Wed. Dec 18th, 2024
Spread the love

यादव कालीन शिवमंदीर तथा कलावंतीणीच्या महालाचे अवशेष रातोरात झाली जमीनदोस्त…

उत्तम बाबळे,संपादक
भोकर : भोकर येथील यादव‌ काळातील ऐतिहासिक वारसा असलेल्या शिवमंदिर तथा कलावंणीच्या महालाचे अवशेष अज्ञातांनी रातोरात जमीनदोस्त करुन नष्ट केली आहेत.हा ऐतिहासिक ठेवा नष्ट केल्याची गंभीर बाब निदर्शनास आल्याने ऐतिहासिक वारसा प्रेमींनी याविषयी तात्काळ चौकशी करुन दोषींविरुद्ध योग्य ती कारवाई करावी अशी मागणी महसूल व पोलीस विभागाकडे एका निवेदनाद्वारे केली असून पुरातत्व विभाग आणि नांदेड जिल्हाधिकारी काय कारवाई करतील ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
यादव काळात भगवती व भगवतीचा अपभ्रंश होऊन भोगावती झालेल्या आणि तद्नंतर निजाम काळात भोगावतीचे ‘भोकर’ असे नाव झालेल्या तालुका आणि शहरात अनेक ऐतिहासिक पुरातन ठेवा(वारसा)आहेत.त्यात भोकर शहरातील कैलास गडावरील पुरातन महादेव मंदिर,गडाच्या पायथ्याचे हेमाडपंथी महादेव मंदीर,शहराबाहेरील किनवट रस्त्यावरील शिवमंदीर तथा कलावंतीणीच्या महालाचे अवशेष,तालुक्यातील श्रृंगीऋषी आश्रम,सिताखांडी,कौंडल्य ऋषी आश्रम,यांसह आदींचा समावेश आहे.भोकर शहराबाहेरील किनवट रस्त्यावरील गट क्रमांक ४५ मध्ये व सातबारावर देवस्थानची जागा सोडून असा उल्लेख असलेल्या आणि नांदेड जिल्ह्याच्या सरकारी गॅझेट मध्ये नोंद असलेल्या सुंदर कोरीव नक्षीकाम केलेल्या मोठ्या दगडी शिळांच्या शिवमंदीराच्या सभामंडपाचे तथा कलावंतीणीच्या महालाचे अवशेष यादव कालीन इतिहासाची साक्ष देत उभे होते.बहुदा निजाम काळात ते शिवमंदीर उद्ध्वस्त केले असावे व तो अवशेष सभामंडपाचा एक भाग होता.सदरील सभामंडपाकडे श्रद्धाळू व शिवभक्तांचे लक्ष जाऊ नये म्हणून निजाम काळात त्या अवशेषास ‘कलावंतीणीचा महाल’ म्हणून संबोधले गेले.कारण तत्कालीन परिस्थितीत कलावंतीणींना(नृतिकांना) हीनतेने पाहिले जायचे व तसेच झाले आणि हा ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित राहिला,असे अनेक जाणकारांनी म्हटले आहे.
