वैद्यकीय क्षेत्रातील आर.एम.पी.ही पदवी प्राप्त केली व आरोग्य सेवेतून जनसेवेचे व्रत्त हाती घेतले.याच दरम्यान देश स्वातंत्र्य लढ्याने जोर धरला असता डॉ.दासराव साकळकर यांनी ऐन तारुण्यात भोकरे,उमरी व धर्माबाद येथील तत्कालीन प्रत्यक्ष लढ्यातील व भूमिगत स्वातंत्र्य सेनानीना साधन सामग्री पुरविण्याचे कार्य केले.त्यांनी आपल्या घर संसाराचा कसलाही विचार न करता केवळ देश आणि देशमुक्तीच्या लढ्यात स्वतः ला झोकून दिले.तसेच जुलमी निजामशाही विरोधात बंड पुकारलेल्या राष्ट्रभक्त स्वातंत्र्य सेनानींच्या लढ्यात ही सहभाग घेतला.

निजामशाहीत निजामाचे महसूलकर वसूली केंद्र भोकर येथील ऐतिहासिक कैलास गडावर होते व या केंद्राची जबाबदारी अबू बकर नावाच्या सरदाराकडे होती.त्याचा मृत्यू झाल्याने निजामाच्या सैन्यांनी ऐतिहासिक कैलास गडावरील यादव कालीन श्री महादेव मंदीर नष्ट केले व त्याठिकाणी अबू बकरचे थडगे उभारले होते.ही गंभीर बाब तत्कालीन स्वातंत्र्य सेनानी व नागरिकांच्या समोर आली असता सन १९४५ ते ४६ च्या दरम्यान ते थडगे पाडून उत्खनन करुन श्री महादेव मंदीर पुनरस्थापनेचा निर्णय घेण्यात आला.यासाठी निजाम पोलीसांविरुद्ध भोकर येथील जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी भुजंगराव पाटील किन्हाळकर,जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉ.दासराव साकळकर,स्वातंत्र्य सेनानी ह.वि.देशपांडे यांसह अन्य काही स्वातंत्र्य सेनानी व स्थानिक कोळी समाजातील तरुणांनी मोठे बंड पुकारले आणि ऐके दिवशी ‘ते’ थडगे नष्ट करुन थडग्याखालील श्री महादेवाची पिंड बाहेर काढली.त्याच पिंडीचे भव्य श्री महादेव मंदिर आज कैलास गडावर उभे आहे.उपरोक्त त्यागी व्यक्तीमत्वांनी निजामाच्या पोलीस सैन्याशी लढा दिला व अनन्य छळ सहन केला यामुळेच श्री महादेव मंदिराची पुनरस्थापना होऊ शकली आणि कैलास गडावरील वैभव आज पाहता येत आहे.देश स्वातंत्र्य व निजामशाही विरुद्धचा लढ्यात सक्रीय सहभाग असल्यामुळे निजाम सरकार पोलीसांनी डॉ. दासराव साकळकर यांना दोन वेळा अटक करुन निजामाबाद येथील कारागृहात बंदिस्त केले होते.तसेच भोकर येथे सन १९३० मध्ये बांधण्यात आलेल्या पोलीस ठाण्याच्या प्रांगणात त्यांना आणण्यात आले व नागरिकांसमक्ष निजाम सरकार पोलीसांनी त्यांच्यावर चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा दिली. यावेळी त्यांनी निजाम पोलीसांचा अनन्य छळ सहन केला.
