भोकर येथे हायवा ट्रक व दुचाकीच्या भिषण अपघातात दोन तरुण ठार
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : दगडाची चुरी(डस्ट)घेऊन भरधाव वेगात येणाऱ्या हायवा ट्रकने भोकर शहरालगतच्या उमरी-म्हैसा- नांदेड वळण रस्त्यावरील सुभेदार रामजी चौक येथे दि.३१ मे रोजी सायंकाळी ५:५५ वाजताच्या दरम्यान स्प्लेंडर दुचाकी वरील दोन स्वारांना उडविले.या भिषण अपघातात हे दोन्ही तरुण स्वार ठार झाले असून गुन्हा नोंदविण्याची पुढील प्रक्रिया भोकर पोलीस करत आहेत.
भोकर शहरालगत असलेल्या व आजपर्यंत अनेकांचे बळी घेणाऱ्या ‘अपघात चौक’ म्हणून सर्व परिचित असलेल्या उमरी-म्हैसा-नांदेड वळण रस्त्यावरील सुभेदार रामजी चौक येथे दि. ३१ मे २०२४ रोजी सायंकाळी ५:५५ वाजताच्या दरम्यान मे. अजय कन्स्ट्रक्शन नांदेड,कंपनीचा माल वाहू हायवा ट्रक क्र. एम.एच.२६ बी.ई. ९९०७ हा बांधकामासाठी वापरण्यात येणारी दगडाची चुरी(डस्ट)घेऊन भरधाव वेगात भोकर शहराकडे येत होता.तर प्लंबर चे काम करणारा हरिदास बालाजी साडेवार (२९)रा.लाल बहाद्दूर शास्त्री नगर भोकर आणि इलेक्ट्रीशन चे काम करणारा राहुल दत्ता वाघमारे (३०) रा.बस स्थानका समोर भोकर हे दोघे तरुण कामानिमित्त आपल्या स्प्लेंडर दुचाकी क्र.एम.एच.२६ जे.५४९३ वरुन उमरीकडे जात होते.यावेळी हायवा ट्रकच्या चालकाचा गतीवरील ताबा निसटला व त्या ट्रकने उपरोक्त दोन तरुणांना उडविले.या भिषण अपघातात राहुल दत्ता वाघमारे हा ट्रकच्या मागील चाकाखाली गेला व त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर हरिदास बालाजी साडेवार हा दुचाकी सोबत ट्रक पासून काही अंतरावर फेकला गेला.यात तो गंभीररित्या जखमी झाला.यावेळी काही नागरिकांनी त्यास उपचारार्थ तात्काळ शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे नेले.परंतू रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली व तो मृत झाल्याचे उपस्थित वैद्यकिय अधिकाऱ्यांनी घोषित केले.हायवा ट्रकचा चालक हा घटनास्थळावरून पसार झाला असून घटनास्थळी पोलीस पोहचले व त्यांनी तो ट्रक ताब्यात घेऊन आणि मयताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे पाठवून वाहतूक सुरळीत केली. दोन्ही दुर्दैवी मयत हे भोकर शहरातीलच असल्याने त्यांचे नातेवाईक घटनास्थळी व रुग्णालयात तात्काळ पोहचल्याने त्या मयतांची ओळख पटली.तसेच पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सोनाजी कानगुले व प्रमोद जोंधळे हे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया करत आहेत.