…उमेदवारी मिळविण्यात बाप जिंकला,आता लेकीला जिंकविण्याची जबाबदारी मतदार माय बापांची…?
काँग्रेसचे नेते स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांची तिसरी पिढी श्रीजया चव्हाण यांना भाजपाने उतरविले भोकर विधानसभेच्या मैदानात
उत्तम बाबळे,संपादक
भोकर : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार अशोक चव्हाण हे जोपर्यंत राष्ट्रीय काँग्रेस पक्षात होते तो पर्यंत ते अनेकांना निवडणूकीची उमेदवारी देणारे दाते होते.परंतू भाजपात गेल्याने ते दात्याचे मागते होऊन लेकीच्या उमेदवारीसाठी त्यांना स्वकीयांसह विरोधकांशी ही लढावं लागलं.यात हा बाप जिंकला व महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून सन २०१९ पर्यंत काँग्रेसच्या व्यक्तींनी आमदार म्हणून सर्वाधिक काळ लोकप्रतिनिधीत्व केलेल्या भोकर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात काँग्रेसचे नेते स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांची तिसरी पिढी ॲड.श्रीजया अशोक चव्हाण यांना भाजपाने महायुतीचा उमेदवार म्हणून उतरविले आहे.ही उमेदवारी मिळविण्यात खासदार ‘बाप’ जिंकला असून आता त्यांच्या ‘लेकीला’ जिंकविण्याची जबाबदारी मतदार ‘माय बापांची’ आहे.
महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एक वेळ अपक्ष व एक वेळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असे दोन आमदार वगळता सन २०१९ पर्यंत भोकर विधानसभा मतदार संघातील सर्वाधिक काळ काँग्रेस पक्षाच्या व्यक्तींनीच आमदार म्हणून लोकप्रतिनिधित्व उपभोगले आहे. अख्खी हयात काँग्रेस पक्षाचे नेते राहिलेल्या तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व देशाचे गृहमंत्री म्हणून ज्यांनी लोकप्रिनिधीत्व केले आहे त्या स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी व त्यांच्या सुविद्य पत्नी अमिता चव्हाण यांनी देखील याच मतदार संघातून आमदारकी उपभोगली आहे.तर आता स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांची नात ॲड.श्रीजया अशोक चव्हाण यांना याच मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणून ‘भाजपाने’ रिंगणात उतरविले आहे.यावेळीचा फरक एवढाच आहे की, आजोबा,वडील आणि आई यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून लोकप्रतिनिधित्व केले असून पहिल्यांदाच ‘चव्हाण’ घराण्यातील ही तिसरी पिढी ‘भाजपा’ कडून निवडणूक रिंगणात उतरत आहे.
माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सुर्यकांता पाटील यांचे आजोबा माधवराव पाटील वायफनकर यांच्या विरुद्ध सन १९५२ मध्ये शंकरराव चव्हाण यांनी हदगाव विधानसभा मतदार संघातून पहिल्यांदा निवडणूक लढविली व यात त्यांना पराभूत व्हावे लागले.परंतू भोकर तालुका ज्या मतदार संघात होता तो धर्माबाद विधानसभा मतदार संघ व नंतर धर्माबाद तालुका ज्या विधानसभा मतदार संघात होता त्या भोकर विधानसभा मतदार संघातून अनुक्रमे सन १९६२ आणि १९६७ मध्ये निवडणूक लढलेल्या स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या पदरी येथील मतदार माय बापांनी आशिर्वादरुपी यशश्री टाकली. त्यानंतर राजकीय पटलावरची अनेक उच्च पदे त्यांनी उपभोगली व मागे वळून पाहिले नाही.केंद्रीय पदावरुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना माघारी यावे लागले त्यावेळी नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांना सन १९८७ मध्ये नांदेडच्या मतदार माय बापांनी पहिल्यांदा संसदेत पाठविले.यानंतर मात्र सन १९८९ मध्ये झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत जनता दलाचे सर्वसामान्य उमेदवार डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.सन २०१४ मध्ये पुन्हा नांदेड लोकसभा मतदारसंघातूनच ते संसदेत गेले.परंतू सन २०१९ मध्ये याच मतदार संघातून भाजपाचे सर्वसामान्य उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विरुद्धच्या लढतीत त्यांना पराभूत व्हावे लागले.आणि येथूनच खऱ्या अर्थाने ॲड.श्रीजया अशोक चव्हाण यांची राजकीय पटलावर ‘एंट्री’ झाली.
