हाडोळीत मुलगी जन्मताच तिच्या नावाने ग्रामपंचायत जमा करणार ५,५५१ रुपये फिक्स डिपॉजिट !
ग्रामपंचायत हाडोळीच्या वतीने नुतन वर्ष २०२५ पासून राबविण्यात येणार असलेल्या ‘लाडकी कन्या योजनेचे’ होत आहे अनेकांतून कौतुक
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज हाडोळीने अनेक लोकोपयोगी योजना व उपक्रम राबवून ते यशस्वी करत गाव व तालुक्याचे नाव महाराष्ट्रात उज्वल केले आहे.नुतन वर्ष १ जानेवारी २०२५ पासून आता गावात जन्माला येणाऱ्या मुली बाबत ‘लाडकी कन्या योजना’ राबविण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय दि.१६ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या बैठकीत घेतला असून हाडोळी गावात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीच्या नावाने ५ हजार ५५१ रुपये फिक्स डिपॉजिट बँकेत जमा करण्यात येणार आहेत.मुलीच्या विवाह प्रसंगी यातून मोठी आर्थिक मदत होणार असल्याने ही आगळीवेगळी योजना राबविणाऱ्या हाडोळी ग्रामपंचायतीचे अनेकांतून अभिनंदनासह कौतुक होत आहे.
भोकर तालुक्यातील हाडोळी हे राज्यस्तरीय निर्मलग्राम पुरस्कार व राष्ट्रपती पुरस्कार विजेते पहिले गाव आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेतील राज्यस्तरीय विशेष पुरस्कार,पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धेतील पुरस्कार यांसह आदी पुरस्कारांचा मान, सन्मान या गावाने मिळविला आहे.तसेच गावातील सर्व उघड्या नाल्या बंदिस्त करण्यात आल्या.घनकचऱ्याचे व्यवस्थापन उत्तमरीत्या करण्यात आले.जातीपातीच्या भिंती उभ्या राहू नयेत म्हणून संपूर्ण गावातील घरांच्या भिंती एकाच रंगात रंगविण्यात आल्या, सार्वजनिक ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली व यातून हाडोळी ग्रामपंचायतने तालुक्याला स्वच्छतेचा संदेश दिला.याच बरोबर लहान बालके मोबाईलपासून दूर रहावेत म्हणून त्यांना व्यायाम करण्याची सवय लागण्यास्तव लाल मातीचे क्रीडा मैदान तयार करण्यात आले आहे.चुकून गावात प्लास्टिक दिसले तर त्यास जमा करण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊन लास्टिक बंदी करण्यात आली आहे. स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यात आहे.ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा करुन हजारो फळ व फुल वृक्षांची लागवड करून गाव हिरवळाईने नटविले आहे.गावातील मुख्य रस्त्यावर कमानी उभारल्या आहेत.जे कुटुंब शंभर टक्के कर भरतील त्यांना ग्रामपंचायतच्या वतीने मोफत दळण देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
संपूर्ण गाव सीसीटीव्हीच्या नजरेत आले आहे.या ग्रामपंचायतने आता आयएसओ मानांकन प्राप्त केले आहे.माझी मुलगी माझा अभिमान या उपक्रमांतर्गत गावातील सर्व घरावर ‘मुलीचे नाव घराची शान’ या घोषवाक्यासोबत आपापल्या मुलीचे नाव लिहून पाट्या लावण्यात आल्या आहेत.तर या ग्रामपंचायतीने एक महत्त्वाचा निर्णय दि.१६ जानेवारी २०२४ रोजी सरपंच सौ.अनिता माधवराव अमृतवाड,सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष माधवराव अमृतवाड,ग्रामपंचायत अधिकारी ए.एस.मुनगे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष,स्वस्तधान्य दूकानदार,पोलिस पाटील,वन विभागाचे वनरक्षक,गावकरी महीला व पुरुष मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत घेतला असून दि.१ जानेवारी २०२५ पासून जन्माला येणाऱ्या मुलींसाठी ‘लाडकी कन्या योजना’ राबविण्यात येणार आहे.या योजनेंतर्गत हाडोळी गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावाने ५ हजार ५५१ रुपये फिक्स डिपॉजिट बँकेत जमा करण्यात येणार आहे.ही योजना अभिनंदनीय असल्याने सदरील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,ग्रागसेवक यांसह आदी संबंधितांचे अनेकांतून कौतुक होत आहे.
अशा प्रकारे योजना राबविणारी भोकर तालुक्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली असल्याने गावाच्या वैभवात भर पडणार आहे-ए.एस.मुनगे,ग्रामपंचायत अधिकारी,हाडोळी
लेक लाडकी स्मार्ट ग्राम हाडोळीची ही योजना दि.१ जानेवारी पासून राबविण्यात येणार आहे.नागरिकांनी लिंग भेदभाव करू नये,ग्रामपंचायत अंतर्गत मुलींचा जन्मदर वाढावा,मुलीच्या जन्माचे स्वागत व्हायला हवे, बालविवाहास प्रतिबंध व्हावा, नागरिकांमध्ये आपल्या लेकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे,या दृष्टिकोनातून व अंदाजपत्रकातील महिला व बालकल्याण योजनेच्या हेड मधील रकमेचा योग्य विनियोग व्हावा म्हणून हाडोळी ग्रामपंचायतीने दि.१६ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे नक्कीच गावाच्या वैभवात भर पडणार आहे.
मुलगी सक्षम,सुरक्षित व विवाहास अर्थ सहाय्य व्हावे म्हणून ही योजना आम्ही राबवित आहोत-सरपंच सौ. अनिता माधवराव अमृतवाड
हाडोळी गावात मुलगी जन्माला येताच तिच्या नावे ग्रामपंचायती मार्फत ५ हजार ५५१ रुपये तिच्या बँक खात्यात फिक्स डिपॉझिटने जमा केले जाणार आहेत.यातून मुलगी सक्षम,सुरक्षित राहिल व तिच्या विवाह समयी आई-वडीलांना मोठी आर्थिक मदत होईल हा आमचा उदात्त हेतू आहे.यामुळेच असा ठराव आम्ही सर्वानुमते मंजूर केलो आहोत.याचा सरपंच म्हणून मला आज खूप आनंद होत आहे.