सर्वाधिक नामनिर्देशन दाखल झालेल्या भोकर मतदार संघातील १२३ पैकी कितीजणांची उद्या माघार होणार?
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने ८५-भोकर विधानसभा मतदार संघ हा राज्यातील सर्वाधिक १४० उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलेला मतदार संघ ठरला आहे.यापैकी १७ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र माघारी घेतले असून उर्वरित १२३ पैकी उद्या दि.४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३:०० वाजता पर्यंत कितीजण नामनिर्देशन पत्र माघारी घेतील व कितीजण प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात राहणार आहेत हे कळणार आहे.
माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांची सन २००९ मध्ये ८५-भोकर विधानसभा मतदार संघात ‘एन्ट्री’ झाल्यापासून होणाऱ्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत या मतदार संघातून इच्छूक उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची संख्या सातत्याने वाढत गेली आहे.होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने तर भोकर विधानसभा मतदार संघातून नामनिर्देशन पत्र दाखल होण्याचा उच्चांक झाला असून राज्यातील सर्वाधिक नामनिर्देशन पत्र दाखल होणारा हा मतदार संघ ठरला आहे.एकूण १४० उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते.त्यापैकी माजी आमदार अमिता अशोकराव चव्हाण यांच्यासह १७ जणांनी आपली नामनिर्देशन पत्र माघारी घेतली होती.तर १२३ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिले होते.यात प्रामुख्याने भाजपा तथा महायुतीच्या उमेदवार ॲड.श्रीजया चव्हाण,राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तथा महाविकास आघाडीचे तिरुपती(पप्पू) कदम कोंडेकर, जनहित लोकशाही पक्षाचे नागनाथ घिसेवाड,वंचित बहुजन आघाडीचे सुरेश राठोड,प्रहार जनशक्तीचे नामदेव आयलवाड,मनसेचे साईप्रसाद जटालवार यांसह आदींचा समावेश आहे.बहुतांशरित्या पाहिले तर निवडणूक रिंगणातील राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांचे अधिकृत उमेदवार हे आपले नामनिर्देशन पत्र माघारी घेत नसतात.परंतू इतरांचे निर्णय सांगणे शक्य नसते.या मतदार संघातून अनेकजण नामनिर्देशन पत्र दाखल करतात व नंतर माघारी घेतात.असे का होते हे देखील सांगणे अशक्य आहे.परंतू काही उमेदवारांना सन्मानपुर्वक अर्थपूर्ण भाव दिल्या जातो व मनधरणी केल्या जाते आणि यानंतर ते समाधानी उमेदवार नामनिर्देशन पत्र माघारी घेतात असे बोलल्या जाते.उद्या किती जणांचे समाधान होते व कितीजण भाव खातात हे नामनिर्देशन पत्र माघारी घेतल्यानंतर कळणारच आहे. आणि कितीजण प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात राहतील हे देखील कळणार आहे.