हरलेल्या बापाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून सन २०१९ मध्ये झालेल्या भोकर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत ॲड.श्रीजया चव्हाण यांनी प्रचार प्रसिद्धीची कार्यालयीन जबाबदारी पार पाडली.यामुळे अशोक चव्हाण यांना त्यांचा राजकीय वारसदार मिळाल्याचा विश्वास निर्माण झाला व त्यांनी श्रीजया चव्हाण यांच्या विषयी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाष्य करण्यास सुरुवात केली.जसे की,सन २०२० मध्ये झालेल्या जागतिक महिला दिनाच्या एका कार्यक्रम प्रसंगी त्यांनी जीवनातील स्त्रीचे व लेकीचे स्थान किती महत्त्वाचे असते? ते सांगितले…
‘जन्म द्यायला आई पाहिजे,राखी बांधायला बहीण पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे,पुरणपोळी भरवायला मामी पाहिजे,आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे,हे सर्व करायच्या आधी,एक मुलगी जगायला पाहिजे….’
‘एक मुलगी जगायला पाहिजे…या कवितेतून आपल्या लेकीचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.तर सन २०२२ मध्ये राहुल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रे दरम्यान श्रीजया चव्हाण या राहुल गांधी यांच्या समवेत चालल्या होत्या,हे पाहून अशोक चव्हाण यांनी एका ट्वीट मधून त्यांचे राजकीय पाऊल जोमाने पडणार आहे हे स्पष्ट केले होते.त्या ट्वीट मधून ते म्हणाले होते की...”पिल्लांच्या पंखात जेव्हा बळ येते,त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो,आणि आभाळात झेप घेण्यासाठी जेव्हा ती सज्ज होऊ लागतात,तेव्हा पाखरांना होणारा आनंद अवर्णनीय असाच रहात असणार!”
या ट्वीट मधील पाखराच्या पिल्लाने आभाळात झेप घेण्याचा संदर्भ म्हणजे श्रीजया चव्हाण यांच्या राजकीय प्रवेशाची घोषणाच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
खा.अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची साथ सोडली व हाती भाजपाचे कमळ धरले.यामुळे जनतेच्या दरबारात न जाता मतदार माय बापांच्या मतदानाविना त्यांना राज्य सभेची खासदारकी मिळाली.परंतू भाजपाच्या व महायुतीच्या उमेदवार म्हणून त्यांनी ‘लेकीला’ मतदार माय बापांची भुमिका महत्वाची असलेल्या भोकर विधानसभेच्या निवडणूक रिंगणातून अर्थातच जनता दरबारात प्रत्यक्ष उतरविले आहे.राष्ट्रीय काँग्रेसची साथ व हात सोडलेल्या ‘चव्हाण’ घराण्याने कमळ हाती घेऊन जनता दरबारात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.काँग्रेसमध्ये असतांना ‘चव्हाण’ कुटूंबातील वडील मुख्यमंत्री व पुत्र खासदार,पती खासदार व पत्नी आमदार असे एकत्र आणि एकाच वेळी लोकप्रतिनिधित्व केले.राज्यात व देशात वडील,मुलगा,मुलगी आणि पत्नी यांनी एकाच वेळी लोकप्रतिनिधित्व केल्याचे अनेक उदाहरणे आहेत. यामुळे भाजपात गेल्यानंतर वडील खासदार तर मुलगी आमदार झाल्यास नाविन्य राहणार नाही.परंतू स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांना पहिल्या निवडणूकीत पराभूत व्हावे लागले त्या हदगाव विधान सभा मतदार संघाचा एक रेकॉर्ड मात्र यावेळी मोडू शकतो.तो म्हणजे या मतदार संघातून १९५७ साली निजाम राज्याच्या दुसऱ्या निवडणुकीत अंजनाबाई पाटील वायफनकर या विजयी झाल्या होत्या.पुढे प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांची लेक माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सुर्यकांता पाटील या देखील याच मतदारसंघातून निवडून आल्या होत्या.माय लेकींना आमदार बनवणारा महाराष्ट्रातील हा एकमेव मतदारसंघ आहे. यावेळी भोकर विधानसभा मतदार संघातून जर श्रीजया चव्हाण निवडून आल्या तर माय लेकीला आमदार करणारा भोकर विधानसभा मतदार संघ हा दुसरा मतदार संघ असेल व हदगाव मतदार संघाचा तो रेकॉर्ड ही मोडेल.
