देशमुख बंधूंच्या ‘श्री साई डिजिटल स्टुडिओ भोकर’ ची रौप्य महोत्सवी वर्षाकडे यशस्वी वाटचाल…
या स्टुडिओ च्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त देशमुख बंधूंना अगदी मनापासून खुप खुप हार्दिक शुभेच्छा!-उत्तम बाबळे, संपादक
माझे सहकारी देशमुख बंधू आणि देव पुरी यांच्या फोटो स्टुडिओंच्या वर्धापन दिनाच्या औचित्याने…
भोकर येथील सामान्य शेतकरी कुटूंबातील रुक्मिणीबाई व बालासाहेब देशमुख यांच्या पोटी जन्मलेल्या सुधाकर बालासाहेब देशमुख यांना अगदी लहानपणीच एक गुरुमंत्र मिळाला.तो म्हणजे ‘काम मिळाल्याशिवाय घाम घाळता येत नाही व घाम गाळल्याशिवाय दाम मिळत नाही आणि दाम मिळाल्याशिवाय चूल भेटत नाही.’ या वास्तव परिस्थिती जाण आपल्या वडिलांचे श्रम पाहून त्यांना झाली होती.याचा साक्षीदार मी देखील आहे.कारण स्व. बालासाहेब देशमुख यांचा सहवास मला लाभला असून त्यांच्या सोबत मी देखील श्रम केलो आहे. साधारणत: सन १९९५-९६ च्या दरम्यान सुधाकर देशमुख यांनी कृष्णधवल छायाचित्रण काळातील कलानिपुण जेष्ठ छायाचित्रकार स्व.बलरामसिंह चौहान यांच्या ‘लक्ष्मी फोटो स्टुडिओ’ मध्ये छायाचित्रणाचे काम शिकण्यास सुरुवात केली.
छायाचित्रण जगतात छायाचित्रकाराच्या अंगी निर्मितीक्षमता,विकसित दृष्टिकोन,प्रकाश-संधी व प्रकाशाची उत्तम जाण,सर्जनशील गोष्टींचा शिस्तबद्ध विचार करण्याची क्षमता,चित्तवृत्ती,निसर्गाशी आणि निसर्गत: उपजलेल्या बाबींशी एकरूप होण्याची आकलनशक्ती,समयसुचकता,व्यक्तींच्या चेहऱ्याबरोबरच निसर्ग,प्राणी व पक्ष्यांचे हाव-भाव टिपण्याचे अतोनात वेड असले पाहिजे आणि हे गुण असणारी व्यक्ती उत्तम छायाचित्रकार बनू शकते.यापैकी अनेक गुण सुधाकर देशमुख यांच्या अंगी उपजतच होते व यास जोड मिळाली ती म्हणजे स्व. बलरामसिंह चौहान यांसारख्या कलानिपुण छायाचित्रकाराच्या गुरुत्वाची.
छायाचित्रण व छाया चलचित्रणात कला निपुण झालेल्या छायाचित्रकार सुधाकर देशमुख यांनी सन २००१ मध्ये श्री गणेश चतुर्थी च्या मंगलदिनी भोकर शहरात आपल्या स्वतः च्या ‘श्री साई डिजिटल फोटो स्टुडिओ चा’ श्री गणेशा केला.या स्व व्यवसायात त्यांना त्यांचे बंधू अशोक देशमुख यांची समर्थ साथ मिळाली व पुढे रंगसंगतीची उत्तम जाण,नवनिर्मितीची क्षमता,कलात्मक भान,दृश्यमांडणीची कल्पकता,निरीक्षण शक्ती,आत्मविश्वास,प्रसंगावधान,आवड,जागरूकता यांसह आदी कौशल्ये असलेले त्यांचे पुतणे अमोल देशमुख यांनी छायाचित्रांत आपल्या कलेतून जीव ओतला.स्टुडिओत येणाऱ्या ग्राहकांचे अविस्मरणीय क्षण छायाचित्रांत टिपुन त्यांचे समाधान कसे करता येईल याकडे या देशमुख त्रिमूर्तींनी अधिक लक्ष दिले.पैशा पेक्षा ग्राहकाचे समाधान हाच या स्टुडिओ चा ‘आत्मा’ आहे हे सिद्ध करण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. त्यासाठी चिकाटी,एकत्रित काम करण्याची मनापासूनची तयारी,समयसूचकता,अंतर्गत व बाह्य सजावटीचे भान,उत्तम सौंदर्यदृष्टी,तत्परता आणि उत्तम निर्मितीक्षमता हे महत्वाचे गुण या त्रिमूर्तीत असल्यानेच दिवसेंदिवस ग्राहक वाढत गेले व हा स्टुडिओ नाव लौकीकास आला.या व्यवसायात छायाचित्रकार सुधाकर देशमुख व देशमुख बंधूंच्या समोर अनेक चढउतार आले आणि अनेक वेळा कठीण प्रसंगांशी तोंडही द्यावे लागले.परंतू यात न खचता त्यांनी आपापल्या परीने श्रम करुन यशस्वी होण्यासाठी शारिरीक, बौद्धिक,कला व कौशल्यावर आधारीत कठोर श्रम केले आणि कष्ट केल्याशिवाय फळ मिळणार नाही याची जाण ठेवली. ‘कुछ किये बिना जयजयकार नहीं होती,कोशिष करने वालों की हार नही होती’ म्हणत मेहनत करण्याची जिद्द,चिकाटी ठेऊन श्रम करत राहण्यास त्यांनी प्राधान्य दिले.यामुळेच श्री साई डिजिटल स्टुडिओ ला आज यशस्वी २३ वर्ष पुर्ण करण्याचा पल्ला गाठता आला.भोकर येथील कलानिपुण जेष्ठ छायाचित्रकार म्हणून आज सुधाकर देशमुख यांचा नावलौकिक आहे.आमच्या ‘फोटोग्राफर्स मल्टिपर्पज असोशिएशन,महाराष्ट्र राज्य या नोंदणीकृत संघटनेचे ते पदसिद्ध उपाध्यक्ष आहेत. दरम्यानच्या काळात सुधाकर देशमुख यांनी अनेक छायाचित्रकार घडविले आहेत.त्यांनी घडविलेल्या शिष्यांपैकी काही छायाचित्रकार आज नामवंत झाले आहेत तर काही जण यशस्वी छायाचित्रकार म्हणून स्वतः चे स्टुडिओ स्थापून जीवन जगत आहेत.या शिष्यांपैकीच एक शिष्य असलेले मौ.बोरगाव सुधा येथील ज्ञानेश्वर उर्फ देव पुरी यांनी भोकर मध्ये गेल्या ८ वर्षांपूर्वी श्री गणेश चतुर्थीलाच ‘आराध्या फोटो स्टुडिओ’ स्थापला व त्यांच्या या स्टुडिओने देखील ९ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे.
कृष्णधवल ते रंगीत छायाचित्रकारीतेच्या काळातील यशस्वी छायाचित्रकार म्हणून सुधाकर देशमुख यांच्याकडे पाहिले जाते. भले ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या दुनियेत मोबाईलद्वारे काढलेल्या छायाचित्रे व चलचित्रांनी प्रगती केली असली तरी सुधाकर देशमुख यांनी आपल्या कलेतून कॅमेऱ्यात टिपलेल्या छायाचित्रांची सर त्या मोबाईल छायाचित्रांत कदापिही येऊच शकत नाही.म्हणूनच देशमुख बंधूंच्या ‘श्री साई डिजिटल स्टुडिओ भोकर’ ची रौप्य महोत्सवी वर्षाकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे.त्यांच्या श्रम साफल्यातून श्री गणेश चतुर्थी दिनी दि. ७ सप्टेंबर २०२४ रोजी ‘श्री साई डिजिटल स्टुडिओ चा २३ वा वर्धापन दिन’ साजरा झाला आहे.तसेच सुधाकर देशमुख यांचे शिष्य छायाचित्रकार देव पुरी यांच्या ‘आराध्या फोटो स्टुडिओ चा देखील ९ वा वर्धापन दिन याच दिवशी साजरा करण्यात आला आहे.या गुरु शिष्यांच्या स्टुडिओंचा वर्धापन दिन एकाच दिवशी असणे हा योगायोग नव्हे तर सुवर्ण योगच आहे म्हणावा लागेल.
“जीवनात मेहनत करा
मिळेल निश्चित फळ,
कष्टाने मिळविलेली भाकरी
देते जगण्याचे बळ”
हे ब्रीद घेऊन श्रम करत असलेल्या आमच्या उपरोक्त दोन्ही सहकारी छायाचित्रकारांच्या स्टुडिओंची उत्तरोत्तर प्रगती होवो व त्यांचे नाव लौकीक असेच होत राहो,यासाठी मी देशमुख बंधूंचा व देव पुरी यांचा या औचित्याने यथोचित सन्मान केला आणि अगदी मनापासून खुप खुप हार्दिक शुभेच्छा दिल्या!
पुनश्च एकदा या छायाचित्रकारांना मनस्वी हार्दिक शुभेच्छा!!
✍️
उत्तम बाबळे,संपादक
संस्थापक अध्यक्ष- फोटोग्राफर्स मल्टिपर्पज असोशिएशन,महाराष्ट्र राज्य