नवीन कायद्याची अंमलबजावणी आपण करुयात-पो.नि.सुभाषचंद्र मारकड
भोकर पोलीस ठाण्यात संपन्न झाली पोलीस पाटलांची कार्यशाळा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : ब्रिटिशकालीन कायद्यांमध्ये काळानुरूप बदल करणे गरजेचे होते.त्यानुसार आता भारतीय दंड संहिता (आयपीसी) ऐवजी भारतीय न्याय संहिता २०२३, ‘सीआरपीसी’च्या जागी भारतीय नागरिक सुविधा संहिता २०२३ आणि भारतीय पुरावा कायद्याच्या जागी भारतीय साक्ष अधिनियम २०२३ हे नवीन कायदे लागू करण्यात आले आहेत.याची जनजागृती व अंमलबजावणी आपण सर्वजण मिळून करुयात,असे आवाहन भोकर पोलीस ठाण्याचे पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांनी दि.१ जुलै रोजी भोकर पोलीस ठाण्यात संपन्न झालेल्या पोलीस पाटलांच्या कार्यशाळेत केले आहे.
भारतीय दंड संहिता (आयपीसी) ऐवजी भारतीय न्याय संहिता २०२३,‘सीआरपीसी’च्या जागी भारतीय नागरिक सुविधा संहिता २०२३ आणि भारतीय पुरावा कायद्याच्या जागी भारतीय साक्ष अधिनियम २०२३ हे नवीन कायदे दि.१ जुलै २०२४ पासून लागू झाले आहेत.या नव्या फौजदारी कायद्यामधील महत्त्वाच्या बदलांची माहिती जनतेस व्हावी यासाठी भोकर पोलीस ठाणे कार्यक्षेत्र तालुक्यातील पोलीस पाटील यांच्या मार्फत जनजागृती करण्याच्या हेतूने पोलीस ठाण्याच्या वतीने दि.१ जुलै २०२४ रोजी भोकर पोलीस ठाण्याच्या इमारत प्रांगणात “नवीन कायदे अंमलबजावणी” याविषयावर पोलीस पाटलांची कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून पो.नि. सुभाषचंद्र मारकड व महिला सहाय्यक पो.नि.कल्पना राठोड यांची उपस्थिती होती.
सदरील कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना पो.नि. सुभाषचंद्र मारकड म्हणाले की,नवीन कायदे आजपासून लागू झाले आहेत.त्याबद्दल कोणताही चुकीचा समज न बाळगता हे बदल सकारात्मकतेने स्वीकारवेत.नवीन कायदा लागू झाला म्हणजे आता जुना कायदा अस्तित्त्वात नाही हे मानणे चुकीचे आहे.त्यांचा अंमल अजूनही सुरूच राहणार आहे.या आधी ज्या कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत त्याची कार्यवाही त्याचप्रमाणे सुरू राहणार आहे. आजपासून जे गुन्हे दाखल होतील त्यांची कार्यवाही मात्र या नवीन कायद्यानुसार होणार. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचा बदल झाला असून,आता ऑडियो-व्हिडिओ म्हणजे इलेक्ट्रॉनिक पुराव्यांना (डिजिटल एविडन्स) प्राधान्य देण्यात आले आहे.नव्या कायद्यांमुळे नागरिक आता कुठेही एफआयआर दाखल करू शकतो.एफआयआर दाखल झाल्यानंतर ज्या ठिकाणचे हे प्रकरण आहे त्याठिकाणी हा पाठवावा लागणार आहे.पोलीस किंवा सरकारी अधिकारी यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी १२० दिवसात संबंधित यंत्रणेला परवानगी द्यावी लागेल.परवानगी दिली नाही तर यालाच मंजुरी मानली जाईल.एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलीसांना ९० दिवसात दोषारोप पत्र दाखल करावे लागणार आहे.दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर मा.न्यायालयास ६० दिवसात आरोप निश्चित करावे लागतील.तर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर ३० दिवसात निर्णय द्याला लागणार आहे. पोलीसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या कुटुंबीला याबाबत लिखित माहिती द्यावी लागणार आहे.तुरुंगात कैद्यांची वाढत असलेली संख्या याबाबत नव्या कायद्यात तोडगा काढण्याचा प्रयत्न ही झाला आहे.कलम ४७९ मध्ये तरतूद करण्यात आलीये की,जर एखाद्यावर खटला सुरू असेल आणि यादरम्यान त्याने एक तृतीयांश शिक्षा भोगली असेल तर त्याला जामीनावर मुक्त केले जाऊ शकते; पण ही तरतूद फक्त पहिल्यांदा गुन्हा करणाऱ्या कैद्यांसाठी असेल.तसेच जन्मठेपेची शिक्षा झालेल्यांना यातून सवलत मिळणार नाही.अपराधाचे स्वरूप किरकोळ असेल तर अपराध्याला शिक्षा करण्यापेक्षा त्याच्यात सुधारणा करून त्याला समाजात सामावून घेता येईल,याचा प्रयत्न यात केला आहे.तसेच शिक्षेचे स्वरूपही सामाजिक सेवा अशा पद्धतीचे असेल.तसेच भारतीय साक्ष अधिनियममध्ये डिजिटल एविडन्सबरोबरच फॉरेन्सिक एविडन्स हाही महत्त्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार असून कुठलाही गुन्हेगार मोकळा सुटू नये याचीही काळजी घेण्यात आली आहे.पोलीस पाटील हा महत्त्वाचा घटक असून, तेच यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.म्हणून तुम्ही व आम्ही सर्वजण मिळून यांची अंमलबजावणी करुयात.कायद्यात बदल करणे ही काळाची गरज होती.या बदलांसाठी आपण गावपातळीवर तयार असले पाहिजे या हेतूने ही कार्यशाळा आयोजित केली आहे,असे ही ते म्हणाले.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व भोकर अपर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराव धरणे यांच्या आदेशानुसार घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत भारतीय नविन तीन कायद्यातील महिला व बालकां विरोधी अपराध,लैंगिक छळ, सामाजिक सेवा,दहशतवादी कृत्य,देशद्रोह,मॉब लिंकिंग, संघटीत गुन्हेगारी,किरकोळ संघटीत अपराध,हिसकावून घेणे (स्नॅचिंग),तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी),उदघोषित अपराध,साक्षीदार संरक्षण योजना यांसह आदी नुतन कायदा विषयी मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यशाळेला पोलीस अधिकारी,कर्मचारी, तालुक्यातील बहुसंख्य पुरुष व महिला पोलीस पाटील,पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.यावेळी उपस्थितांचे आभार सहा.पो. नि.कल्पना राठोड यांनी मानले.तर ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी गोपनीय शाखेचे पो.कॉ.परमेश्वर गाडेकर,पो.कॉ. जी.एन.आरेवार यांसह आदींनी परिश्रम घेतले.