रसायन मिश्रीत अवैध सिंधी विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यात भोकर पोलीसांना यश
तीन कारवाईत रसायन मिश्रीत अवैध सिंधीसह एक चारचाकी असा एकूण ३ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर पोलीसांनी रात्रीची गस्त व गोपनीय माहितीच्या आधारे दि.२९ जून ते १७ जुलै दरम्यान सलग तीन छापे टाकले.यादरम्यान अवैध विक्रीसाठी आणल्या जात असलेली रसायन मिश्रीत अवैध सिंधी पकडली व अवैध सिंधी विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्याची कारवाई केली असून यात रसायन मिश्रीत अवैध सिंधीसह एक चारचाकी असा ३ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भोकर शहर व तालुक्यात जीवघेणी रसायन मिश्रीत सिंधी अवैधरित्या विक्री होत असून शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे चर्चील्या जात असल्याने भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांनी रसायन मिश्रीत अवैध सिंधी विक्री व अवैध धंद्यांवर आळा घालण्याची मोहीम हाती घेतली आहे.याच अनुषंगाने दि.२९ जून २०२४ रोजी पहाटे २:५१ वाजताच्या दरम्यान किनवट-बटाळा रस्ता टी पॉईंट येथे रात्रीच्या गस्तीवर असलेले जमादार नामदेव जाधव,जीप चालक पो.कॉ.मंगेश क्षीरसागर, पो.कॉ.चंद्रकांत आरकिलवार यांनी भुमेश खंडूराव जिंकलवाड, रा.नंदीनगर भोकर,अक्षय तुकाराम मेटकर रा.हनुमान नगर भोकर यांना प्रति एक लिटरचे पॉकिट असे जवळपास २२ हजार रुपये किंमतीचे रसायन मिश्रीत सिंधीचे ५५० पॉकीटे घेऊन येणाऱ्या ३ लाख रुपये किमंतीच्या मॅक्झिमो कंपनीच्या चारचाकी वाहनासह पकडले.तसेच त्यांच्या कडून ३ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त करुन उपरोक्त दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तर दि.११ जुलै २०२४ रोजी पहाटे १:५५ वाजताच्या दरम्यान जमादार नामदेव जाधव, जमादार बालाजी लक्षटवार,पो.कॉ.चंद्रकांत अरकिलवार यांनी बटाळा रोडवरील बंडू -यापनवाड यांच्या पत्र्याच्या शेड समोर अवैध सिंधी विक्रेता अविनाश तुकाराम मेटकर यास पकडले व त्याच्या कडून १२ नायलॉनच्या पोत्याातील प्रति एक लिटरचे पॉकीट असे एकूण ६०० लिटर रसायन मिश्रीत अवैध सिंधी असा एकूण ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.तसेच दोन्ही छाप्यांतील कारवाईत अनुक्रमे पो.कॉ.चंद्रकांत आरकिलवार व जमादार बालाजी लक्षटवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम ६५ ई दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपरोक्त दोन छापे यशस्वी झालेले असतांनाच पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांना गोपनीय माहिती मिळाली की,रसायन मिश्रीत सिंधी अवैध विक्रीसाठी रात्री येत आहे.या माहितीवरुन जमादार नामदेव जाधव व पो.कॉ.चंद्रकांत अरकिलवार यांनी पाळत ठेवून दि.१७ जुलै २०२४ रोजी पहाटे १:२० वाजताच्या दरम्यान शेख जावेद शेख सलीम(२३)रा.समता नगर भोकर व चंद्राबाई खंडूराव जिंकलवाड(४०)रा.नंदी नगर भोकर या दोघांना शासकीय गोदामा समोरील मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज चौक भोकर परिसर येथे अवैध विक्रीसाठी आणलेल्या रसायन मिश्रीत सिंधीसह पकडले.तसेच त्यांच्या जवळील १७ नायलॉनच्या पोत्यामधील प्रति पॉकीटात एक लिटर प्रमाणे एकूण ८५० लिटर अशी जवळपास ४२ हजार ५०० रुपये किंमतीची रसायन मिश्रीत अवैध सिंधी जप्त केली. तर पो.कॉ.चंद्रकांत अरकिलवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त दोघांविरुद्ध गुरनं २४२/२०२४ कलम ६५ ई,८३ महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपरोक्त उल्लेखित ३ छाप्यात रसायन मिश्रीत अवैध सिंधी विक्रेत्या ६ जणांच्या मुसक्या आवळण्यात व त्यांच्या कडून ३ लाख ९४ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात भोकर पोलीसांना यश आले असून अवैध सिंधी विक्री विरुद्ध च्या कारवाईची मोहिम पुढे ही अशीच सतत सुरुच राहिल,असे पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांनी म्हटले आहे.तर उपरोक्त तीन गुन्ह्यांचा पुढील अधिक तपास भोकर पोलीस करत आहेत.