दि.१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले,परंतू स्वातंत्र्याची परिपूर्ती झाली नव्हती.भारतातील काही संस्थानांचा भारतात विलिनीकरणास विरोध होता. निजामाचे हैदराबाद संस्थान ही विलीन होत नव्हते.महाराष्ट्रातील मराठवाड्यावर तेव्हा निजामाची जुलमी राजवट होती. मराठवाडा हैदराबाद संस्थानाच्या अधिपत्याखाली होता. संस्थानावर सातवा निजाम मीर उस्मान अलीखान याची राजवट होती व कासिम रिझवी हा निजामाचा सेना प्रमुख होता.त्या काळातील रझाकाराच्या जुलमी राजवटीच्या आठवणीने आजही अनेकांच्या अंगावर शहारे येतात.निजाम व कासिम रिझवी हा जनतेवर अनन्य अत्याचार करत होता.हा अन्याय असह्य होत होता.त्यामुळेच नांदेड जिल्ह्यातील युवकांनी पुढाकार घेत हैदराबाद मुक्ती तथा मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी होऊन निजामाची सत्ता उलथवण्याची शपथ घेतली होती.त्यासाठी स्वातंत्र्य सेनानींनी मराठवाड्यात अनेक सैनिक कॅम्प उभारले होते.त्यापैकीच एक सैनिक कॅम्प उमरखेड येथे होता.मराठवाडा मुक्तीसाठी कासिम रिझवी (रझाकार) च्या सैन्याविरुद्ध लढणाऱ्या या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना हत्यारांची व पैशांची अत्यंत आवश्यकता होती. यासाठी जनजागृती करणे,हत्यारे गोळा करणे,मराठवाडा मुक्ती स्वातंत्र्य चळवळीत संघटित काम करणाऱ्या तरुणांची फळी तयार करणे,हिमतीचे व शौर्याचे कर्तव्य बजावण्यासाठीचे महत्त्वपुर्ण कार्य सुरु झाले असता डॉ.दासराव साकळकर यांनी या कार्यात परिश्रमपूर्वक सक्रिय सहभाग घेतला.याच दरम्यान उमरी येथील स्वातंत्र्य सैनिक दत्ताजी उत्तरवार व त्यापाठोपाठ धर्माबाद येथील स्वातंत्र्य सेनानी गोविंदराव पानसरे यांची रझाकारांनी हत्या केली.यामुळे स्वातंत्र्य सैनिकांचे पित्त खवळले होते.त्यांनी या घटनेचा प्रतिशोध घेण्याचे ठरवले. यासाठीच ‘ऑपरेशन उमरी बँक’ निश्चित करण्यात आले होते. ‘ऑपरेशन उमरी बँक’ लुटीच्या लढ्यासाठी स्वातंत्र्य सेनानींनी चार तुकड्या स्थापन केल्या होत्या.यापैकी एका तुकडीत डॉ. दासराव साकळकर हे सहभागी झाले होते व त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. ‘ऑपरेशन उमरी बँकेचा’ लढा दि.३० जानेवारी १९४८ रोजी यशस्वीपणे पार पडल्याने उमरी व भोकरमध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला असता या विजयोत्सवात डॉ.दासराव साकळकर सहभागी झाले होते.दि.१७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त झाला.त्यावेळी राष्ट्रप्रेमाचे स्फुलिंग चेतवण्याचे काम करीत अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्याची बीजे पेरली होती.त्यापैकीच एक स्वातंत्र्य सेनानी आहेत डॉ.दासराव देविदासराव साकळकर.
संयुक्त महाराष्ट्रात मराठवाडा विलीन झाला व डॉ.दासराव साकळकर यांनी आरोग्य सेवेतून जनसेवेचे कर्तव्य सुरु केले. डॉ.दासराव साकळकर हे गरिबांचे डॉक्टर म्हणून भोकर व आजूबाजूच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होते.कित्येक रुग्णांसाठी तर ते माणसातला ‘देव’ होते.त्यांनी आरोग्य सेवेला ईश्वर सेवाच माणले व पैसे कमविण्याचे साधन समजले नाही.गरीब,गरजवंत रुग्णाना त्यांनी पैशासाठी कधीच अडवले नाही,तर या उलट वेळप्रसंगी स्वतः चे पैसे आणि औषधी देवून सेवा केली. पंक्रोशितील रुग्ण व भोकर येथे येणारे प्रत्येक संत-महात्मे, प्रवचनकार,किर्तनकार,सामाजिक कार्यकर्ते आणि हो अज्ञात वाटसरु यांच्यासाठी सुद्धा डॉ.दासराव साकळकर व साकळकर यांचा वाडा कायमस्वरूपी आश्रयस्थान झाले होते.महाराष्ट्र राज्य सरकारने भोकर ग्रामपंचायत निर्मितीस मान्यता दिली असता सन १९६३ मध्ये डॉ.दासराव साकळकर यांना भोकर ग्रामपंचायतीचे प्रशासकीय सरपंच म्हणून नियुक्ती दिली होती. या पदावरुन त्यांनी जवळपास ६ महिने सरपंच पदाचा कार्यभार सांभाळला.तद्नंतर सन १९६४ मध्ये भोकर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली.यावेळी त्यांनी निवडणूकीत सहभाग घेतला नाही,परंतू भोकरचे पहिले प्रशासकीय सरपंच म्हणून त्यांचे नाव स्मरणात राहणार आहे.

