ॲड.शेखर कुंटे यांनी भोकरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आधुनिक ट्रॅफिक सिग्नल बसवण्याची केली मागणी

मागणी मान्य न झाल्यास पुढील काळात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रहार च्या वतीने देण्यात आला इशारा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर शहरातील वाहतुकीचा केंद्रबिंदू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतूक समस्येने नागरिक पार वैतागले असून सदरील समस्येवर आळा घालण्यासाठी आधुनिक ट्रॅफिक सिग्नल बसवण्याची अत्यंत आवश्यकता असल्याने तात्काळ ते सिग्नल बसविण्यात यावेत अशी मागणी प्रहार चे तालुकाध्यक्ष ॲड.शेखर कुंटे यांनी महसूल,पोलीस व संबंधित प्रशासनाकडे केली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक हा भोकर शहराच्या मध्यवर्ती मध्यस्थानी असून शहरातील चार दिशांना जाण्यासाठी वाहतुकीचे केंद्रबिंदू आहे.भोकर शहरातील व बाहेरुन येणाऱ्या वाहनधारकांच्या बेशिस्तीमुळे अनेकवेळा याठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. पोलीस बंदोबस्त असला तरी बेशिस्त वाहनधारकांच्या वर्तणुकीमुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था कोलमडत आहे. त्यामुळे लहान बालके,महिला आणि जेष्ठ नागरिक यांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.सतत धावणाऱ्या वाहनांमुळे नुतन शाळेसह सर्व शाळांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.ही गैरसोय होऊ नये आणि वाहनधारकांना शिस्त लागावी यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आधुनिक ट्रॅफिक सिग्नल बसविण्यात यावेत अशी मागणी ॲड.शेखर कुंटे यांनी केली असून त्याबाबतचे निवेदन तहसिलदार विनोद गुंडमवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र औटे व संबंधितांना दिले आहे.तसेच ही मागणी पुर्ण न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार कडून देण्यात आला आहे.