दोन दुचाकींची समोरासमोरुन जबर धडक;या भीषण अपघातात चौघांचा झाला दुर्दैवी मृत्यू
भोकर – म्हैसा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळढव शिवारात झालेल्या या अपघातातील मयतांत दोन कर्मचाऱ्यांचा समावेश
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर-म्हैसा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळढव ता. भोकर शिवारातील वळणावर दि.२३ जुलै रोजी सायंकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान भरधाव वेगातील दोन दुचाकी समोरासमोरुन धडकल्या.या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार तर एकास उपचारासाठी नेतांना दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची भीषणता अशी होती की दोन्ही दुचाकींचा चेंदामेंदा झाला असून मयतांत मातुळ येथील आदिवासी आश्रम शाळेतील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. चौघांच्याही दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
भोकर-म्हैसा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळढव ता. भोकर शिवारातील वळण रस्त्यावर दि.२३ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान दुचाकी क्र.एम.एच.२६ सी.के.६६५९ व दुचाकी क्र.एम.एच.२६ सी.एफ.९६१८ या दोन्ही दुचाकी समोरासमोरुन एकमेकींवर धडकल्या.या भीषण अपघातात पहिल्या दुचाकीवरील दुचाकीस्वार गंगाधर विश्वनाथ म्हैसुरे(५५) रा.शिळवणी,ता.देगलूर,ह.मु.भोकर व परसराम किशन डाकोरे(५०)रा.पांडुरणा,ता.भोकर,तर दुसऱ्या दुचाकीवरील ज्ञानेश्वर गणेश मानेबोईनवाड(२५)रा.नांदा बु.व विनायक बुरोड(२५)रा.नांदा बु.या चौघांचा मृत्यू झाला.तसेच श्रावण हनुमंत पेडेमोडे(२३)रा.कुंभारगाव, ता.बिलोली हे गंभीर जखमी झाले.
या अपघाताची माहिती पोलीस पाटील शिलानंद गायकवाड यांनी भोकर पोलीसात दिल्यावरुन पो.उप. नि.सुरेश जाधव व पोलीस कर्मचारी हे तात्काळ घटनास्थळी पोहचले.तेथील काही नागरिकांच्या मदतीने दुर्दैवी मयतांचे मृतदेह व जखमींना शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आणण्यात आले. जखमींवर प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथे रवानगी करण्यात आली.यावेळी मयतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.
शाळेवर कर्तव्य बजावून येत असलेल्या गंगाधर म्हैसुरे व परसराम डाकोरे यांच्यावर काळाने झडप घातली आणि दुर्दैवी मृत्यू झाला.हे दोघे कै.व्यंकटराव देशमुख निवासी आश्रमशाळा मातुळ येथे मदतनीस आणि कामाठी पदावर कार्यरत होते.हे दोघे जण कर्तव्य बजावून नेहमी एकमेकांसोबत ये-जा करत होते.मयत परसराम डाकोरे यांच्या पश्चात आई-वडील,मुलगा-मुलगी असा परिवार असून ते काही काळ पांडूरणा गावचे सरपंच देखील होते.तर गंगाधर म्हैसूरे यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी,जावई असा परिवार आहे.तर मृतांमध्ये समावेश असलेल्या नांदा(म्है.प.)येथील विनायक बुरोड यांच्या पश्चात आई,वडील आणि भाऊ आहे.तसेच एकुलता एक कर्ता असलेल्या ज्ञानेश्वर मानेबोईनवाड यांच्या प्रश्चात आई व बहिण आहे.या दोघांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदरील अपघाताचा गुन्हा रात्री उशिरा भोकर पोलीसात दाखल करण्यात आला असून पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील अधिक तपास भोकर पोलीस करत आहेत.