भोकर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य मानधन मिळत नसल्याने करणार आहेत अमरण उपोषण !
गटविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत सदस्य बालाजी येलपे व आदींनी दिले निवेदन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांना मानधन(भत्ता) मिळतो.परंतू ग्रामपंचायत सदस्यांना गेल्या काही वर्षांपासून अद्यापपर्यंत तरी ते मिळाले नाही.त्यामुळे सर्व ग्रामपंचायत सदस्यांना तात्काळ मानधन मिळावे,अन्यथा सदरील मागणीसाठी अमरण उपोषण करण्यात येईल.असा ईशारा ग्रामपंचायत डौर चे सदस्य बालाजी येलपे यांसह आदींनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
भोकर तालुक्यातील एकूण ६६ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचांना ग्रामपंचायतीची विशेष बैठक व आदींकरीता उपस्थितीचा मानधन(भत्ता) मिळत आहे. सन २०२१ पासून गेल्या ४ ते ७ वर्षांपर्यंतचे मानधन ग्रामपंचायत सदस्यांना मिळालेले नाही.अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे त्यासाठी लागणारे बँकेचे पासबुक,आधार कार्ड व सर्व कागदपत्रे आणि निवेदने वेळोवेळी दिले आहेत. परंतू ग्रामपंचायत सदस्यांना मानधन मिळण्यास्तवची कार्यवाही ग्रामपंचायत अधिकारी,गटविकास अधिकारी व सर्व वरीष्ठ संबंधितांकडून अद्यापही तरी करण्यात आली नाही.ही कारवाई तात्काळ करण्यात यावी व सर्व ग्रामपंचायत सदस्यांना मानधन देण्यात यावे,या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत डौर ता.भोकर चे ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा कार्यकर्ते बालाजी शिवाजी येलपे यांसह आदींनी भोकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव केंद्रे यांना दि.३० डिसेंबर २०२४ रोजी दिले आहे.तसेच सदरील मागणी तात्काळ पुर्ण न केल्यास तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्य अमरण उपोषण करतील असा ईशारा त्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.