प्राथमिक आरोग्य केंद्र भोसी येथील आरोग्य सेविकेला एका तरुणाने केली मारहाण

महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांना ही अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची दिली धमकी ; त्या तरुणाविरुद्ध भोकर पोलीसात करण्यात आला आहे गुन्हा दाखल
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र भोसी ता. भोकर येथे कर्तव्यावर असलेल्या आरोग्य सेविकेस एका तरुणाने मारहाण केली व महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांना अश्लील शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी त्या तरुणाविरुद्ध भोकर पोलीसांत शासकीय कामात अडथळा निर्माण करुन धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर रात्री अपरात्री काही मद्यपींकडून वारंवार असे प्रकार होत असल्याने आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांत भितीचे वातावरण पसरले असून येथील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय बसवंते यांनी केली आहे.
शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र भोसी ता.भोकर येथे दि.१३ जून २०२४ रोजी रात्री १०:२० वाजताच्या दरम्यान भोसी येथील एक आजारी व्यक्ती उपचार घेण्यासाठी आली होती. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवानी राठोड,आरोग्य सेविका अनुसया केशव खुपसे व आरोग्य सेवक सदाशिव राचलवार हे कर्तव्यावर होते.त्या आजारी व्यक्तीवर उपचार सुरू असतांनाच्या दरम्यान आजारी व्यक्तीच्या नातेवाईक मोन्टी सरपाते(३०) रा.भोसी ता.भोकर हा तरुण दारुच्या नशेत त्याच्या दुचाकीवरून तेथे आला व तुम्ही योग्य उपचार करत नाहीत म्हणून विनाकारण वाद घातला.यावेळी कर्तव्यावर असलेल्या सेविका अनुसया खुपसे यांनी त्यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने या सेविकेच्या गालावर थापड मारली.तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवानी राठोड यांच्या कक्षात जाऊन जोरजोरात ओरडून हातातील काठी टेबलवर आपटून अश्लील शिविगाळ केली.याचबरोबर तुम्ही येथे नौकरीच कशी करता तुम्हाला पाहून घेतो म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.
झालेल्या प्रकाराबद्दलची माहिती फोनवरून भोकर पोलीसांना देण्यात आली.यावरुन घटनास्थळी भोकर पोलीस तात्काळ पोहचले.परंतू पोलीस येत आहेत हे समजताच मोन्टी सरपातेने घटनास्थळावरून पळ काढला.तसेच झालेल्या प्रकाराबद्दलची माहिती तेथील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय बसवंते यांनी वरीष्ठांना दिली व त्यांच्या परवानगीने सेविका अनुसया केशव खुपसे,रा.ताटकळवाडी ता.भोकर यांनी दि.१४ जून २०२४ रोजी भोकर पोलीसात रितसर तक्रार दिली.यावरुन मोन्टी सरपाते विरुद्ध गु.र.नं.१७४/२०२४ कलम ३५३,३३२, २९४,५०६ भादवि प्रमाणे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा व अश्लील शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा भोकर पोलीस दाखल करण्यात आला आहे.तर पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास महिला सहा.पो.नि.कल्पना राठोड ह्या करत आहेत.
येथील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस संरक्षण देण्यात यावे-वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय बसवंते
शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र भोसी ता.भोकर चे आरोग्य केंद्र हे भोसी गावापासून काही अंतरावर आहे.त्यामुळे रात्री दरम्यान नागरिकांची अधिक ये जा नसते.तसेच येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी संख्या ही नाही.काही आजारी व्यक्ती प्राथमिक उपचार घेण्यासाठी येथे येतात.यावेळी त्यांना उपचार सेवा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न उपस्थित अधिकारी व कर्मचारी करतात.परंतू त्या आजारी व्यक्तीबरोबर आलेले काही मद्यपी नातेवाईक उपस्थित डॉक्टर व कर्मचाऱ्यांना विनाकारण शिविगाळ करतात.असे प्रकार अनेक वेळा होतात.तर काल झालेला हा गंभीर प्रकार पाहता येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे.तसेच असुरक्षितता भासत आहे.त्यामुळे पोलीस व प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि सुरक्षिततेसाठी पोलीस संरक्षण द्यावे,अशी मागणी येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय बसवंते यांनी केली आहे.