Sat. Dec 21st, 2024

भोकर मध्ये भव्य शोभायात्रेने हजारो कंठातून जय श्रीराम नामाचा गजर निनादला!

Spread the love

महाप्रसाद,दीपोत्सव आणि गगनचुंबी आतिषबाजिने मंदिरे,गाव व शहर दिवाळीसम प्रकाशले

अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती झाल्याने कारसेवक आनंदोत्सवी अश्रूंनी गहिवरले…!

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : अयोध्येत श्रीराममंदिर व ऐतिहासिक श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मंगल औचित्याने दि.२२ जानेवारी रोजी हजारो महिला,पुरुष,युवक,युवती व श्रीराम भक्त सहभागी झालेल्या अभूतपूर्व शोभायात्रेने हजारो तन,मन,वाणी आणि कंठातून भोकर मध्ये जय श्री राम नामाचा गजर निनादला.कुठे रॅली,कुठे महाआरती, कुठे भजन-किर्तन,कुठे महाप्रसाद,मंदीर व घरांघरातील दीपोत्सवाने सर्व परिसर प्रकाशले आणि भव्य गगनचुंबी आतिषबाजिने दिवाळीसम वातावरणात भोकर शहर व तालुक्यातील गावे अक्षरश: रामनामात रंगून गेली.तर हजारो कंठातून रामस्तुतीचा गजर ऐकून व अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती झाल्याने आनंदोत्सवी अश्रूंनी कारसेवक गहिवरुन गेल्याचे पहावयास मिळाले.
श्री रामभक्त,भोकर विचार विकास मंच,लोकोत्सव समिती, समस्त हिंदू समाज,समस्त गांवकरी मंडळी,भोकर शहर व तालुका यांच्या वतीने अयोध्येतील श्री राम मंदिर जिर्णोध्दार,श्री रामलल्ला मुर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या स्वराज्याभिषेक दिनानिमीत्त माऊली धाम, नवा मोंढा भोकर येथे दि.१७ ते २१ जानेवारी २०२४ पर्यंत भव्य संगीतमय श्री रामकथा यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यानच्या काळात भोकर शहर व तालुक्यातील गावांत श्रीराममय वातावरण निर्माण झाले होते. तर दि.२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिर जिर्णोद्धार व श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या औचित्याने पहाटे पासून घर अंगण,रस्ते रागोळींनी सजली होती.भगवी,केसरी साडी परिधान केलेल्या व डोक्यावर कलश घेऊन आलेल्या हजारो महिला आणि पांढरे शुभ्र पारंपरिक वस्त्र परिधान केलेले सर्व क्षेत्रातील पुरुष माऊली धाम नवा मोंढा भोकर येथे जमले.तसेच सकाळी ८:३० वाजता उपरोक्तासह साधू,संत,महंत,बॅन्ड पथक,लेझीम पथक,भजनीं मंडळ, रामायणातील विविध झाकी,प्रभु श्री रामचंद्राची १५ फुटांची भव्य मुर्ती,अश्व,बैलगाडी यांसह आदींचा सहभाग असलेली व आतिषबाजी,पुष्पवृष्टी करत येथून भव्य शोभायात्रा निघाली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,महात्मा गांधी चौक,श्री महादेव मंदीर,आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे निघालेल्या या शोभायात्रेचा माऊली धाम,नवा मोंढा भोकर येथे समारोप करण्यात आला.दरम्यानच्या काळात चौकाचौकांत शोभायात्रेवर पुष्पवृष्टी व आतिषबाजी होत होती,’प्रभू श्रीराम अयोध्या लौट आये है आणि जय श्रीरामचा जयघोष’ हजारो कंठातून होत होता.नवा मोंढा भोकर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते व अयोध्येतील श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी मोठे स्क्रीन उभारण्यात आले होते.यावेळी प्राणप्रतिष्ठेचा क्षण जसा जसा जवळ येऊ लागला तशीतशी श्रीराम भाविक भक्तांमधली उत्कंठा शिगेला पोहोचली होती.श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु झाला व श्री राम लल्लाची मूर्ती पडद्यावर दिसताक्षणी हजारो कंठांमधून एकाच वेळी ‘जय श्रीराम’ चा जयघोष सुरु झाला आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला.

