भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम पीकस्पर्धेत सहभागी व्हावे-कृषि अधिकारी जाधव
भोकर पंचायत समिती तर्फे जागतिक मृदादिनी संपन्न झालेल्या कार्यशाळेत शेतीविषयक विविध विषयांवर माहिती देण्यात आली व करण्यात आले उपरोक्त आवाहन!
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर तालुका कृषि अधिकारी कार्यालय व भोकर पंचायत समिती कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने जागतिक मृददिन साजरा करण्यात आला.या औचित्याने उपविभागीय क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांचे एक दिवसीय ऑफलाईन प्रशिक्षण व टिओएफ पुर्वप्रशिक्षकांद्वारे कार्यशाळा घेण्यात आली.यावेळी बोलतांना भोकर तालुका कृषि अधिकारी दिलीप जाधव यांनी शेतीविषयक विविध विषयांवर माहिती दिली, तसेच शासनाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या रब्बी हंगाम पीकस्पर्धेत तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे व त्यांना सहभागी करुन घेण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घ्यावेत,असे आवाहन केले आहे.
भोकर पंचायत समितीच्या सभागृहात मृदादिन निमित्ताने उपरोक्त कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या प्रसंगी व्यासपीठावर डॉ.बसवराज भेदे,कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे शास्त्रज्ञ माणिक कल्याणकर,बालाजी मुंडे,भोकर तालुका कृषि अधिकारी दिलीप जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलतांना शेतीविषयक विविध विषयांवर उपरोक्त मान्यवरांनी माहिती दिली.तर तालुका कृषि अधिकारी दिलीप जाधव म्हणाले की,रासायनिक खतांचा असंतुलित वापर,पीक पद्धतीत बदल आणि पाण्याचा अवाजवी वापर यामुळे जमिनीतील सेंद्रिय घटकांचा तुटवडा निर्माण झाला आहे.हा सेंद्रिय घटकांचा तुटवडा भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत,माती परीक्षण करावे,खतांचा संतुलित वापर करावा. जमिनीवरील पालापाचोळा,उसाचे पाचट,कचरा जाळून न टाकता तो शेतात बारीक करून टाकावा.यामुळे जमिनीतील सेंद्रिय घटक वाढले जातात.जमिनीतील सूक्ष्मजीव म्हणजे जीवाणू,जंतू,बुरशी,टोनोमायसोरीज,किडे,मुंग्या यांचे अन्न असून ते जमिनीतीला कणावर प्रक्रिया करून जमीनीत अन्न, द्रव्य उपलब्ध करून देतात.तसेच यावेळी त्यांनी शासनाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या रब्बी हंगाम पीकस्पर्धेत तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे व त्यांना सहभागी करुन घेण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घ्यावेत,असे आवाहन केले आहे.संपन्न झालेल्या या कार्यशाळेचे सुत्रसंचालन आनंद बोईनवाड यांनी केले.तर अनिल सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील होत असलेल्या पीकस्पर्धेची माहिती पुढील प्रमाणे आहे…
राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते.अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास,त्यांचे मनोबल वाढण्यास नक्कीच मदत होईल.तसेच शेतकऱ्यांकडून अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल,हा उद्देश ठेवून कृषि विभागामार्फत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषिसहायक,कृषिपर्यवेक्षक,तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा.रब्बी हंगाम २०२४ साठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख दि.३१ डिसेंबर २०२४ असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिकस्पर्धेत सहभागी व्हावे.
शासन निर्णया अन्वये रब्बी हंगाम २०२४ मध्ये ही पिकस्पर्धा मागील वर्षाप्रमाणे तालुका,जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येणार आहे.त्यानुसार कृषि विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी,गहू,हरभरा,करडई व जवस या ५ पिकासाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पिक स्पर्धेतील पिके – रब्बी पिके – ज्वारी,गहू,हरभरा करडई व जवस (एकूण ५ पिके)
पात्रता व निकष पुढील प्रमाणे…
स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे,स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल,पीक स्पर्धामध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे…
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र -अ),ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन,सातबारा, ८-अ उतारा,जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास),पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबधित सातबारा वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा.
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत…
रब्बी हंगामामध्ये पिकस्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहील.ज्वारी,गहू,हरभरा,करडई व जवस दि.३१ डिसेंबर २०२४ असून तालुकास्तर,जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पीक स्पर्धा निकाल प्रथम, द्वितिय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क…
पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम ३०० रुपये राहील व आदीवासी गटासाठी रक्कम १५० रुपये राहील.
पिकस्पर्धा विजेत्यासाठी बक्षिस स्वरुप… स्पर्धापातळी व सर्वसाधारण आणि आदिवासीगटासाठी बक्षिस रुपये पुढील प्रमाणे आहे.तालुका पातळीसाठी पहिले बक्षिस ५ हजार, दुसरे ३ हजार तर तिसरे २ हजार आहे.जिल्हा पातळीसाठी पहिले बक्षिस १० हजार,दुसरे ७ हजार तर तिसरे ५ हजार आहे.राज्य पातळीसाठी पहिले बक्षिस ५० हजार, दुसरे ४० हजार तर तिसरे ३० हजार याप्रमाणे आहे.