समृद्ध ऐतिहासिक स्थळांच्या संरक्षणासाठी प्रत्येक नांदेडकरांनी पुढे यावे : जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय महावारसा समितीची बैठक संपन्न
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : शिला लेखापासून ते किल्ल्यांपर्यंत आणि मंदिरांपासून कलात्मक बावडीपर्यंत नांदेडकडे शतकानुशतकाचा इतिहास पर्यटनाच्या स्वरुपात उपलब्ध आहे.या वारस्याच्या रक्षणासाठी गावागावांमध्ये जनजागृती व्हावी तसेच यासाठी शासनासोबतच राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजनेलाही जिल्ह्यामध्ये प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी व्यक्त केली.दि.१९ मार्च रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या महावारसा समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर,उपवनसंरक्षक केशव वाबळे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे,रूक्मिण रोडगे, डॉ.कामाजी डक हे वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हा वारसा समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील प्रमुख स्मारकांच्या संदर्भात सुरू असलेल्या व प्रस्तावित असलेल्या कामांबाबत चर्चा करण्यात आली.प्रामुख्याने होट्टल येथील प्राचीन शिल्प मंदिर,माहूर येथील किल्ला,कंधार येथील किल्ला या ठिकाणच्या पर्यटकांच्या सोई-सुविधांवर चर्चा झाली.
तसेच बैठकीमध्ये नांदेड जिल्ह्यासाठी समिती गठन करण्याचा निर्णय घेण्यात आला.नंदगिरी किल्ला,बिलोली येथील मशीदी जवळील अतिक्रमन हाटविणे, होट्टल येथे महोत्सव आयोजित करणे,नांदेड जिल्ह्यातील प्रस्तावित स्मारकांना राज्य संरक्षित करणे,निजाम शासनाकडून पुरातत्व विभागाकडे आलेल्या स्मारकाची मालकी सात/बारावर संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचा उल्लेख करणे, असंरक्षित स्मारकांची यादी अद्यावत करणे,भोकर येथील यादव कालीन शिवमंदिरासमोरील सभामंडप जमीनदोस्त झाल्याबाबत कार्यवाही करणे यासह आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.
समिती सदस्य सुरेश जोंधळे यांनी प्राचीन बांधकामाच्या सभोवताली पर्यावरण जपण्याबाबत सूचना मांडली.तर इतिहास तज्ञ डॉ.अरविंद सोनटक्के यांनी आपल्या वारसा जतनामध्ये हयगय होऊ नये तसेच प्राचीन वास्तूला हानी पोहोचवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.यावेळी किल्लेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांनी नंदगिरी किल्ल्या संदर्भातील समस्यांची मांडणी केली.यावेळी प्रामुख्याने माहूर,कंधार येथील किल्ल्यांवरही चर्चा झाली.पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा सादर केला.