सामाजिक,शैक्षणिक,राजकीय व आदी सेवाभावी चळवळीत डॉ.दासराव साकळकर यांचा सिंहाचा वाट होता.नांदेड जिल्हा व भोकर तालुक्यात शैक्षणिक चळवळ उभी राहिली असता वंचित,पिडीत,शोषित,गरीब व होतकरु विद्यार्थांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आत्म्येय प्रयत्न केले.नांदेड येथील अभिनव भारत शिक्षण संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते.तर भोकर येथील कै.दिगंबरराव बिंदू स्मारक समिती चे संस्थापक सदस्य व कोषाध्यक्ष राहिले आहेत. माझ्या गावचे जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी भुजंगराव पाटील किन्हाळकर यांच्या पुढाकारातून डॉ.दासराव साकळकर यांनी उपरोक्त समितीमार्फत दिगंबराव बिंदू महाविद्यालयाची मुहूर्तमेढ भोकर येथे रोवली.आज या महाविद्यालयाचा वटवृक्ष झाला आहे. स्वातंत्र्य सेनानी डॉ.दासराव साकळकर यांचे कनिष्ठ चिरंजीव रामकृष्ण ऊर्फ बाळा साकळकर व पुतणे अनंता साकळकर हे माझे मित्र.यामुळे साकळकर वाड्यात माझी ये जा असायची. जात-पात,स्पर्श-अस्पृश्य अशा भेदभावाचा कसलाही गंध नसलेल्या सुसंस्कृत साकळकर परिवारात व वाड्यातील बैठकीपासून देव्हाऱ्यापर्यंत कोणासही मुक्त संचार असल्याचे माझ्या सारख्याने प्रत्यक्ष अनुभवले आहे.नव्हे तर डॉ.दासराव साकळकर काकांनी दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या प्रारंभी पहिला विद्यार्थी म्हणून शुभारंभीचा प्रवेश माझा करुन घेतला. यामुळे त्यांचा सहवास व आशिर्वाद मला लाभला आहे.भारत सरकारने डॉ.दासराव देविदासराव साकळकर यांना स्वातंत्र्य सैनिकांचे मानपत्र व ताम्रपत्र देवून गौरव केला आहे.परंतू देश स्वातंत्र्य व मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात त्यांच्या सोबत सहभागी झालेले काही सहकारी या बहुमानापासून वंचित राहिले होते.त्या देशभक्त बांधवाना स्वातंत्र्य सैनिक म्हणून बहुमानाचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी त्यांनी भारत सरकारकडे आग्रही प्रयत्न केला होता व यात त्यांना काही अंशी यश ही आले.भारत मातेच्या अशा त्यागी सुपूत्रावर काळाने झडप घातली व दि.१५ मार्च १९९७ रोजी त्यांना देवाज्ञा झाली.ते जरी आज आपल्यात नसले तरी एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक,ज्येष्ठ समाजसेवक,गरिबांचा डॉक्टररुपी देव म्हणून डॉ.दासराव साकळकर यांचे नाव व कर्तुत्व सदैव प्रेरणादायीच असणार आहे.अशा या शिक्षण प्रेमी प्रेरणादायी व्यक्तीमत्वाचे नाव भोकर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस राज्य शासनाने नुकतेच दिले आहे.ही बाब माझ्यासह तालुक्यातील तमाम नागरिकांसाठी अभिमानाची आहे.त्यामुळे जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉ.दासराव साकळकर काका यांच्या प्रेरणादायी तथा पावन स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो आणि राज्य शासनाचे ऋण ही व्यक्त करतो.

उत्तम बाबळे,संपादक-अंबुज प्रहार न्युज लाईव्ह 


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !