समाजाशी चर्चा करुनच राजीनाम्याचा निर्णय घेणार-काँग्रेसचे भोकर शहराध्यक्ष खाजू इनामदार
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदार संघाचे आमदार अशोकराव चव्हाण यांनी आपल्या आमदारकीच्या व काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन दि.१३ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांसह आदींच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. अशोकराव चव्हाण अनेक समर्थकांनी काँग्रेस पक्षाच्या आपापल्या पदांचा राजीनामा देऊन त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.याच अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे भोकर शहराध्यक्ष रमिजोद्दीन उर्फ खाजू इनामदार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,समाज बांधवांना विश्वासात घेऊनच हा निर्णय घेणे गरजेचे असल्याने मी अद्याप तरी माझ्या पदाचा राजीनामा दिला नसून भोकर शहरातील सर्व मुस्लिम समाज व अन्य समाज आणि हितचिंतक मतदारांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार आहे.तरी कोणीही गैर समज करुन घेऊ नये,असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.
होय-नाही म्हणत म्हणत अखेर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला असल्याने भोकर विधानसभा मतदार संघ व भोकर शहरातील असंख्य काँग्रेस पक्ष पदाधिकारी,कार्यकर्ते आणि समर्थक हे आपण काय भूमिका घ्यावी ? या मनस्थितीत आणि संभ्रमावस्थेत आहेत. तर काहींनी आपापला निर्णय जाहीर करत अशोकराव चव्हाण हे आमचे नेते व ते जेथे तेथे आम्ही आणि तो पक्ष ही आमचाच म्हणत पदांचा राजीनामा देऊन त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.नव्हे तर अनेक पदाधिकारी भाजपा प्रवेश सोहळ्या प्रसंगी मुंबईत उपस्थित राहिले आहेत.परंतू अद्यापही अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नसून त्यांचा निर्णय समोर येणे आहे.
भोकर विधानसभा मतदार संघ व भोकर शहरात बहुसंख्य मुस्लिम समाज आहे.अशोकराव चव्हाण हे भाजपात गेल्यामुळे येथील समर्थक मुस्लिम समाजाने त्यांच्या सोबत जावे का नाही ? याबाबतची भुमिका अद्यापतरी स्पष्ट केलेली नाही.भोकर येथील मुस्लिम समाजातील अनेकजण काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत.त्यांनी देखील आपला निर्णय अद्याप तरी जाहीर केलेला नाही.काँग्रेस कमिटी भोकरचे शहराध्यक्ष रमिजोद्दीन उर्फ खाजू इनामदार हे जरी मुंबई ला गेले असले तरी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही.याच अनुषंगाने त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी म्हणून प्रामाणिकपणे काम केलो आहोत.तसेच मुस्लिम समाज बांधवांनी देखील समाजिक प्रतिनिधित्व म्हणून मला साथ दिली आहे.परंतू भाजपा हा हिंदूत्ववादी पक्ष म्हणून पाहिला जातो.त्यामुळे आम्ही जो निर्णय घेणार आहोत त्याबद्दल समाज बांधवांसोबत चर्चा करणे आवश्यक आहे. अद्याप तरी समाज बांधवांशी आमची चर्चा झालेली नाही. त्यामुळे लवकरच समाज बांधवांशी मी चर्चा करणार आहे व चर्चेअंती पुढील निर्णय घेणार आहे.त्यानंतरच मी भोकर शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देईल व सद्या मी काँग्रेस पक्षातच आहे.तरी सर्व समाज बांधव व हितचिंतकानी कुठलाही गैर समज करुन घेऊ नये,असे मी विनंतीपर आवाहन करतो.असे ही त्यांनी यावेळी म्हटले आहे.