Wed. Aug 13th, 2025

जिल्ह्यात सर्व धर्मियांनी एकमेकात सौहार्द व शांतता ठेवून सण,उत्सव साजरे करावेत-जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

Spread the love

अडचणी सोडविण्यासह कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन सदैव दक्ष आहे- पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार

अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : गणेशोत्सव,ईद-ए-मिलाद व दहीहंडी हे सण येत्या काळात एकत्रित येत आहेत.जिल्ह्यात हे सण साजरे करतांना सर्व धर्मियांनी एकमेकात परस्पर सौहार्द व शांतता ठेवून साजरे करावेत.तसेच पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा,असे आवाहन नांदेड चे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे दि.१२ ऑगस्ट रोजी जिल्हा शांतता समितीची बैठक संपन्न झाली.त्यावेळी ते बैठकीचे बोलत होते.
सदरील बैठकीस नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे,निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर,भोकर अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी,शांतता समितीचे सदस्य, पत्रकार बांधव यांसह जिल्ह्यातील आदी सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी सदरील बैठकीची पार्श्वभूमी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून विषद केली.यानंतर बैठकीस बहुसंख्येने उपस्थित असलेल्या शांतता समिती सदस्यांनी विषयानुषंगाने सुचना,समस्या व प्रश्न मांडले.प्रस्तुत सुचेना,समस्या व प्रश्नांची उत्तरे नांदेड-वाघाळा मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे,पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिले.
महापालिकेच्यावतीने विसर्जनाची तयारी पूर्ण – मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे

श्री गणेशोत्सवाचे सुयोग्य नियोजन महापालिकेच्यावतीने केले आहे.मिरवणूक मार्गात कोणत्याही समस्या निर्माण होणार नाहीत याची काळजी आम्ही घेणार आहोत.यावर्षी मनपा क्षेत्रात तीन ठिकाणी श्री गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून गोदावरी नदीत श्री गणेशाचे विसर्जन होणार नाही याची काळजी, नागरिकांनी व श्री गणेश भक्तांनी घ्यावी आणि गोदावरी नदी शुद्ध ठेवण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी केले.
अडचणी सोडविण्यासह कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन सदैव दक्ष आहे-पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार

सण,उत्सव व जिल्ह्यात सुरु असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्यांच्या काळात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.पोलीस प्रशासन सदैव दक्ष असून नागरिकांनी पोलीस प्रशासनास योग्य माहिती द्यावी.तसेच यादरम्यान येणाऱ्या अडचणी व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून तात्काळ सोडविण्यावर आमृही भर देणार आहोत. दरम्यानच्या काळात नको त्या अफवा व चुकीच्या माहिती आधारे कोणत्याही नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.यासाठी चांगले नियोजन केले असून नागरिकांना कोणतीही अडचण होणार नाही याची काळजी पोलीस व प्रशानाकडून घेण्यात येत आहे,असे ही पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी म्हटले आहे.
…एकमेकात सौहार्द व शांतता ठेवून सण,उत्सव साजरे करावेत-जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

बैठकीचा अध्यक्षीय समारोप करतांना जिल्हाधिकारी राहुल कर्डीले पुढे म्हणाले की,डिजेच्या आवाजामुळे सण,उत्सव काळात ध्वनी प्रदूषण मोठे होते.नागरिकांनी डीजे न लावता सण,उत्सव साजरा करण्यावर अधिक भर द्यावा.तसेच श्री गणेशोत्सव साजरा करतांना पर्यावरण पूरक श्री गणेशोत्सव साजरा करण्यावर ही अधिक भर द्यावा.नदीच्या वाहत्या प्रवाहात श्री गणेश मुर्तीचे विसर्जन न करता कृत्रिम तलावात करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. सण,उत्सवाच्या काळात नागरिक-मंडळाच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाकडून व्हॉटसअपग्रुप तयार करण्यात येणार आहे.यात नागरिकांनी त्यांच्या अडचणी थोडक्यात मांडाव्यात अशा सूचना ही त्यांनी बैठकीत दिल्या.याचबरोबर शांतता समितीच्या सदस्यांनी श्री गणेशोत्सव,दहीहंडी व ईद ए मिलाद या सणामध्ये येणाऱ्या अडचणी,समस्या,सुचना व मांडलेल्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी योग्य नियोजन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येईल असे ही ते म्हणाले.सण उत्सवाच्या काळात शांतता समितीचे सदस्य,सर्व सामाजिक, राजकीय नेत्यांनी आपापल्या गावात,नगरात शांतता राहील यासाठी स्वतः प्रयत्न करावेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले.तर सदरील बैठकीचे सुरेख असे सुत्रसंचालन निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी केले व उपस्थितांचे आभार नांदेडचे तहसिलदार यांनी मानले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !