८५-भोकर विधानसभा मतदार संघातील २ लाख ९९ हजार २२८ मतदारांसाठी ३४४ मतदान केंद्रांची स्थापना
तर नांदेड लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक प्रक्रिया ही या विधानसभा निवडणूकी बरोबरच पार पडणार
सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करुन मतदान केंद्रावर मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे आणि मतदानाची टक्केवारी वाढवीत लोकशाही बळकट करावी-निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा बिगूल आज वाजला असून संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.एकाच टप्प्यात व एकाच दिवशी दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.तर दि. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे.त्या अनुषंगाने ८५-विधानसभा मतदार संघातील २ लाख ९९ हजार २२८ मतदारांसाठी ३४४ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन करुन सदरील मतदान केंद्रावर मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे व मतदानाची टक्केवारी वाढवीत लोकशाही बळकट करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधानसभेची मुद्दत दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपणार आहे.त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक कधी होणार? याची उत्सुकता सर्व पक्षीय व अपक्षीय इच्छूक उमेदवार आणि मतदारांना लागली होती. अखेर आज दि.१५ ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली व महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असल्याने ती उत्सुकता संपली आहे आणि आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षीय व अपक्षीय इच्छूक उमेदवारांना दि.२२ ऑक्टोबर २०२४ रोजी पासून आपले नामनिर्देशन पत्र (अर्ज)दाखल करता येणार आहेत.नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख दि.२९ ऑक्टोबर २०२४ असून दि.३० ऑक्टोबर २०२४ रोजी सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल.तर दि.४ नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.त्यानंतर निवडणूक रिंगणातील वैध उमेदवारांसाठी दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून दि.२३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.नांदेड लोकसभा मतदार संघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हा मतदार संघ रिक्त झाला होता.त्या अनुषंगाने होऊ घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक ही पार पडणार असून दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजीच लोकसभेच्या उमेदवारांसाठी मतदान करता येणार आहे व मतमोजणी ही दि २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे.नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक व विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक एकत्र होत असल्याने नांदेड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातील मतदारांना दि. २० नोव्हेंबर रोजी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुक रिंगणातील उमेदवारांकरीता अनुक्रमे दोन मतदान करता येणार आहे.
होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ८५-भोकर विधानसभा मतदार संघाची माहिती देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांनी दि.१५ ऑक्टोबर २०२४ रोजी भोकर तहसिल कार्यालयाच्या बैठक कक्षात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा भोकरचे तहसिलदार विनोद गुंडमवार, मुदखेडचे तहसिलदार आनंद देऊळगावकर,अर्धापूरचे तहसिलदार रेणूकादास देवणीकर व नायब तहसिलदार सुनील माचेवाड यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.३० ऑगस्ट २०२४ रोजी घोषित केलेल्या मतदार यादीप्रमाणे भोकर विधानसभा मतदार संघात एकूण २ लाख ९९ हजार २२८ मतदार आहेत.यात १ लाख ५२ हजार ८४० पुरुष व १ लाख ४६ हजार ३७९ स्री आणि इतर ९ मतदार असून ८५ वर्षांवरील ४२२७ जेष्ठ मतदार व २८६१ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.तर २४९ सैनिक मतदार ही या मतदार संघात मतदानाचा हक्क बजावणार आहेत.उपरोक्त मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार संघात एकूण ३४४ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.यात लोकसभा निवडणूकीत नसलेल्या एका मतदान केंद्रांची भोकर तालुक्यातील नांदा बु.तांडा येथे नव्याने स्थापना करण्यात आल्याच्या समावेश असून मतदार संघातील १४ मतदान केंद्रांचे स्थळ बदलण्यात आले आहेत.तसेच विविध पथकांची स्थापना करण्यात आली असून दरम्यानच्या काळात ३६ झोन व झोनल अधिकारी,अधिकारी आणि कर्मचारी मिळून २५०० जणांचे मनुष्यबळ मतदान प्रक्रियेत कर्तव्य बजावणार आहेत.तरी होऊ घातलेल्या निवडणुकीत उपरोक्त मतदान केंद्रावर मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावून मतदानाची टक्केवारी वाढवावी व लोकशाही बळकट करावी,तसेच आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे,असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांनी केले आहे.