निजाम सरकारच्या राजवटीत कैलास गडावर महादेव मंदिर व एक ऐतिहासिक तलाव होता.तत्काली ते महादेव मंदीर नष्ट केले गेले व त्याठिकाणी निजामाच्या ‘अबूबकर’ नावाच्या सरदाराचे थडगे उभारले गेले होते.कैलास गड,गडावरील महादेव मंदिर,ऐतिहासिक तलाव,गड पायथ्याचे हेमाडपंथी महादेव मंदिर यांसह आदी पुरातन वास्तूंची महती यादव कालीन राजांच्या प्रचलीत अख्यायीकांतून सांगितली जायची. याच अख्यायीकांच्या आधारे त्या थडग्याच्या ठिकाणी पुरातन महादेव मंदीर होते असा दावा सन १९४५ मध्ये येथील काही स्वातंत्र्य सेनानी आणि कोळी समाज बांधवांनी निजाम सरकारच्या पोलीसांकडे केला होता.तसेच निजाम पोलीसांशी मोठा संघर्ष करुन ते थडगे त्या सर्वांनी तोडून उत्खनन केले असता त्याठिकाणी काळ्या पाषाणाची मोठी पिंड व नंदी सापडला होता.याच पिंडीचे महादेव मंदिर व तो ऐतिहासिक तलाव आज कैलास गडावर अस्तित्वात आहे.तसेच ती पिंड, नंदी,भग्न झालेल्या दगडी मुर्ती आजही तेथे आहेत.अनेक वर्षांपासून त्या ऐतिहासिक तलावात श्री गणेश मुर्तींचे विसर्जन केले जाते.कैलास गडावरील महादेव मंदिर,ऐतिहासिक तलाव, गड पायथ्याचे हेमाडपंथी महादेव मंदिर यात वापरलेल्या व नक्षीकाम केलेल्या कोरीव दगडी शिळा आणि किनवट रस्त्यावरील शिवमंदीराचा सभामंडप तथा कलावंतीणीच्या महालाच्या अवशेषात वापरलेल्या कोरीव दगडी शिळांत माम्य होते.तसेच या अवशेषा शेजारीच एक पुरातन बारव (विहीर) देखील होती.हा एक भोकर चा यादव कालीन ऐतिहासिक साक्ष देणारा वारसा(ठेवा) होता.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीच्या व निकाला नंतर सरकार स्थापन होण्याच्या काळात महसूल आणि पोलीस प्रशासन कर्तव्यात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेऊन दरम्यानच्या काळात काही अज्ञातांनी तो ऐतिहासिक वारसा नुकताच जमीनदोस्त करुन ती बारव ही बुजवून नष्ट केली आहे.ही गंभीर बाब निदर्शनास आल्याने ऐतिहासिक वारसा प्रेमी प्रा.डॉ.व्यंकट माने,मंदीर व मुर्ती शास्त्र तज्ञ प्रा.डॉ.अरविंद सोनटक्के यासह आदींनी हळहळ व्यक्त केली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख,गजानन सोळंके,सोहम शेटे,साईदास माळवंतकर,संजय सोनमकर यांसह आदींनी दि.३ डिसेंबर २०२४ रोजी सदरील शिवमंदीराचे तथा कलावंतीणीच्या महालाचे ऐतिहासिक अवशेष नष्ट करणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करावी आणि तो अवशेष पुर्ववत सन्मानाने उभारण्यात यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे तहसिलदार भोकर यांच्याकडे केली आहे.तो ऐतिहासिक वारसा कोणी व कशासाठी नष्ट केला आहे हे मात्र अद्याप तरी स्षट झाले नसून भोकर तहसिल चे नायब तहसिलदार,भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन आणि पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली असून त्यांनी पोलीस आणि प्रशासनाच्या वतीने शांततेचे आवाहन केले आहे.तसेच घटनास्थळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.भोकरचे उपविभागीय अधिकारी हे भोकर विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी होते,त्यामुळे अद्याप तरी त्यांची निवडणूक विभाग कार्यातून मुक्तता झाली नसल्याने व तहसिलदार हे रजेवर असल्याने नायब तहसिलदार यांनी याविषयी काहीही ठोस कारवाई केली नसल्याचे व त्यांनी याबाबत वरीष्ठांना लेखी कळविले असल्याचे समजते.तर पुरातत्व विभागास केंव्हा जाग येईल आणि ते काय कारवाई करेल ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

