विद्यार्थी-शिक्षक व पालक यांच्यातील सुसंवादातून मोठे यश मिळू शकते-संपादक उत्तम बाबळे
भोकर येथील मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी-पालक मेळावा व क्रिडा स्पर्धांचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : विद्यार्थी आपल्या आवडीनुसार जे क्षेत्र निवडतो त्यास पालकांनी विरोध केला नाही पाहिजे व शिक्षकांनी देखील त्यादिशेने योग्य मार्गदर्शन केले पाहिजे.या दरम्यान परस्पर विरोधी विचार प्रकट न करता एकमेकांत सुसंवाद साधला पाहिजे.तरच विद्यार्थी-शिक्षक व पालक यांच्यातील सुसंवादाने यशस्वी विद्यार्थी घडू शकतो व निवडलेल्या क्षेत्रात मोठे यश मिळू शकते,असे मनोगत अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष संपादक उत्तम बाबळे यांनी व्यक्त केले.भोकर येथील मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी-पालक मेळावा व विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
भोकर येथील मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि.६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता शासकीय वसतीगृहातील सभागृहात विद्यार्थी-पालक मेळावा व क्रिडा स्पर्धांचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न झाला.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,भोकर च्या गृहपाल श्रीमती एस.डी.साळुंके या होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक सुभाष नारायणराव पाटील,अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे,कै.लक्ष्मराव घिसेवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकर चे प्राचार्य गणेश जाधव,प्रा. सोनटक्के यांची उपस्थिती होती.तसेच पालक प्रतिनिधी म्हणून केशव सुर्यवंशी, श्रीराम सुर्यवंशी व श्रीमती बोरकर ताई यांची उपस्थिती होती.
यावेळी उपरोक्त वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.तर विद्यार्थी-पालक मेळाव्याच्या आयोजनामागील पार्श्वभूमी मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,भोकर चे गृहपाल यु.एच.जाधव यांनी प्रास्ताविकातून मांडली.प्राचार्य गणेश जाधव यांनी व पालक प्रतिनिधी केशव सुर्यवंशी आणि श्रीराम सुर्यवंशी यांनी सोहळ्यास अनुसरुन मनोगत व्यक्त केले.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना संपादक उत्तम बाबळे पुढे म्हणाले की,आपण ज्या वसतीगृहाच्या भव्य इमारतीत बसलो आहोत त्या इमारतीची मोठ्या किंमतीची जागा भोकर विकास महर्षी सरपंच स्व.नारायण बाबागौड पाटील यांनी दिली आहे.हे होतांनाच्या ऐतिहासिक कामात आमचा ही खारीचा वाटा आहे.आज या इमारतीच्या छत्रछायेखाली गरीब,गरजू,होतकरु,मागासवर्गीय मुले-मुली राहत असल्याचे पाहून आत्मिक समाधान होत आहे.तर प्रत्येकाचे पाल्य डॉक्टर,इंजिनिअर झाले पाहिजे,अशी अपेक्षा ठेऊन पालक मुलांवर आपली इच्छा लादतात.परंतू मुलांची अन्य क्षेत्रात आपले करियर घडवण्याची इच्छा असेल तर त्यास ते क्षेत्र निवडू द्यायला पाहिजे.तरच त्यात तो उज्वल भवितव्य घडवू शकतो.प्रत्येक घरात ज्ञान यज्ञ पेटला पाहिजे.परंतू ज्ञान यज्ञ न पेटता अनेकांची घरे ही निम्नस्तरीय करमणुक केंद्र झाली आहेत.कारण त्या घरात पाल्यांसाठी स्वतंत्र खोली,त्यात टिव्ही,संगीत संच व वापरण्यासाठी महागडी स्मार्ट फोन उपलब्ध असतात.गरज नसतांनाही नको त्या भौतिक सुविधा पुरविल्या जातात.त्यामुळे त्यांची मुले अभ्यास करतात की नाही ? यावर प्रश्नचिन्ह उभे राहते.यातून अनेक विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात व पुढील जीवनात अयशस्वी होत आहेत आणि वेगळ्याच गैर मार्गावर जात आहेत.आता ती घरे नाही तर वसतीगृहच सुरक्षित राहिले आहेत.कारण विद्यार्थांची काळजी पालकांपेक्षा अधिकतेने वसतीगृहातील गृहपाल घेत असतात.म्हणून वसतीगृहांच्या व्ययस्थापक,गृहपाल यांनी दिलेल्या सुचनांचे विद्यार्थी व पालकांनी राग न मानता स्वागतच केले पाहिजे.असे ही ते म्हणाले.अध्यक्षीय समारोप श्रीमती एस.डी.साळुंके यांनी केले.सदरील सोहळ्यास बहुसंख्य विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.या कार्यक्रमांचे सुरेख असे सुत्रसंचालन जे.डी.दांडगे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार बी.एल. बादे यांनी मानले.