गुढीपाडवा आणि दिवाळी एकाच दिवशी अनुभवली… आणि अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती झाल्याने कारसेवक आनंदोत्सवी अश्रूंनी गहिवरले…!
भोकर शहर व तालुक्यातील गावांत सडा-सारवण व रागोळींनी घर-अंगण आणि रस्ते सजली होती.गुढी उभारल्या गेल्या होत्या.पताका,ध्वजांनी सर्वत्र भगवामय वातावरण निर्माण झाले होते.तर मंदिरे,घरें हजारो दिव्यांनी प्रकाशमय झाली होती,महाप्रसाद वाटप करण्यात आले व भव्य आतिषबाजी ही करण्यात आली.तर शोभायात्रे दरम्यानच्या काळात शहरातील सर्व मुस्लीम बांधवांनी देखील आपापली दुकाने बंद ठेऊन सहभाग नोंदविला.तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक भोकर येथे आकाश गेंटेवार मित्रमंडळाच्या वतीने रात्री ७:३० वाजता श्री रामप्रतिमेची पुजा,महाआरती व रंगीबेरंगी तोफांच्या आवाजात गगनचुंबी भव्य आतिषबाजी करण्यात आली. एकूणच असे की, एकाच दिवशी गुढीपाडवा व दिवाळी साजरी झाल्याचे सर्वांना अनुभवता आले.तर शोभायात्रे दरम्यान कारसेवेत सहभागी झालेल्या रामकृष्ण ऊर्फ बाळा साकळकर, सुरेश दंडवते,बाळू देशपांडे,संतोष चिंतावार,बाबू दशरथवाड, रमाकांत जोशी,गणेश श्रीरामवार,नरेश गंदेवार,व्यंकटेश दमकोंडवार,साईनाथ नर्तावार,शेखर भाऊ यांसह आदींचा यथोचित सन्मान करण्यात आला व शोभायात्रेच्या ते अग्रणी राहिले.अयोध्येत श्रीराम परत यावेत यासाठी अनेक कारसेवकांनी बलीदान दिले व अनेकांनी यातना सोसून योगदान दिले.ज्यासाठी हे सर्व काही केलं व अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती दि.२२ जानेवारी रोजी झाली.यामुळेच हजारोंच्या आत्मीय कंठातून ‘जय श्रीराम चार जयघोष’ निनादत होता.हे सर्व पाहून कारसेवकांचे चेहरे प्रफुल्लित झाली आनंद ओसंडून वाहत होता.नव्हे तर मनामनात श्रीराम अवतरल्याचे पाहून आनंदोत्सवी अश्रूंनी ते गहिवरल्याचे ही पहावयास मिळाले. असे असले तरी सर्व कारसेवक जय श्रीरामचा जयघोष करत श्रीराम नामाचे गुणगान करणाऱ्या गीतांवर नृत्य करुन सर्व श्रीराम भक्तांच्या आनंदात सहभागी झाल्याचे पहावयास मिळाले.
महाप्रसाद,अभूतपूर्व ऐतिहासिक भव्य शोभायात्रा,दीपोत्सव, आतिषबाजी व विविध काकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भोकर विचार विकास मंच,लोकोत्सव समिती,सर्व अध्यात्मिक, सामाजिक संघटना,सर्व व्यापारी असोसिएशन,महिला मंडळ, डॉक्टर,वकील,शिक्षक,कर्मचारी,राजकीय पक्ष पदाधिकारी, पत्रकार बांधव,विशेषतः तरुण,युवक,युवतींनी अविरत परिश्रम घेतले.तर सर्व सोहळे,शोभायात्रा,कार्यक्रम यशस्वी व कायदा, शांतता व सुव्यवस्थेत व्हावेत यासाठी पो.नि.नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.दिगांबर पाटील,पो.उप.नि. विकास आडे,पो.उप.नि.राम कराड,पो.उप.नि.केशव राठोड व महिला,पुरुष पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !