@ गुढी पाडवा- काही समज किंवा गैरसमज

अंबुज प्रहार विशेष…
गुढी पाडव्याच्या औचित्याने लेखिका रुचिरा बेटकर यांचा प्रासंगिक लेख वाचकांसाठी देत आहोत-संपादक
@ गुढी पाडवा- काही समज किंवा गैरसमज
महात्मा जोतीराव फुले म्हणाले होते “इतके अनर्थ एका अविद्येने केले” हे वाक्य आपण अशा वेळी अगदी तंतोतंत खरे करूनच दाखवतो.कोणत्या ही गोष्टीची जराशी ही शहानिशा न करता,डोकं न चालवता,खऱ्या खोट्याची पडताळणी आणि त्या संदेशाची साधने विचारात न घेता आपण सहज अज्ञानी सारखे कोणत्याही गोष्टीवर लवकर विश्वास ठेवतो.
गुढीपाडवा जवळ आला की “छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू ह्या विषयी ऐकायला मिळते.
छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येच्या आनंदात गुढ्या उभारण्यात आल्या होत्या.त्यामूळे गुढीपाडवा हा सण साजरा करू नये”असे सांगितले जाते.छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व जाणणाऱ्याना हे सत्य की असत्य काय ते कळतं नाही का?.
हिंदू दिनदर्शिकेनुसार,गुढी-पाडव्याच्या आधीचा दिवस म्हणजेच हिंदू नववर्षाचा पहिला दिवस हा छत्रपती संभाजी महाराजांचा हौतात्म्य दिवस आहे.नवीन वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या करून हिंदूंचे मनोधैर्य खचविण्यासाठी औरंगजेबाने हे हेतुपुरस्सर केले होते.
सगळ्या भंपक गोष्टींना दुजोरा देण्यासाठी असे सांगितले जाते की,गुढीपाडवा हा सण नव्हताच.हा सण छत्रपती शंभुराजांना मारल्याच्या दिवसापासून सुरु झाला.आता अशा गोष्टींवर सुद्धा आपण सहज विश्वास ठेवतो,पण त्याआधी आपण काही गोष्टींकडे लक्ष देऊया.गुढी पाडवा या सणाचा उल्लेख आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मा आधीच्या काळात सापडतो.याचे एक उदाहरण असे की,२४ नोव्हेंबर १६४९ सालचे स्वराज्यातील एक पत्र आहे,या पत्रात गुढी पाडवा या सणाचा स्पष्ट उल्लेख केलेला आढळतो.
म्हणजेच शिवरायांच्या काळात देखील गुढी पाडवा साजरा केला जात असे.आता पाहूया की,शिवरायांच्या आधीच्या काळात हा सण होता की नाही…? आपल्या संतांनी देखील गुढी पाडव्याचा उल्लेख अनेक कविता, अभंग इत्यादींमधून केला आहे.
“टाळी वाजवावी गुढी उभारावी,वाट ती चालावी पंढरीची” हे संत चोखामेळा यांचे पद्य,त्या काळात गुढी पाडवा साजरा होत होता हे दर्शविते.
संत एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथात देखील अनेकवेळा गुढी पाडवा या सणाचा उल्लेख आलेला आहे.एकनाथ महाराज भक्तीची,आनंदाची,यशाची,रामराज्याची,निजधर्माची गुढी उभारावी असे सांगतात.
काय आहे गुढी पाडवा ?
गुढी पाडवा हा आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र या पहिल्या मराठी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो.म्हणून या सणाला हिंदू नववर्ष असे देखील म्हणतात. हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे.या दिवशी सगळी नवीन आणि शुभ कार्ये केली जातात. जी नक्कीच लाभदायक असतात.आपल्या दारात उभारलेली गुढी ही समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून उभारली जाते.परंतु गुढीवर कलश उलटा का टांगतात,ते ही साडी आणि कडुनिंबाचा पाला लावून,मनुष्यस्वरूपी देखावा का तयार केला जातो…हा एक चर्चेचा विषय आहे.
उलटा कलश हा कोणत्या इतर कार्यात वापरला जातो का? पुजेला,देवघरात,मंदिरात उलटा कलश ठेवतात का? लिंबाचा पाला हा कोणत्या इतर कार्यात वापरतात का? मयत सोडून ?
पुर्वीच्या गुढी म्हणजे दिंडया/झेंडे,पताका जे वारकरी पालखीमधे वापरतात.मग ते आपण वापरतो का?
पाडवा सण देशभर साजरा करण्यात येतो.मग गुढ्या फक्त महाराष्ट्रातच का उभारतात ?
दुसर्या बाजूने विचार केला तर “छत्रपती संभाजी महाराजांची हत्या याच दिवशी केली म्हणून त्यावेळी समाजकंटकांनी आनंदात गुढ्या उभारण्यास सुरुवात केली होती.त्यामूळे गुढीपाडवा हा सण साजरा करावा की,करू नये हा प्रश्न सद्य परिस्थितीत पडतो आहे”, असे ही सांगितले जात आहे की,या दिवशी गुढी उभारण्याऐवजी केशरी म्हणजेच भगव्या रंगाचे झेंडे घरावर लावावे.परंतु हिंदू धर्मातील लोकांनी खरचं हा दिवस सण म्हणून साजरा करावा का? याच दिवशी भगव्या रंगाचे झेंडे घरावर लावावे का? असे ही प्रश्न उद्भवत आहेत.
आपल्या पौराणिक कथांमध्ये असेही सांगितले आहे की,
याच दिवशी प्रभू श्री राम देखील आपल्या राज्यात वनवास संपवून आले.हा गुढी पाडवा सण जसा महाराष्ट्रात मराठी माणूस साजरा करतो तसेच इतर राज्यात हा सण साजरा होतो का? प्रभू श्रीराम हे फक्त महाराष्ट्रातील माणसांपुरतेच मर्यादित होते का, अयोध्याकडील राज्यात हा सण साजरा केला जातो का? हे पण पाहणे गरजेचे वाटत नाही का?
जागे व्हा ! मंडळी,आपण जाणकार आहात…
राजे आज असते तर खरंच म्हणाले असते की,याच साठी का केला होता अट्टाहास स्वराज्याचा !
याचा विरोध करून एकच खोटी गोष्ट हजारवेळा बोलून खरी होत नाही हे लोकांनी लक्षात ठेवावे.आणि काय ते जाणून सण उत्सव साजरे करावेत.
या गुढी पाडव्याला आपण अशा अफवांना बाजूला सारत प्रत्येकापर्यंत हे सत्य पोहचवले पाहिजे,तरच खऱ्या अर्थाने नव्या वर्षात शुभ कार्य घडले असे समाधान वाटेल.आपणा सर्वांना गुढी पाडाव्याच्या व हिंदू नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शंभूराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!
लेखिका-सौ.रूचिरा बेटकर
नांदेड.9970774211