कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस आयुक्त नानासाहेब उबाळे झाले सेवानिवृत्त
३१ मे रोजी पोलीस आयुक्तालय सोलापूर येथे संपन्न झाला कर्तव्य सेवापुर्वी गौरव सोहळा !
अंबुज प्रहार प्रतिनिधी
सोलापूर : सद् रक्षणाय,खल निग्रहणाय! हे ब्रिद अंगिकारुन ३१ वर्षे पोलीस विभागात उत्कृष्ट कर्तव्यसेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त नानासाहेब उबाळे यांचा अनेक वरिष्ठ व कनिष्ठ पोलीस अधिकारी,कर्मचारी आणि कुटूंबीयांच्या उपस्थितीत दि.३१ मे रोजी पोलीस आयुक्त कार्यालय सोलापूर येथे सेवापुर्ती गौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
भोकर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विकास पाटील यांची येथून बदली झाली व फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांच्या जागेचा पदभार पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांनी स्विकारला.महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुका हा तेलंगणा राज्य सिमेलगतचा आहे.ऐतिहासिक, राजकीय व संवेदनशिल पार्श्वभूमी असलेला हा तालुका आहे. त्यामुळे भोकर पोलीस ठाणे सांभाळणे ही अधिकाऱ्यांसाठी तारेवरच्या कसरती करण्यासारखे व मोठ्या जिकरीचे असल्याचे बोलल्या जाते.परंतू असे असतांनाही अपुरे पोलीस अधिकारी व कर्मचारी बल घेऊन त्यांनी आपल्या अभ्यासू, शांत,संयमी व शिस्त प्रिय आणि न्यायीक स्वभावातून येथील जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी लिलया पेलली.जनसंपर्क व सुसंवादातून कायदा,शांतता व सुव्यवस्थेची प्रकरणे हाताळून काही गुन्हे उघडकीस आणत अनेक आरोपींना कारागृहाची वाट दाखविली आणि पीडितांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या कार्यकाळात भोकर पोलीस ठाण्याच्या भव्य इमारतीचा पाया रचला गेला व पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या कार्यकाळात त्या इमारतीचे लोकार्पण झाले.या इमारतीच्या कोणशिलेवर त्यांचे नाव व जनतेच्या मनात त्यांचे सेवाकर्तव्य संस्मरणीय राहणार आहे.
अशा या कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांची जानेवारी २०२४ मध्ये पदोन्नतीवर सोलापूर पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त पदी बदली झाली.तेथे देखील त्यांनी आपल्या अनुभवी न्यायीक कर्तव्याची छाप सोडली.सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी तेथे जवळपास ४ महिने उत्कृष्ट सेवा बजावली.तर सन १९९३ मध्ये पोलीस विभागात भरती झालेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त नानासाहेब उबाळे यांनी मुंबई,उस्मानाबाद,लातूर,नागपूर, नांदेड,भोकर व सोलापूर येथे उत्कृष्ट कर्तव्यसेवा बजावली.
वयोमर्यादा व शासकीय निती नियमानुसार त्यांनी पोलीस विभागात ३१ वर्षे कर्तव्य सेवा बजावली.त्यांच्या कर्तव्य सेवापुर्तीचा काल दि.३१ मे २०२४ रोजी शेवटचा दिवस होता. या औचित्याने दि.३१ मे २०२४ रोजी पोलीस आयुक्त कार्यालय सोलापूर येथे त्यांच्या सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यसेवापुर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन केले होते.सोलापूर चे पोलीस आयुक्त एम.राज कुमार यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी,कर्मचारी व मित्रपरिवाराच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला.यावेळी पोलीस आयुक्त यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल,श्रीफळ व भेटवस्तू देऊन सेवानिवृत्त होत असलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त नानासाहेब उबाळे यांचा सपत्नीक यथोचित गौरव करण्यात आला.याप्रसंगी सर्व उपस्थितांनी त्यांना पुढील कौटूंबिक सुख व सेवेसाठी उत्तम आरोग्यासह उदंड आयुष्य मिळो यास्तव भरभरून शुभेच्छा दिल्या.तर सदरील गौरव समारंभी मनोगत व्यक्त करतांना आजपर्यंतच्या सेवाकर्तव्य कार्यकाळात ज्यांनी ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केले त्या सर्वांचे त्यांनी ऋण व्यक्त केले.तसेच पुढील आयुष्य कुटूंब व जनसेवेसाठी खर्ची घालण्याच्या मनोदयी संकल्पाची ग्वाही दिली.त्यांचे मुळ गाव सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे असल्याने सेवानिवृत्ती नंतरच्या पुढील कार्यकाळात बार्शी व सोलापूर येथे सहकुटुंब राहण्याचे त्यांनी ठरविले आहे.त्यांना व कुटूंबियांना पुढील सुखी,समाधानी जीवनासाठी संपादक उत्तम बाबळे व परिवाराच्या वतीने देखील उत्तम आरोग्य व उदंड आयुष्यासाठी अगदी मनापासून खुप खुप हार्दिक शुभेच्छा!