सन २००३ मध्ये याच परिसरात उत्खननात सापडलेला कोरीव शिळांचा तलाव ही केला होता नष्ट…
शिवमंदिर तथा कलावंतीणीचा महाल असलेल्या परिसरातील समोरच्या बाजूस व किनवट रस्त्यापलीकडील असलेल्या इनामी जमीनीत मे २००३ मध्ये एका शेतकऱ्याने मत्स्यपालनासाठी तलाव करण्याच्या उद्देशाने उत्खनन केले असता त्याठिकाणी कोरीव नक्षीकाम केलेल्या मोठ्या दगडी शिळांनी रचलेले व पायऱ्या असलेले एक छोटे तलाव सापडले होते.यावेळी ते पाहण्यासाठी भोकर मधील असंख्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.कलावंतीणीच्या स्नानासाठी राजाने हा तलाव बांधला असावा असे जमलेल्यांतील काहींनी म्हटले होते,तर तसे नसून तो तलाव या शिवमंदीरात आलेल्या भक्तांच्या स्नानासाठी व घोडे आणि हत्तींना पाणी पिण्यासाठी बांधला गेला असावा,असे ही अनेकांतून चर्चील्या गेले होते. यादव कालीन अनेक राजे शिवभक्त होते.त्यामुळेच त्यांनी कैलास गडावरील महादेव मंदिर,गड पायथ्याला असलेले हेमाडपंथी महादेव मंदिर व किनवट रस्त्यावरील गट क्र.४५ मधील ते शिवमंदिर बांधले असावे ? तसेच निजाम काळात कैलास गडावरील महादेव मंदीर उद्ध्वस्त केल्याप्रमाणेच ते शिवमंदीर देखील उद्ध्वस्त केले गेले असावे ? आणि त्या शिवमंदीराच्या सभामंडपाच्या तथा प्रचलीत कलावंतीणीच्या महालाच्या अवशेषाशी संबंधित उत्खननात सापडलेला तो तलाव ही असावा अशी चर्चा अनेकांतून त्यावेळी झाली होती. अशी चर्चा झाल्याने ती जमीन प्रशासन ताब्यात घेईल या धास्तीने उत्खननात सापडलेल्या त्या दगडी शिळा रातोरात तेथून नष्ट केल्या गेल्या.यामुळे इतिहास वारसा प्रेमी नागरीकांनी प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी म्हणून मागणी केली होती.तर तो विषय पुरातत्व विभागाचा असल्याने ते योग्य ती कारवाई करेल,असे सांगून तत्कालीन महसूल अधिकारी व पोलीस प्रशासनाने कारवाईची जबाबदारी पार पाडली नव्हती. परंतू तत्कालीन कर्तव्यदक्ष नांदेड जिल्हाधिकारी यांनी पुरातत्व विभागाचे काही अधिकारी व इतिहास अभ्यासकांना घटनास्थळी पाठवून चौकशी केली होती.याच बरोबर सदरील उत्खननात सापडलेला तो दगडी शिळांचा तलाव शिवमंदिर तथा कलावंतीणीच्या महालाच्या अवशेषाशीच संबंधित असावा असा निष्कर्ष काढला होता.परंतू त्याठिकाणी सापडलेल्या कोरीव शिळा नष्ट केल्या गेल्याने प्रशासन व पुरातत्व विभाग कारवाई करण्यास अपयशी ठरले होते.उत्खननात सापडलेला त्या तलावाविषयी तत्कालीन लोकप्रिय दैनिक देवगिरी तरुण भारत या वृत्तपत्रातून तालुका प्रतिनिधी पत्रकार उत्तम बाबळे यांनी विशेष वृत्त प्रकाशित केले होते.याच प्रमाणे नुकतेच त्या शिवमंदीराचे तथा कलावंतीणीच्या महालाचे अवशेष जमीनदोस्त करुन नष्ट करण्यात आले आहेत.त्यामुळे ऐतिहासिक वारसा प्रेमींनी भोकरच्या इतिहासाची साक्ष देणारा तो ऐतिहासिक वारसा नष्ट करणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करावी व तो ऐतिहासिक वारसा पुर्ववत उभारण्यात यावा अशी मागणी केली आहे.पाहुयात महसूल व पुरातत्व विभाग याविषयी पोलीस विभागामार्फत काय कारवाई करेल ते ?


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !