भोकर येथे मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी यांचे पहिले प्रशिक्षण संपन्न
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत निवडणूक कर्तव्यार्थ असलेल्या ८५-भोकर विधानसभा मतदार संघात कार्यरत असलेल्या नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष,मतदान अधिकारी व मतदान पथकाचे पहिले प्रशिक्षण दि.२९ मार्च रोजी ओम लॉन्स भोकर येथे संत संपन्न झाले.
यावेळी कर्तव्यांतर्गतच्या सर्व उपस्थित मतदान अधिकारी यांना मतदान यंत्रा बाबतची माहिती व मतदान प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर करावयाची कार्यवाही आणि मतदान साहित्याचे विविध नमुने यामधील अचूक नोंदी घेण्याबाबतच्या कार्यपद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले.नांदेडचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांच्या नियंत्रणात सुरू असलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीतील या प्रशिक्षण सत्रात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी मार्गदर्शन केले.तर यादरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रशिक्षण स्थळी भेट देऊन येथील व्यवस्थेची व प्रशिक्षणाची पाहणी केली.
मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण दोन सत्रात झाले.पहिल्या सत्रात भोकरचे तहसिलदार सुरेश घोळवे व अर्धापूरचे तहसिलदार रेणुकादास देवणीकर यांनी मतदान कार्यपद्धतीचे प्रशिक्षण दिले,तर मुदखेडचे तहसिलदार आनंद देऊळगावकर यांनी टपाली मतपत्रिका व निवडणूक कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण दिले.तसेच सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना दुसऱ्या सत्रात यशवंत आश्रम शाळा भोकर येथे झोनल अधिकारी व मास्टर ट्रेनर यांच्या उपस्थितीमध्ये वर्गनिहाय मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी १५१८ मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची उपस्थिती होती.तसेच ईव्हीएम प्रशिक्षण व्यवस्थेसाठी ४२ क्षेत्रिय अधिकारी व ४२ मास्टर ट्रेनर यांची नियुक्ती करण्यात आलेली होती.याशिवाय प्रशिक्षण व्यवस्था, बैठक व्यवस्था,मंडप व्यवस्था यासाठी १० अधिकारी व १५० कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.