नांदेड जिल्ह्यामध्ये ‘माझी लाडकी बहीणसाठी’ ८ जुलै पासून शिबिरांचे आयोजन : जिल्हाधिकारी
दि.३१ ऑगस्ट शेवटीच तारीख; धावपळ,गोंधळ करण्याची गरज नाही; सर्वांची नोंद करण्यात येईल !
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड :नांदेड जिल्ह्यातील मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनिंना या योजनेचा लाभ मिळेल याबाबत कोणतीही शंका ठेवू नये.या योजनेसाठी दि.३१ ऑगस्ट २०२४ ही शेवटची तारीख आहे. मात्र जिल्ह्यातील पात्र महिला भगिनिंना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी दि.८ जुलै २०२४ पासून ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येईल,अशी घोषणा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केली आहे.
यासंदर्भात आज जाहीर केलेल्या आपल्या व्हिडिओ संदेशात त्यांनी स्पष्ट केले की,मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रात सुरू झाली आहे.या योजनेच्या प्रती खुप मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य भगिनींमध्ये उत्साह सुद्धा दिसून येतो. त्यामध्ये अनेक महत्वाचे बदल दि.३ जुलै २०२४ रोजी शासन निर्णयाद्वारे करण्यात आले आहेत.सर्वात महत्वाचे म्हणजे या योजनेमधील जे लाभार्थी आहेत अशा २१ ते ६५ वयोगटातील सर्व विवाहित महिला,घटस्फोटित,परित्यक्ता,किंवा निराधार महिला तसेच प्रत्येक कुटुंबातील एक अविवाहित महिला यांना या योजनेमध्ये लाभ घेता येईल.त्याचबरोबर ज्या कुटूंबामध्ये ५ एकर पेक्षा जास्त जमीन आहे त्यांनाही या योजनेत सहभाग घेता येणार आहे.बाह्ययंत्रणा,किंवा स्वयंसेवी कामगार,कंत्राटी कर्मचारी कुटुंबाचे २.५० लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले कुटुंब आहेत त्यामधील महिला देखील पात्र ठरतील.ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनेमध्ये १ हजार ५०० रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळते अशा महिलांना या योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही,त्यामुळे त्यांनी या योजनेसाठी अर्ज करू नये,असे आवाहनही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
या योजनेसाठी अर्ज करतांना कोणीही धावपळ करू नये. सुधारीत शासन निर्णयामुळे ही योजना अतिशय सोपी व सुलभ झाली आहे.उत्पन्नाचा दाखल्याबाबत आता आपल्याकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला लागणार नाही.रहिवासी पुराव्यासाठी १५ वर्षापूर्वीचे जुने रेशनकार्ड,मतदान ओळखपत्र,शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला असेल तर रहिवास प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र काढण्याची गरज नाही.इतर राज्यातील विवाह करून आलेल्या महिलांसाठी त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
आता या योजनेसाठी दोन महिने म्हणजेच दि.३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे.जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक गावात दि.८ जुलै २०२४ पासून या योजनेचे अर्ज करण्यासाठी शिबीर आयोजित केले जाणार आहे.या शिबिरात महिलांना अर्ज करता येणार आहे.या योजनेसाठी कोणीही एजंट मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तींच्या अमिषाला बळी पडू नये.या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे.आपण स्वत: किंवा आपल्या घरातील एखादा तरुण सदस्यामार्फत अर्ज भरू शकता. छायाचित्र काढून ई-केवायसी करून इतर माहिती भरू शकता. शासनामार्फत आयोजित शिबिरातही याबाबत मदत केली जाणार.नांदेड जिल्ह्यातील सर्व पात्र महिला भगिनिंना या योजनेमध्ये लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णत: दक्ष आहे. प्रशासनाची सर्व टिम आपल्या सोबत आहे.कुठल्याही प्रकारची धावपळ न करता,घाईगडबड न करता,अमिषाला बळी न पडता या योजनेसाठी अर्ज करा,असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.