हे रेकॉर्ड मोडण्यासाठी लेकीच्या उमेदवारीस्तव खा.अशोक चव्हाण यांना दात्याचे मागते होऊन स्वपक्षातील इच्छूकांची नाराजी पत्करावी लागली आहे.या लढ्यात ते जिंकले व आता स्वपक्षातील जुने,नवे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातील गटबाजी,विरोधी पक्ष,अपक्ष उमेदवार यांच्याशी त्यांना आणि त्यांच्या लेकीला लढावे लागणार आहे.तसेच स्व.डॉ.शंकरराव चव्हाण हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते.म्हणून होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचार फलकांवर त्यांच्या फोटोचा वापर राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडी करेल. परंतू भाजपात गेल्याने व स्व.डॉ.शंकरराव चव्हाण हे भाजपाचे नसल्याने खा.अशोक चव्हाण यांना त्यांचे वडील व श्रीजया चव्हाण यांचे आजोबा असतांनाही त्यांच्या फोटोचा वापर करणार येऊ शकणार नाही.राजकारण भव ‘अर्थ’ कारणातले मॅनेजमेंट गुरु म्हणून त्यांना संबोधले जाते.म्हणून त्यांच्या सुनियोजनातून या निवडणुकीत ते जिंकतील ही…परंतू ही निवडणूक त्यांच्यासाठी अग्नीपरिक्षा घेणारी असणार आहे. होऊ घातलेली ही विधानसभा निवडणूक म्हणावी तितकी सोपी नाही.कारण पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील फॅक्टर,दलित,मुस्लीम मतदारांचा विरोध, महायुती विषयीची नाराजी व जनतेने हातात घेतलेली ती निवडणूक महाविकास आघाडीचे पारडे जड करणारी ठरली होती.आता देखील यात फारसा फरक झालेला दिसून येत नाही.लोकशाहीत मतदार माय बापांनी जर ठरवलं तर ‘होत्याचे नव्हते व नव्हत्याचे होते’ असे होऊ शकते.खा.अशोक चव्हाण हे लोकसभेच्या निवडणूकीत दोन वेळा पराभूत झाले व स्व.डॉ. शंकरराव चव्हाण हे पहिल्याच विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते.त्यामुळे ‘चव्हाण’ घराणेशाहीत पराभूत होण्याची परंपरा नाहीच? असे नाही.म्हणून मतदार माय बापांनी ठरवलं तर श्रीजया चव्हाण या राजकीय पटलावर नवख्या असल्याने हरु ही शकतात व घराणेशाहीचा वारसा म्हणून जिंकूही शकतात…? त्यामुळे उमेदवारी मिळविण्यात हा बाप जिंकला असला तरी आता त्यांच्या लेकीला जिंकविण्याची सर्वस्वी जबाबदारी मतदार माय बापांच्या हाती आहे.त्यासाठी मतदानाच्या दिवशी मतदार माय बापांच्या ‘हाताची’ बोटं ईव्हीएम मशिनवरील योग्य उमेदवारांच्या चिन्हावर पडतीलच ? अशी अपेक्षा करुयात.