प्रा.लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ भोकर येथील उपोषणार्थीचे चितेवरील उपोषण सुरुच
प्रा.लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाची दखल घेत आज सरकारचे शिष्टमंडळ पोहचले वडीगोद्रीत ; संध्याकाळी ५:०० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत होणार आहे शिष्टमंडळाची चर्चा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : ओबीसी आरक्षण संरक्षणार्थ जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी बेमुद्दत अमरण सुरु केले असून त्यांच्या उपोषणाचा आज ९ वा दिवस आहे.या आंदोलनास नांदेड जिल्ह्यातून ओबीसी बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांच्या समर्थनार्थ भोकर उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालयासमोर संजय दिगंबर गौड आलेवार यांनी चितेवर झोपून अमरण उपोषण सुरु केले आहे.तर याच ठिकाणी नागोराव सुभाषराव बिरगाळे यांनी ही अमरण उपोषण सुरु केले असून या दोन्ही उपोषणार्थींच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वडीगोद्रीमध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीससह ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी ओबीसी नेते तथा आंदोलक प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी बेमुद्दत अमरण उपोषण सुरु केले आहे.त्यांच्या या आंदोलनाचा आज नववा दिवस असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सदरील आंदोलनास वाढता पाठिंबा मिळत आहे.सदरील आंदोलनाच्या समर्थनार्थ नांदेड जिल्ह्यातील भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयासमोर दि.२० जून २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने संजय दिगंबर गौड आलेवार यांनी चितेवर झोपून अनोखे अमरण उपोषणाचे आंदोलन सुरु केले आहे.तर याच ठिकाणी नागोराव सुभाषराव बिरगाळे यांनी ही अमरण उपोषण सुरु केले असून दोन्ही उपोषणार्थींच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे.संजय गौड आलेवार यांनी सदरील आंदोलनाच्या परवानगीसाठी रितसर अर्ज केला होता.परंतू चितेवरील उपोषणातून काही अघटीत घडू नये म्हणून पोलीस व प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून तहसिलदार सुरेश घोळवे आणि पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांनी होऊ घातलेल्या त्या प्रकारच्या आंदोलनास हरकत घेतल्याने काही वेळ आंदोलकांत असंतोष पसरला होता.यावेळी ओबीसी नेते रामेश्वर गौड महाराज,नागनाथ घिसेवाड,नागोराव शेंडगे, बी.आर.पांचाळ,एल.ए.हिरे,उत्तम बाबळे,सुभाष नाईक,माधव अमृतवाड,अनंतवार मोघाळीकर,निळकंठ वर्षेवार,पांडूरंग वर्षेवार,आनंद डांगे,रवि गेंटेवार,मिलींद गायकवाड,निखील हंकारे,अंगरवार यांसह आदींनी पोलीस प्रशासन व आंदोलकांत समन्वय घडवून आणला.यानंतर उपस्थितांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात येऊन चितेवरील उमरण उपोषण सुरू करण्यात आले.याच अनुषंगाने उपोषण स्थळा शेजारीच नागोराव सुभाषराव बिरगाळे यांनी देखील अमरण उपोषण सुरू केले असून दोन्ही आंदोलनांचा आज दुसरा दिवस आहे.तर सदरील उपोषणार्थींनी प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या मागण्या सरकारने पुर्ण कराव्यात आणि त्यांच्या उपोषणाच्या सांगते नंतरच आम्ही देखील सांगता करु,असा पावित्रा घेतला आहे.प्रा.लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाची दखल घेत आज सरकारचे शिष्टमंडळ पोहचले वडीगोद्रीत ; संध्याकाळी ५:०० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत होणार आहे शिष्टमंडळाची चर्चा
प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या आंदोलनाची दखल घेत त्यांच्या भेटीसाठी ना.गिरीश महाजन,ना.उदय सामंत, गोपीचंद पडळकर व अतुल सावे यांचा समावेश असलेले राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज सकाळी वडीगोद्रीतील आंदोलन स्थळी पोहचले.आंदोलक प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या सोबत सदरील शिष्टमंडळाने चर्चा केली व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद घडवून आणला.परंतू झालेल्या चर्चेतून काहीही फलीत निघाले नसून ओबीसींचं २९ टक्के आरक्षण आहे कायम ठेवावे.ओबीसी आरक्षणाला हात लागणार नाही,ते लेखी द्यावे.ज्या ५४ लाख बोगस कुणबी नोंदी हाताने खाडाखोड करून तयार करणाण्यात आल्यात,ते तात्काळ थांबविण्यात यावे,सगे सोयरे बाबतीतल्या जी.आर.ची पारदर्शकता स्पष्ट करुन तो जी.आर.रद्द करण्यात यावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी येऊन उपरोक्त मागण्यांविषयी लेखी आश्वासन द्यावे.असे म्हटले असून प्रा. लक्ष्मण हाके हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
याच बरोबर प्रा.लक्ष्मण हाके यांनी सरकारचे शिष्टमंडळ भेटीला आल्याच्या पार्श्वभूमीवर पुढे म्हटले आहे की,’आम्ही गेल्या ८ ते ९ दिवसांपासून महाराष्ट्र सरकारकडे आमची भूमिका मांडत आलोय.शासन म्हणतेय की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही.तर मराठा आंदोलनकर्ते म्हणताहेत की आम्ही आधीच ओबीसी आरक्षणात आहोत.’ तर मग सरकार व मराठा आंदोलक या दोघांपैकी खरं कोण बोलतोय ? कारण एकाच वेळी दोघेही खोटं बोलू शकत नाहीत.त्यामुळे आम्हा खऱ्या ओबीसींमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून ग्रामीण भागातील ओबीसी समाज नाराज आहे.या माध्यमातून दोघांत दरी निर्माण केली जातेय.तसेच काही ठराविक लोकांच्या आंदोलनाला सरकारने रेड कार्पेट घालू नये,असा आमचा आरोप आहे,असे ही त्यांनी म्हटले आहे.
यावेळी सरकारने पाठविलेल्या शिष्टमंडळातील मंत्री गिरीश महाजन म्हणाले की,”प्रा.लक्ष्मण हाके यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून झालेल्या व होणाऱ्या चर्चेतून योग्य मार्ग निघणार आहे.आम्हाला हाके यांच्या तब्येतीची काळजी आहे.आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याच्या सोबत चर्चा केली असून सरकार तुमच्या पाठीशी आहे.” तसेच ते पुढे म्हणाले की,”ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. कोणावरही अन्याय होणार नाही.आपण मुंबईला जाऊ,तिथे आपण चर्चा करु.आपल्याला अपेक्षित असलेले उत्तर तेथे मिळेल.आपण आपले ५ ते ७ लोक मुंबईला चर्चेला पाठवावेत. ” या भेटीनंतर आज संध्याकाळी ५:०० वाजता ओबीसींचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मंत्र्यांशी भेट घेणार असून ओबीसींच्या त्या शिष्टमंडळात ना.छगन भुजबळ,पंकजा मुंडे,ना.धनंजय मुंडे,गोपीचंद पडळकर,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,प्रकाश शेंडगे आणि महादेव जानकर यांचा समावेश असणार आहे.तसेच प्रा.लक्ष्मण हाके यांच्या ४ समर्थकांचा ही या शिष्टमंडळात समावेश असणार आहे.तर मग पाहुयात की त्या बैठकीतून ओबीसींच्या संरक्षणार्थचा काय निर्णय सरकार घेणार आहे ते ?